Saturday, 15 September 2012

चाळीसगांव नगरपालिकेला भरीव निधी उपलब्ध करुन देऊ -- वित्त आयोगाचे अध्यक्ष -डॉ. जे. पी. डांगे

 

चाळीसगांव दि. 15:- चाळीसगांव नगरपालिका चौथा महाराष्ट्र वित्त आयोग स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी व अधिकारी यांची बैठक चौथ्या महाराष्ट्र वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. जे.पी. डांगे यांच्या अध्यक्षतेखाली आज नगरपालिका सभागृहात पार पडली.
            या बैठकीला आमदार  राजीव देशमुख, जळगांव महापालिकेचे आयुक्त सोमनाथ गुंजाळ, जिल्हा प्रकल्प अधिकारी (न.पा.) बी. टी. बावीस्कर,प्रांताधिकारी गणेश मिसाळ, तहसिलदार शशिकांत हदगल, न.पा.चे  मुख्याधिकारी सुनिल पवार, नगराध्यक्ष अनिता चौधरी, उपनगराध्यक्ष भगवान पाटील आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
            चाळीसगांव नगरपालिकेला वित्त आयोगाकडून निधी मिळावा याकरीता मार्गदर्शन करतांना डॉ.डांगे म्हणाले की, नगरसेवक, पदाधिकारी व अधिकारी यांनी नगरपालिकेला आवश्यक असलेला निधी व प्रशासकीय, आर्थिक, वैधानिक व तांत्रिक अधिकाराविषयी असलेल्या समस्या व सुचना यांचा अहवाल तयार करुन एका महिन्यात वित्त आयोगाकडे पाठवावा. त्यावर सकारात्मक विचार करुन पालिकेला भरीव निधी उपलब्ध करुन दिला जाईल. तसेच पुढील पाच वर्षात आपल्या पालिकेतर्फे शहरासाठी कोणती विकासकामे राबविता येतील व त्यासाठी किती निधीची आवश्यकता असेल तेवढया निधीची मागणी वित्त आयोगाकडे करावी. त्यानुसार भरीव निधी उपलब्ध करुन देऊ असे आश्वासन देऊन नगरपालिकेचे उत्पन्न व त्याअनुषंगाने होणारा खर्च यातील तुट भरुन काढण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिका-याचा वापर करुन उत्पन्न वाढीसाठी जाणीवपुर्वक प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
            यावेळी आमदार राजीव देशमुख म्हणाले की, चाळीसगांव शहराचा विकास व विस्तार   झपाटयाने होत आहे. त्यानुसार विकासकामांसाठी जो निधी मंजूर होतो तो अपुर्ण पडत असल्याने पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्याची विनंती यावेळी त्यांनी केली. त्याचप्रमाणे या शहराचे एैतिहासिक महत्त्व विशद करुन श्रीक्षेत्र पाटणादेवी परिसर व जागतिक चित्रकार के. के. मुस कलादालनासाठीही निधी मिळण्याची शिफारस त्यांनी केली. तसेच जर शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध झाल्यास शहराच्या औद्योगिक वसाहतीला चालना मिळून शहराच्या विकासात  निश्चित भर पडेल, असे त्यांनी सांगितले.
            मुख्याधिकारी सुनिल पवार यांनी चाळीसगांव नगरपालिकेच्या विविध समस्या, उत्पन्नाची, शासनाकडून मिळणा-या अपुर्ण अनुदानाची अभ्यासपुर्ण सविस्तर माहिती डॉ. डांगे यांना दिली. तसेच नगरपालिकेच्या विविध विभांगासाठी किती निधीची आवश्यकता आहे याचीही माहिती दिली. पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या व पेन्शनरांच्या वेतनाबाबत येणा-या समस्यांचा उहापोह यावेळी त्यांनी केला. त्यासाठी कर्मचा-यांचे वेतन वेळेवर होण्यासाठी वेतनाला 100 टक्के अनुदान उपलब्ध करुन देण्याची विनंती यावेळी त्यांनी केली.
        प्रारंभी आमदार राजीव देशमुख यांनी डॉ. डांगे यांचा शाल, पुषगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.                                      
            यावेळी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी नगरपालिकेला निधी उपलब्ध करुन देण्याबाबत विनंती करुन आपले मनोगत व्यक्त केले. तसेच नगरसेवकांनी आपआपल्या वार्डाच्या अडचणी सविस्तर सांगून त्यासाठी वार्डाच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्याची विनंती केली.
            जळगांव महापालिकेचे आयुक्त गुंजाळ यांनी 10 टक्के लोकवर्गणी रद्द करण्याबाबत विंनती केली. पालिकेतील कर्मचा-यांना केडर लागू करावे, एलबीटी मालमत्ता कर वसुलीचे खाजगीकरण करावे, अशा मागण्या यावेळी त्यांनी केल्या.
            या बैठकीचे प्रास्ताविक गुलाब झोडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा प्रकल्प अधिकारी (न.पा.) बी. टी. बावीस्कर यांनी  केले.
यावेळी बैठकीला नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
                                           *****
           

No comments:

Post a Comment