Thursday, 20 September 2012

बॉलिवुड टुरीझम योजना नोव्हेंबरपासून सुरू करावी -मुख्य सचिव

      मुंबई, दि. 20 : पर्यटनस्थळांची निगा आणि स्वच्छता राखण्यासाठी क्लीन इंडिया मोहिमेंतर्गत तयार करण्यात आलेले ॲनिमेटेड लघुचित्रपट विविध शाळांमध्ये दाखविण्यात यावे. टुरीस्ट बसेसमध्ये या चित्रपटांच्या सीडी मोफत देण्यात याव्यात. पर्यटकांमध्ये बॉलीवुड विषयी असलेले आकर्षण लक्षात घेऊन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून बॉलिवुड टुरीझम योजना नोव्हेंबरपासून सुरू करावी, असे निर्देश मुख्य सचिव जयन्त कुमार बाँठिया यांनी आज संबंधित विभागाला येथे दिले.
            सह्याद्री राज्य अतिथीगृहात पर्यटन विभागाच्या  क्लीन इंडिया, हुनर से रोजगार तक आणि बॉलिवुड टुरीझम या विविध योजनांचे सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी मुख्य सचिव बोलत होते.
            मुख्य सचिव म्हणाले की, सर्वसामान्यांमध्ये बॉलिवुडविषयी मोठे आकर्षण आहे. गोरेगाव चित्रपटनगरीमध्ये सुरू असलेले चित्रीकरण, चित्रीकरणस्थळी पर्यटकांचा अभिनेत्यांशी संवाद, चित्रनगरीची सफर अशा बाबींचा समावेश बॉलिवुड टुरीझममध्ये करण्यात यावा. चित्रनगरीतील विविध चित्रीकरणाचे वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे तसेच चित्रनगरीमध्ये  विविध प्रदर्शनांचे आयोजन केल्याने उदयोन्मुख कलावंतांना त्याचा लाभ होऊन पर्यटनाच्या दृष्टीने ते महत्त्वाचे ठरणार आहे.
            पर्यटन स्थळांची स्वच्छता ठेवण्याबरोबरच त्यांची निगा राखण्यासाठी तयार करण्यात आलेले ॲनिमेटेड लघुचित्रपट राज्यातील शाळांमध्ये दाखविण्यात यावेत. या मोहिमेसाठी तयार करण्यात आलेल्या ग्रीनी या ब्रॅण्ड अम्बॅसीडरचे फलक सर्वच पर्यटनस्थळांच्या दर्शनी भागात लावावेत. क्लीन इंडीया मोहिमेच्या अमंलबजावणीसाठी राज्यातील हिलस्टेशन असलेल्या नगरपालिका क्षेत्रातील नगराध्यक्ष, मुख्याधिकारी तसेच ग्रामपंचायत क्षेत्रातील सरपंच व ग्रामसेवक यांची राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करावी, असे मुख्य सचिवांनी यावेळी सांगितले.
            हुनर से रोजगार तक या केंद्र शासनाच्या मोहिमेंतर्गत मुंबईतील टॅक्सी चालकांना संवाद कौशल्य आणि टुरीझम गाईड संदर्भातील प्रशिक्षण देण्यात येणार आहे असे सादरीकरणात सांगण्यात आले.
            नोव्हेंबरपासून पथदर्शी प्रकल्प म्हणून गोरेगाव चित्रनगरीमध्ये विकेंड टुरीझम योजना सुरू करण्यात येणार असल्याचे चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीकांत देशमुख यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एस. एस. संधू, नगरविकास विभागाचे सचिव श्रीकांत सिंह, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश पाटील तसेच पर्यटन, परिवहन, व्यवसाय कौशल्य आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment