Monday, 10 September 2012

महिला बचतगटांच्या माध्यमातून नरीक औषधांची विक्री मोबाईल दुकानांद्वारे करणार - सुरेश शेट्टी


      मुंबई, दि. 10 राज्यातील महिला बचतगटांच्या माध्यमातून जेनरीक औषधांचे मोबाईल दुकान सुरू करण्याबाबत आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात योजना तयार करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी आज अधिकाऱ्यांना दिले.  
     मंत्रालयात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या (एनआरएचएम) वित्त व्यवस्थापन विषयक झालेल्या आढावा बैठकीत आरोग्यमंत्री बोलत होते. राज्यमंत्री फौजिया खान, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव
टी. सी. बेंजामिन, एनआरएचएमचे प्रकल्प संचालक व कुटुंब कल्याण आयुक्त विकास खारगे यावेळी उपस्थित होते.
     श्री. शेट्टी म्हणाले की, आरोग्य विभागामार्फत जिल्हा रुग्णालयांमध्ये जेनरीक औषधांचे दुकान सुरू करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात महिला बचतगटांचे जाळे मोठ्या प्रमाणावर आहे. त्या माध्यमातून जेनरीक औषधांची विक्री सुरू करण्यासाठी अशा बचतगटांना मोबाईल दुकान सुरू करता येईल. या बचतगटांना शासनामार्फत योग्य दरात औषधे पुरविली जातील. ही योजना सुरू झाल्यावर महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. अनेक महिला संस्था त्यासाठी पुढाकार घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
     खर्चावरील नियंत्रणासाठी राज्यस्तरावर दक्षता पथक स्थापन करावे
            एनआरएचएमच्या वित्तविषयक बाबींचा आढावा घेऊन आरोग्यमंत्री म्हणाले की, एनआरएचएमच्या निधीचा विनियोग काटेकोरपणे झाला पाहिजे. या खर्चावर अंकुश तसेच देखरेख आणि नियंत्रणासाठी राज्यस्तरावर दक्षता कक्ष तसेच जिल्हास्तरावर लेखा परिक्षण कक्ष स्थापन करावा. राज्यस्तरावरील दक्षता कक्षासाठी निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक करावी यासाठी गृह विभागाचे सहकार्य घ्यावे, असे निर्देशही श्री. शेट्टी यांनी दिले. जिल्हा, तालुकास्तरावरील एनआरएचएम कर्मचाऱ्यांसाठी ट्रेनिंग मोड्यूल तयार करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण रुग्णालयातील सोयीसुविधांवर विशेष भर देण्यात यावा, असे राज्यमंत्री फौजिया खान यांनी यावेळी सांगितले.                 
     राज्यातील बालमृत्यूचे प्रमाण 8 टक्क्यांनी कमी झाले असून बाळंतपणात माता मृत्यूचे प्रमाण कमी असणाऱ्या देशातील आघाडीच्या तीन राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश असल्याची माहिती श्री.खारगे यांनी सादरीकरणात दिली.  यावेळी आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील, सह संचालक डॉ. सतिश पवार आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.            

ठळक वैशिष्ट्ये

एनआरएचएमच्या माध्यमातून राज्यातील बालमृत्यूचे प्रमाण 36 वरून 28 वर आणण्यात यश
रुग्णालयांत बाळंतपण करण्याच्या प्रमाणात 53 टक्क्यांवरून 91 टक्के वाढ
बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी 33 जिल्ह्यातील 203 रुग्णालयांमध्ये, तर 1024 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये न्यू बॉर्न केअर कॉर्नर सुरू करण्यात आली आहेत.
राज्यातील विविध शासकीय रुग्णालयांमध्ये 1787 तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.  
160 आरोग्य संस्थांमध्ये ब्लड ट्रान्सफ्युजन सेवा सुरू करण्यात आली आहे.
जिल्हास्तरावर होणाऱ्या खर्चावर अंकुश राहण्याकरीता तसेच निधीच्या जलद वितरणासाठी
ई-बँकींगची सुविधा.

No comments:

Post a Comment