Friday, 14 September 2012

औद्योगिक धोरणाची प्रभावी आखणी आणि कार्यपद्धतीत सुधारणा यामुळे महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी सर्वात पसंतीचे राज्य - मुख्यमंत्री


               मुंबई, दि. 14 : औद्योगिक धोरणाची प्रभावी आखणी आणि अंमलबजावणी त्याचबरोबर कार्यपद्धतीत सुधारणा यामुळे महाराष्ट्र राज्य अजूनही गुंतवणुकीसाठी सर्वात जास्त पसंतीचे राज्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल येथे केले.
            कॉर्निंग इंडिया ही अमेरिकन कंपनी राज्यात पुणे जिल्ह्यात चाकण येथे ऑप्टीकल फायबरचे उत्पादन सुरु करीत आहे. त्यानिमित्ताने काल हॉटेल ट्रायडंट येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उद्योग राज्यमंत्री सचिन अहिर, अमेरिकेचे महावाणिज्यदूत पिटर हास, कॉर्निंग इंटरनॅशनलचे अध्यक्ष इरिक मूसर, उपाध्यक्ष स्टिवन मिलर, व्यवस्थापकीय संचालक रुस्तम देसाई तसेच उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
            कॉर्निंग इंडिया राज्यात अत्यंत कमी कालावधीत उत्पादन सुरु करीत आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य असून कोणत्याही राज्यापेक्षा येथे औद्योगिक उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. पुणे हे विद्येचे केंद्र असून अनेक महाविद्यालये आणि संशोधन संस्था येथे आहेत. याशिवाय कंपनीला उपयुक्त असलेले रासायनिक तंत्रज्ञान येथे असलेल्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमुळे सहज उपलब्ध होईल त्यामुळे कॉर्निंग इंडिया कंपनीने राज्यात पुणे येथे युनिट सुरु करण्याचा घेतलेला निर्णय अतिशय स्त्युत्य आहे. ऑप्टिकल फायबरचा वापर उच्च दर्जाच्या तंत्राज्ञानात मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचा फायदा भारताला नक्कीच होईल. महाराष्ट्रातील संशोधक आणि गुणवत्तापुर्ण मनुष्यबळ याचा लाभही परदेशी गुंतवणूकदारांना होईल.  
            मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे म्हणून केवळ मुंबईचा विकास न करता पुणे, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद ही शहरे देखिल औद्योगिक क्षेत्र म्हणून उदयास येत आहेत. येथेही मोठ्या प्रमाणात परदेशी आणि स्थानिक गुंतवणूक होत आहे. कॉर्निंग इंडिया कंपनीने भविष्यात केबल क्षेत्रात पदार्पण करुन राज्यात अधिक गुंतवणूक करावी. शासन कंपनीला आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
            सचिन अहिर म्हणाले की, कॉर्निंग इंडिया कंपनीने राज्यात गुंतवणूक करुन इंडो-अमेरिका संबंधाचा नवीन अध्याय सुरु केला आहे. कंपनी उत्पादन करीत असलेल्या  कमी किंमतीच्या ऑप्टिकल फायबरमुळे  औद्योगिक क्षेत्रात बदल होतील. उद्योजकांसाठी ही संधी उपलब्ध झाली आहे. परदेशी गुंतवणूकदारांबद्दल शासनाची भूमिका नेहमीच सहकार्याची आणि सकारात्मक राहिली आहे. राज्यात अधिकाधिक परदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रुस्तम देसाई यांनी प्रास्ताविकात कंपनीच्या कामकाजाची माहिती दिली आणि महाराष्ट्रात विशेषत: पुणे जिल्ह्यातील चाकण येथे युनिट उभारण्याबाबतची भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिले आणि भविष्यात अधिक गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने कंपनी उत्सुक असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment