मुंबई, दि. 27 : ग्रामीण भागातील नागरिकांना
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची तसेच रोजगाराच्या अधिकाराची
माहिती करुन देण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून
राज्यात दि. 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2012 या कालावधीत महात्मा गांधी नरेगा जागृती
अभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
केंद्र शासनाच्या महात्मा गांधी
राष्ट्रीय रोजगार हमी अधिनियम 2005 व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी कायदा 1977
(सुधारणा 2006) अन्वये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना संपूर्ण
महाराष्ट्रात दि.1 एप्रिल 2008 पासून राबविण्यात येत आहे. अकुशल काम करण्यास
इच्छुक असणाऱ्या प्रत्येक कुटूंबातील प्रौढ व्यक्तीला या योजनेंतर्गत कामाच्या
माध्यमातून रोजगाराची हमी देऊन त्या माध्यमातून कायम स्वरुपी मालमत्ता निर्माण
करणे हा या योजनेचा मूळ उद्देश आहे.
स्वयंपूर्ण ग्राम राज्याची उभारणी हा
महात्मा गांधींचा संकल्प होता. तसेच खेड्याकडे चला असा त्यांचा संदेश आहे. त्या
अनुषंगाने कृषी, ग्रामविकास, भूजल सर्वेक्षण, पाटबंधारे, महसूल, सार्वजनिक बांधकाम
व जलसंधारण या राज्य शासनाच्या विविध विभागांनी एकत्रितरित्या नियोजन केल्यास
गावाच्या संपूर्ण विकासाला चालना मिळेल व त्याद्वारे गाव स्वयंपूर्ण करण्यास मदत
होईल. ही बाब विचारात घेऊन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी
योजनेंतर्गत एक व्यापक अभियान राबविण्याच्या उद्देशाने शासनाने हा निर्णय घेतला
आहे.
अभियानाद्वारे या योजनेची संपूर्ण
माहिती देऊन रोजगार हमी योजनेद्वारे गावाचा विकास करण्यासाठी प्रचार आणि प्रसिध्दी
करण्यात येईल. या अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत, ग्रामसभेचा सहभाग निश्चित करणे,
गावाचा विकास आराखडा निश्चित करणे, कामांचे गुणवत्तापूर्ण नियोजन करणे, मजुरांची
नोंदणी करणे, जलसाक्षरता अभियान राबविणे, योजनेशी संबंधित अभिलेख अद्ययावत करणे
इत्यादी बाबींचा समावेश राहील.
महाराष्ट्रात 2011-12 या वर्षात या
योजनेची उत्कृष्ट अंमलबजावणी करणारी कार्यालये, अधिकारी व कर्मचारी यांना अभियान
कालावधीत पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
या
अभियानांतर्गत घेण्यात येणारी कामे ही निरंतर स्वरुपाची असून अभियानादरम्यान
त्यांना गती देण्यात येईल. अभियान संपल्यानंतर सुद्धा ही कामे सुरु ठेवण्यात
येतील. तसेच दरवर्षी याच कालावधीत महात्मा गांधी नरेगा अभियान राबविण्यात येईल.
No comments:
Post a Comment