Monday, 17 September 2012

ॲट्रासीटी प्रकरणाच्या जनसुनावणीसाठी 7 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन




           मुंबई, दि. 17 : राष्ट्रीय मानवी हक्क आयोगातर्फे ॲट्रासीटीच्या गुन्ह्यांबद्दल दाखल केलेल्या प्रकरणांवर देशातील विविध राज्यात जनसुनावणी घेतल्या जात आहेत. त्या अंतर्गत महाराष्ट्रात 29 व 30 नोव्हेंबर रोजी पुणे शहर येथे जनसुनावणी होणार असून 1  डिसेंबर 2012 रोजी मुंबई येथे मुख्य सचिव, वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी तसेच अशासकीय संस्था यांच्याबरोबर बैठक आयोजित करण्यात आली आहे. या जनसुनावणीत ॲट्रासीटीने पिडीत अनुसूचित जातींच्या नागरिकांनी आपल्या प्रकरणांवर सुनावणी होण्यासाठी 7 ऑक्टोबर 2012 पूर्वी आयोगाकडे अर्ज करावा, असे आयोगामार्फत कळविण्यात आले आहे.
            या जनसुनावणीमध्ये पुणे येथे अनुसूचित जातीच्या पिडीत नागरिकांच्या व्यथा आणि शासकीय संस्थांकडून न्याय मिळण्यामध्ये त्यांना येणाऱ्या अडचणींबाबत संबंधितांचे म्हणणे ऐकून घेण्यात येणार आहे.
ॲट्रासीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, अनुसूचित जातीसाठी असलेल्या कल्याणकारी योजना कार्यान्वित करणे आणि पिडितांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे या उद्देशाने 1 डिसेंबर रोजी मुंबई येथे आयोगामार्फत राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक तसेच वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी यांच्या सोबत चर्चा करण्यात येणार आहे. याबरोबरच आयोग स्थानिक अशासकीय संस्था तसेच मागास जातींच्या लोकांचा सामाजिक स्तर उंचाविण्यासाठी कार्यरत सामाजिक संस्था व मानवी हक्क मंडळे यांना ॲट्रासीटीबाबत तक्रार करताना येणाऱ्या अडचणीचाही विचार यावेळी करणार आहे. 

No comments:

Post a Comment