Tuesday, 11 September 2012

सौहार्दपूर्ण वातावरणात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा - मुख्यमंत्री


      मुंबई, दि. 11 : सुरक्षाविषयक सर्व प्रकारची काळजी घेऊन, ध्वनीप्रदूषणविषयक सर्व कायदे काटेकोरपणे पाळून महाराष्ट्राची अभिमानास्पद परंपरा असलेला सार्वजनिक गणेशोत्सव पर्यावरणपूरक वातावरणात साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केले.
     बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील, मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील, मुंबई उपनगरचे पालकमंत्री नसीम खान, बृहन्मुंबईचे महापौर सुनील प्रभू, मुख्य सचिव जयंत कुमार बाँठिया, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव अमिताभ राजन, पोलीस महासंचालक संजीव दयाळ, मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह, सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष ॲङ नरेश दहिबावकर, पदाधिकारी कुंदन आगसकर व अन्य उपस्थित होते.
     मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईमध्ये 10 हजार 300 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत.  याशिवाय दीड लाखाहून अधिक घरगुती गणपतींचे पूजन होते.  गणेशोत्सव शांततापूर्ण वातावरणात साजरा करण्याची मुंबईची परंपरा आहे.  ही परंपरा यापुढेही कायम टिकविण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.  सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार रात्री दहा नंतर ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यावरील बंदीचे पालन सर्वांनी काटेकोरपणे करावे.  यासंदर्भात राज्य शासनाला न्यायालयाने दिलेल्या अधिकारांनुसार रात्री दहा ते बारापर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास दोन दिवसांसाठी सूट देता येईल.  समितीने स्थानिक प्रशासनाशी संपर्कात राहून हे दोन दिवस निश्चित करून घ्यावेत.  विसर्जनाच्या मिरवणुकीत रात्री 12 वाजेपर्यंत डेसिबलच्या मर्यादेचे पालन करून वाद्य वाजविता येतील. मात्र, मध्यरात्रीनंतर फक्त पारंपरिक वाद्ये वाजविता येतील.  त्यासाठी ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही.  मिरवणुकीच्या मार्गावरील शांतता क्षेत्र म्हणून जाहीर केलेली रुग्णालये आदी ठिकाणी शक्यतो रुग्णांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने मिरवणुकांचे आयोजन करावे.
      गणेशोत्सवादरम्यान कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणसेवकांनी पोलिसांच्या मदतीने आपापल्या उत्सवस्थळी योग्य ती काळजी व खबरदारी घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. गृहमंत्री आर.आर.पाटील यांनीही गणेशोत्सवादरम्यान मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलिसांना सहकार्य करून गणेशोत्सव शांततामय वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले.
-----0-----

No comments:

Post a Comment