Monday, 19 November 2012

मंत्रालयातील पहिल्या आंतरविभागीय ई-फायलिंग प्रक्रियेचा मुख्य सचिवांच्या हस्ते शुभारंभ



             मुंबई, दि. 19: माहिती तंत्रज्ञान विभागाकडून आलेल्या ई-फाईलवर डिजीटल सही करून मुख्य सचिव जयन्त कुमार बाँठिया यांनी मंत्रालयातील पहिल्या आंतरविभागीय  ई- फाईलिंग प्रक्रियेचा आज शुभारंभ केला.
            मुख्य सचिवांनी आपल्या कार्यालयातील संगणकावर माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून ई ऑफीस प्रणालीवर आलेल्या राज्य सेतू केंद्रासंदर्भातील फाईल उघडली आणि त्यावर डिजीटल शेरा आणि सही करून क्षणात ती फाईल पुन्हा मुळ विभागाकडे पाठवून दिली.
     ई-फायलिंग कार्य पध्दतीमुळे कमी वेळेत अधिक काम करणे शक्य होणार असून वेळेची बचत आणि कामाची द्विरुक्ती टाळण्यास मदत होऊन प्रशासनात पारदर्शकता आणि गतिमानता येईल. या प्रक्रियेचा टप्प्याटप्याने मंत्रालयातील सर्वच विभागांनी अवलंब करावा, असे मुख्य सचिव यावेळी म्हणाले.
            यावेळी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सचिव राजेश अग्रवाल, मुख्य सचिवांच्या उपसचिव प्राजक्ता लवंगारे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अवर सचिव डॉ.संतोष भोगले, लक्ष्मीकांत गर्जे आदी उपस्थित होते.
            मंत्रालयात लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर शासकीय दस्तांऐवज व माहितीचे संकलन कमी जागेत आणि प्रतिबंधात्मक पध्दतीने करण्याकडे लक्ष देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ई-फायलिंग ही कार्यपध्दती जानेवारी 2013 पासून सर्व विभागांमध्ये सुरु करण्यात येणार आहे.
मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालय, मुख्य सचिवांचे कार्यालय, माहिती तंत्रज्ञान विभाग, नियोजन विभाग, वित्त विभाग आणि सामान्य प्रशासन विभाग या विभागांमध्ये ई-फायलिंग प्रक्रिया सुरु करण्याचे काम चालू असून मुख्यमंत्री कार्यालय, मुख्य सचिवांचे कार्यालय तसेच माहिती व तंत्रज्ञान विभागात ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत आतापर्यंत या माध्यमातून 6500 अधिकारी- कर्माचाऱ्यांचे ई-मेल तयार करण्यात आले असून त्यांना डिजीटल स्वाक्षरी प्रदान केली जात आहे. त्याचबरोबर प्रत्येक विभागात ई-फाईलिंगच्या प्रक्रियेस वेग यावा यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येत आहेत.

No comments:

Post a Comment