Thursday, 1 November 2012

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पाणी आरक्षण बैठक संपन्न



 जळगांव, दि. 1 :-जिल्हयातील विविध धरणांमध्ये उपलब्ध असलेला पाणी साठा टंचाईच्या काळात कशा पध्दतीने वापरावा याचे नियोजन करुन संबंधीत धरणातील पाणी साठा आरक्षित करण्याकरिता पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज सायंकाळी बैठक संपन्न झाली.
            या बैठकीस जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हा परिषदेच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, अप्पर जिल्हाधिकारी  तथा प्र. मनपा आयुक्त सोमनाथ गुंजाळ, तापी सिंचन विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता  व्ही. डी. पाटील, गिरणाचे अधिक्षक अभियंता श्री. पवार, कार्यकारी अभियंता श्री. मोरे, वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री. वाघमारे, एम. जी. पी. चे कार्यकारी अभियंता जैन, जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे ठाकूर, सर्वश्री. प्रांताधिकारी गणेश मिसाळ, रविंद्र राजपूत, हनुमंत हुलवडे, राहूल मुंडके आदि उपस्थित होते.
        यावेळी ना. देवकर यांनी गिरणा, वाघुर, अंजनी, हातनुर, सुकी, बहुळा, सूर, मन्याड, बोरी आदि विविध धरणातील पाण्याच्या स्थितीविषयी धरणनिहाय आढावा घेतला. यात वाघुर मध्ये 0.56 टक्के , गिरणा 16.69 टक्के, मन्याड 12.5 टक्के, बोरी 51 टक्के, सुकी 100 टक्के, तोंडापूर 19 टक्के, अंजनी 32.34 टक्के असा 31 ऑक्टोंबर 2012 अखेर पर्यंतच्या उपयुक्त जलसाठा असल्याची माहिती  बैठकीत देण्यात आली.
            गिरणा धरणातून दिले जाणारे पाणी दापो-याच्या पुढे दिल्यास जळगांव महानगरपालिकेला ते पाणी वापरता येईल. त्यामुळै सदरच्या पाण्यावर मनपाचे आरक्षण निश्चित करण्याची मागणी मनपा आयुक्त सोमनाथ गुंजाळ यांनी केली. जळगांव शहराला रोज 100 एमएलडी पाणी आवश्यक असून गिरणातून पाणी मिळाल्यास जून अखेर पर्यत पाणी टंचाई भासणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
            ज्या गावांच्या पाणी पुरवठा योजनांना विविध धरणातून पाणी पुरवठा होत आहे. त्या ठिकाणचे सदरच्या योजनेचे वीज कनेक्शन थकबाकी अभावी वीज वितरण कंपनीने तोडू नये याकरिता जिल्हा प्रशासनाने तसा प्रस्ताव एमएसईबीकडे पाठविण्याची सूचना ना. देवकर यांनी केली. कारण टंचाईच्या काळात वीज बील भरण्यासाठी वीज वितरण कंपनीने सवलत देणे आवश्यक असून त्याकरिता प्रशासनाने पाठपुरावा करावे असे त्यांनी सांगितले.
            जिल्हयातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. मग अशा गावांच्या पाणी पुरवठा योनजेने कनेक्शन तोडल्यास त्या गावांना टॅकरने पाणी पुरवठा करावा लागेल. त्याचा खर्च महिन्याच्या वीज बिलापेक्षा जास्त जाऊ शकतो म्हणून टंचाईच्या काळात जून अखेर पर्यत वीज वितरण कंपनीने सदरची थकबाकी भरण्याकरिता सवलत दयावी म्हणून आपण ही राजयस्तरावर प्रयत्न करु  असे आश्वासन ना. देवकर यांनी बैठकीत दिले.

No comments:

Post a Comment