मुंबई, दि.
29 :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या
निमित्ताने चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे जमणाऱ्या नागरिकांना महापालिका
प्रशासनातर्फे आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. त्यासाठी
प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाची भूमिका यशस्वीरित्या पार पाडावी, अशा सूचना मुख्य
सचिव जयन्त कुमार बाँठिया यांनी आज येथे दिल्या.
मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीची बैठक झाली. त्यावेळी ते
बोलत होते. महापरिनिर्वाण दिनासाठी जमणाऱ्या अनुयायांना पिण्याच्या पाण्याबरोबरच
स्वच्छतागृहांची उपलब्धता करून द्यावी. वाहतुकीचे नियोजन करून मार्गदर्शक फलक
जागोजागी लावण्यात यावेत. वैद्यकीय सेवा आणि सुसज्ज रुग्णवाहिका आवश्यक त्या
प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात तसेच याठिकाणी मदत केंद्र आणि माहिती केंद्रही
सुरू करण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी यावेळी दिले.
मुंबई
महापालिकेच्यावतीने चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क या परिसरात करण्यात आलेल्या विविध
सोयी-सुविधांची माहिती उपायुक्त श्री. क्षीरसागर यांनी यावेळी दिली.
बैठकीस
नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंग, परिवहन विभागाचे प्रधान सचिव
शैलेशकुमार शर्मा, माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव प्रमोद नलावडे, मुंबईचे
जिल्हाधिकारी चंद्रशेखर ओक, मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी संजय देशमुख, समन्वय
समितीचे महेंद्र साळवे, चंद्रकांत कांबळे, नागसेन कांबळे, भन्ते राहुल मित्र
आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment