मुंबई, दि. 20 : ठाणे,
पुणे, धुळे आणि वाशीम जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रिक्त
जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 23 डिसेंबर 2012 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा
राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केली आहे. संबंधित निवडणूक विभाग आणि
निर्वाचक गणांमध्ये आज (ता.20) मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू होईल, असेही
त्यांनी म्हटले आहे.
धुळे जिल्हा परिषदेच्या कोडीद,
भरवाडे, मांजरी, सामोडे, मालपूर आणि कासारे, तर वाशीम जिल्हा परिषदेच्या चिंचाबाभर
निवडणूक विभागासाठी; तसेच डहाणू (ठाणे) पंचायत समितीच्या
कैनाड, तर पुरंदर (पुणे) पंचायत समितीच्या भिवडी निर्वाचक
गणासाठी ही पोटनिवडणूक होत आहे. आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी
नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्राची प्रत व जात वैधता प्रमाणपत्राची प्रत
जोडणे आवश्यक आहे. नामनिर्देशनपत्राच्या छाननीच्या वेळी मूळ जात प्रमाणपत्र व जात
वैधता प्रमाणपत्र तपासणीसाठी सादर करणे बंधनकारक राहील.
या निवडणुकीसाठी 4 ते 8
डिसेंबर 2012 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दिली व स्वीकारली जातील. 10 डिसेंबर
2012 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रासंदर्भात न्यायालयात
अपील नसलेल्या ठिकाणी 15 डिसेंबर 2012 रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील.
अपील असलेल्या ठिकाणी 19 डिसेंबर 2012 रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. 23
डिसेंबर 2012 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या कालावधीत मतदान होईल. 24
डिसेंबर 2012 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणीस सुरवात होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर
आचारसंहिता संपुष्टात येईल, असेही राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद
केले आहे.
No comments:
Post a Comment