Saturday, 3 November 2012

संसदीय लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी तरुणांनी सहभाग घ्यावा विधीमंडळ प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे

जळगांव, दि. 3 :-भारतीय संसदीय लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी तरुणांनी जास्तीत जास्त सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र विधीमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी केले ते आज सकाळी जे. डी. सी. सी. बॅकेच्या सभागृहात आयोजित करण्यांत आलेल्या संसदीय प्रशिक्षण उपक्रमाचे उदघाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर खासदार ईश्वरलाल जैन, माजी आमदार उल्हास पवार, आमदार मनीष जैन आदि उपस्थित होते. तसेच या प्रशिक्षण शिबीरास तरुण वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.
सदरच्या दोन दिवशीय शिबीराचे आयोजन वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, विधान भवन व मनीष जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विदयमाने करण्यात आले. संसदीय कामकाज पध्दती व भारतीय लोकशाहीचे महत्व   या  विषयावर तरुणांना तज्ञ वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी खासदार ईश्वरलाल जैन, ज्येष्ठ पत्रकार नागेश केसरी, आमदार जैन यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. यात संसदीय लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी तरुणांनी ग्रामस्तरावरुनच राजकारणात सहभाग घ्यावा असे मत मांडण्यात आले. तसेच भारतात संसदीय लोकशाही यशस्वी होत आहे त्याचे कारण म्हणजे लोकांचा संसदीय लोकशाहीवरचा  विश्वास हेच असल्याचे मान्यवरांनी सांगितले.
प्रांरभी डॉ. अनंत कळसे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन सदरच्या दोन दिवशीय शिबीराचे उदघाटन करण्यात आले.
* * * * * * * *

No comments:

Post a Comment