Thursday, 1 November 2012

गावांच्या सर्वागिण विकासासाठी पदाधिका-यांनी प्रयत्न करावेत -कृषि राज्यमंत्री ना. गुलाबराव देवकर



 जळगांव, दि. 1 :-  शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकांना मिळावा म्हणून गावांमधील सरपंच व उपसरपंच आदिंना शासनाच्या योजनांची माहिती देऊन त्या योजना गावांमध्ये कार्यक्षमपणे राबविल्या जाव्यात. तसेच त्यातून गावांचा सर्वागीण विकास घडवून आणण्यासाठी गावच्या पदाधिका-यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन कृषि राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांनी केले.
धरणगांव येथे कृषि विभाग, गट विकास अधिकारी व तहसिलदार यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित सरपंच व अभिसरण मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी ना. देवकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर धरणगांव पंचायत समिती सभापती राजूभैय्या पाटील, धरणगांव तालुका आत्मा समितीचे अध्यक्ष एन. डी. पाटील, जळगाव प्रांताधिकारी रविंद्र राजपूत, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी किसन मुळे, गट विकास अधिकारी      तडवी, माजी आमदार हरिभाऊ महाजन आदि मान्यवर उपस्थित होते.
ना. देवकर पुढे म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाकडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कार्यक्रम व एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम हे महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविले जात आहेत. राज्यात मागील वर्षी जलसंधारणाची चांगली कामे झाली असून छोटी धरणे, लहान – मोठे तलाव, बंधारे आदि मधून गाळ काढला गेल्याने पाणी साठवण क्षमतेत वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
महात्मा गांधी नरेगा योजना म्हणजे सर्वसामान्य माणसाला रोजगाराची हमी असून या अंतर्गत विहीर खोदणे, शेततळे, सार्वजनिक शौचालये, शेळी पालन शेड, कुक्कुटपालन शेड आदि 30 प्रकारच्या कामांचा समावेश असून ही योजना तळागाळातील लोकापर्यत पोहोचावी म्हणून सदरच्या मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती ना. देवकर  यांनी दिली.
सदरच्या योजनेचे पेमेंट हे पंधरा दिवसात संबंधित मजुरांना मिळालेच पाहीजे याची काळजी अधिका-यांनी घ्यावी.  धरणगांव तालुक्यातील काही गावांमधील रोहयोची मजुरी मिळाली नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्याची दखल गट विकास अधिकारी व तहसिलदार यांनी घ्यावी व त्यांना लवकरात लवकर मजुरी मिळण्याची कार्यवाही करावी अशी सूचना  ना. देवकर यांनी यावेळी केली.
एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत धरणगांव तालुक्यात दोन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम मंजूर झाले असून त्याअंतर्गत 15 गावाच्या गटाला 7 कोटी 13 लाखाचा निधी प्राप्त झालेला आहे. त्या निधीतून गावांच्या परिसरात जलसंधारणाच्या कामाबरोबरच महिला बचत गट, छोटे कुटीर उदयोग आदि बरोबरच गावांचा सर्वागीण विकास साधला जाणार असल्याचे ना. देवकर यांनी सांगितले. तसेच सदरचा प्राप्त झालेला निधी मंजूर झालेल्या विकास कामावरच खर्च करण्याची सूचना त्यांनी केली.
प्रारंभी पालकमंत्री ना. देवकर यांचे हस्ते दीप प्रज्वलन करुन मेळाव्यास सुरुवात झाली. त्यानंतर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. मुळे यांनी महात्मा गांधी नरेगा व एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमाची माहिती मेळाव्यात दिली. सदरच्या कार्यक्रमात राबविण्यात येणा-या विविध 30 प्रकारच्या शासकीय योजनांची माहिती त्यांनी दिली.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून होणा-या कामाचे सोशल ऑडिट ग्रामसेवकासमोर होणार असल्याने या योजनेत कोणताही भ्रष्टाचार होऊ  शकत नाही. त्यामुळे हा एक अभिनव उपक्रम असल्याची माहिती जळगांव प्रांताधिकारी रविंद्र राजपूत यांनी दिली. तसेच सदरच्या योजनेसंबंधी उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी धरणगांव तालुक्यांमधील काही सरपंच, उपसरपंच आदिंनी सदरच्या योजनेसंबंधीच्या काही तक्रारी व सूचना मांडल्या.
मेळाव्यात ना. देवकर यांच्या हस्ते धरणगांव तालुक्यातील सतखेडा  येथील प्रगतशिल  व नुकताच राज्य कृषि भुषण पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री. शरद  गंगाधर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जलसंधारणाची चांगली कामे केलेल्या राजेश दत्तात्रय अतरदे (नांदेड), मधुकर देशमुख (अनोरे), मुकेश तिवारी (साकरे), संजय पाटील (साकरे) व विकास पाटील  (नांदेड) आदि शेतक-यांना पालकमंत्री ना. देवकर यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
 
गांवहाळ कामांचे भूमिपूजन
पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांनी आज सकाळी धरणगांव तालुक्यातील टहाकळी , फुलपाट, दोनगांव बु. व दोनगांव खु. आदि चार गावांमधील गांवहाळच्या कामाचे भूमीपूजन केले. सदरचे हाळ कृषि विभागाच्या एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमांतून मंजूर करण्यात आलेले आहेत. त्याकरिता प्रत्येकी सुमारे 65 ते 70 हजारांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन तालुका कृषि अधिकारी बोरसे यांनी केले. व आभार उपविभागीय कृषि अधिकारी श्री. धाणवडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment