Friday, 16 November 2012

पत्रकारांनी संशोधन वृत्ती जागृत ठेवावी : ज्येष्ठ पत्रकार श्रीकृष्ण जळूकर



पत्रकारांनी संशोधन वृत्ती जागृत ठेवावी

                                            : ज्येष्ठ पत्रकार श्रीकृष्ण जळूकर

            जळगांव, दि. 16 :- पत्रकारितेमध्ये बातमीचा शोध घेणे हा महत्वाचा गुण आहे. त्यामुळे पत्रकारांनी स्वत:मधील संशोधन वृत्ती जागृत ठेवल्यास पत्रकारितेची उंची वाढेल असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार श्रीकृष्ण जळूकर यांनी केले. ते आज ( दि 16 नोव्हेंबर ) राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त जळगांव जिल्हा पत्रकार संघाच्या भंवरलाल जैन सभागृहात आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
            यावेळी ज्येष्ठ पत्रकार  विदयाधर पानट, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत काळुंखे, पत्रकार संघाचे अशोक भाटीया, जिल्हा माहिती अधिकारी रजेसिंग वसावे, जैन इरिगेशनचे जनसंपर्क अधिकारी किशोर कुलकर्णी, एम.जे. महाविदयालयाचे जनसंज्ञापन विभागाचे प्रा. अशिष मलबारी आदिसह पत्रकारवृंद मोठया संख्येने उपस्थित होते.
श्री. जळूकर पुढे म्हणाले की, पत्रकारांनी सर्व वर्तमानपत्राचे वाचन करुन नावीन्यतेचा ध्यास घेतला पाहीजे व बातमीत नावीन्यता असल्यास पत्रकारिता ही प्रगल्भ होईल. तसेच  पत्रकारांनी स्वत:ची डायरी मेनटेन करावी. ज्यामुळे पुढील बातमीकरिता संदर्भ उपलब्ध होईल. तसेच एखादया वृत्तामुळे पत्रकारिता बदनाम होत असेल अथवा माध्यमांच्या स्वातंत्रयावर निर्बंध आणले जात असतील तर डायरी मधील त्या वृत्तासंबंधी नमूद केलेले संदर्भ महत्वपूर्ण असल्याची माहिती श्री. जळूकर यांनी दिली. त्याबरोबरच पत्रकारांनी चिंतन, लेखन, वाचन व मनन या चतु:सूत्रीचा उपयोग  केल्यास त्यांच्यामध्ये बहुश्रृतितता निर्माण होईल असे त्यांनी म्हटले.
            सदयस्थितीत प्रसार माध्यमांमध्ये प्रचंड गतिमानता आली असल्याचे ज्येष्ठ पत्रकार विदयाधर पानट यांनी नमूद करुन त्याप्रमाणे जिल्हयाची पत्रकारिता उंचावत असल्याचे सांगितले. जिल्हयातील पत्रकारांध्ये परस्पर संवाद असल्याने पत्रकारितेचा विकास होत आहे. तसेच पत्रकारांनी आत्मभान, आत्मचिंतन व अंर्तमुख होऊन पत्रकारिता करण्याचे आवाहन त्यांनी केले.
 पत्रकारांनी समयसूचकतेचे भान ठेवून पत्रकारिता केल्यास ती  कोणत्याही वादविवादात अडकणार नाही.  याबरोबरच प्रसार माध्यमांच्या स्वातंत्रयावरही कोणतेही बंधने येणार नाहीत याची काळजी घेण्याची जबाबदारी आपली असल्याचे प्रतिपादन दै. पुण्यनगरीचे वृत्तसंपादक अनिल पाटील यांनी आपल्या भाषणात केले. तसेच प्रसार माध्यमांकडून समाजाच्या मोठया अपेक्षा असल्याने पत्रकारांनीही बहुश्रृतता अंगी बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले. आज ही अनेक पत्रकारांनी पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्याचे कळत नाही. त्याकरिता पत्रकारांनी विषय समजून घेऊन त्याप्रमाणे प्रश्न विचारुन समयसूचकता दाखवावी असे   श्री. पाटील यांनी सांगितले.
            त्यानंतर पत्रकारांना हस्ताक्षर सुधारण्याचे प्रशिक्षण जैन इरिगेशनचे जनसंपर्क अधिकारी किशोर कुलकर्णी यांनी दिले. सदरच्या कार्यक्रमाचा व हस्ताक्षर सुधार प्रशिक्षणाचा लाभ जिल्हयातील पत्रकार वृंदानी, मोठया संख्येने उपस्थित राहून घेतला.
            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशफाक पिंजारी यांनी केले तर आभार अशोक भाटीया यांनी मानले
* * * * * * *


No comments:

Post a Comment