Friday, 30 November 2012

उत्कृष्ट व्याघ्र राज्य 2012 पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना प्रदान



              मुंबई, दि. 30 : सँक्चुरी एशिया वाईल्ड लाईफ, डीएसपी ब्लॅक रॉक, ड्युईस बँक यांच्या संयुक्त विद्यमाने उत्कृष्ट व्याघ्र राज्य 2012 हा राज्याला मिळालेला पुरस्कार राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एनसीपीए, टाटा थिएटर येथे स्वीकारला.
            महाराष्ट्राला विपुल वनसंपदा लाभली असून 6 राष्ट्रीय उद्याने, 40 अभयारण्ये आणि 4 व्याघ्र प्रकल्प यांचा त्यात समावेश आहे. ताडोबा आणि पेंच या व्याघ्र प्रकल्पांसाठी विशेष व्याघ्र संरक्षण बल निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली असून जंगलातील अवैध शिकारी आणि घुसखोर यांची माहिती देणाऱ्या व्यक्तींना इनाम देण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र निधीचीही तरतूद करण्यात आली आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, स्थानिक आदिवासींना वनरक्षकांच्या भरतीत प्राधान्य देण्यात आले असून 1200 वनरक्षकांची अलीकडेच भरती करण्यात आली आहे.
            महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी श्रीनिवास रेड्डी, गोवा येथील अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक रिचर्ड डिसोझा, केरळातील वायनाड प्रकृती संरक्षण समितीचे एन. बदुशा, दक्षिण वायनाड वनक्षेत्रातील विभागीय वन अधिकारी पी.धनेशकुमार या कर्तव्यनिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाईल्ड लाईफ सर्व्हिस पुरस्कार  तसेच यंग नॅचरलिस्ट ॲवॉर्ड, ग्रीन टिचर ॲवॉर्ड, विंग अंडर दी विंग्ज, लाईफ टाईम सर्व्हिस ॲवॉर्ड या पुरस्कारांचे विविध निसर्गप्रेमींना प्रदान करण्यात आले.
            यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, सँक्चुरी एशिया वाईल्ड लाईफचे बिट्टु सहेगल, महेंद्र कोठारी, प्रसिद्ध दिग्दर्शिका विजया मेहता, डीएसपी ब्लॅक रॉक, ड्युईस बँक यांचे पदाधिकारी आणि निसर्गप्रेमी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment