मुंबई, दि. 20 : राज्यातील
एकूण 25 जिल्ह्यांमधील 709 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 23 डिसेंबर 2012 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक
आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केली आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात
आज मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू होईल, असेही त्यांनी
म्हटले आहे.
या सर्व ग्रामपंचायतींच्या
जानेवारी ते मार्च 2013 या कालावधीत मुदती संपत आहेत. या निवडणुकांसाठी 31 ऑक्टोबर 2012 ची मतदार यादी ग्राह्य धरली जाईल. नामनिर्देशनपत्रे
1 ते 5 डिसेंबर 2012 या कालावधीत दिली व स्वीकारली जातील. सुट्टीच्या
दिवशी नामनिर्देशनपत्रे दिली व स्वीकारली जाणार नाहीत. 6 डिसेंबर 2012 रोजी नामनिर्देशनपत्रांची
छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 8 डिसेंबर 2012 रोजी सकाळी
11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी दुपारी 3 वाजेनंतर निवडणूक चिन्ह नेमून देऊन अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी
प्रसिद्ध केली जाईल. 23 डिसेंबर 2012 रोजी सकाळी
7.30 ते सायंकाळी 5 या कालावधीत मतदान होईल. दुसऱ्या
दिवशी 24 डिसेंबर 2012 रोजी मतमोजणी होईल. निकाल घोषित झाल्यानंतर
आचारसंहिता संपुष्टात येईल.
आरक्षित जागेवर निवडणूक
लढविणाऱ्या व्यक्तीकडे जात पडताळणी समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास
नामनिर्देशनपत्रासोबत या समितीकडे जात वैधता प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाचा
पुरावा जोडणे आवश्यक राहील. त्याचबरोबर निवडून आल्याच्या दिनांकापासून 6
महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे विहित नमुन्यातील हमीपत्रही
उमेदवाराने देणे बंधनकारक आहे, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद
केले आहे.
सर्व ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान
यंत्रांद्वारे
(EVM) मतदान घेण्यात येईल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक खर्चाचा
दैनंदिन हिशोब सादर करणे आवश्यक राहील; तसेच निवडणुकीनंतर 30 दिवसांच्या आत एकूण खर्चाची माहिती सादर करावी लागेल. ती मुदतीत सादर न करणाऱ्या उमेदवारांना अनर्ह ठरविण्यात
येते, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही राज्य निवडणूक आयुक्तांनी केले
आहे.
जिल्हानिहाय निवडणूक होणाऱ्या
ग्रामपंचायतींची संख्या अशी: ठाणे- 65, रायगड- 9, रत्नागिरी-
10, सिंधुदुर्ग- 16, नाशिक- 3, जळगाव- 102, अहमदनगर- 69,
पुणे- 92, सोलापूर- 65, सातारा- 14, सांगली- 6, कोल्हापूर-
12, बीड- 158, नांदेड- 6, परभणी- 2, उस्मानाबाद- 1, लातूर-
3, अमरावती- 11, अकोला- 5, बुलडाणा- 46, वाशीम- 1, वर्धा-
3, चंद्रपूर- 1, गोंदिया- 1, गडचिरोली- 8, एकूण- 709.
No comments:
Post a Comment