Friday, 30 November 2012

उत्कृष्ट व्याघ्र राज्य 2012 पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना प्रदान



              मुंबई, दि. 30 : सँक्चुरी एशिया वाईल्ड लाईफ, डीएसपी ब्लॅक रॉक, ड्युईस बँक यांच्या संयुक्त विद्यमाने उत्कृष्ट व्याघ्र राज्य 2012 हा राज्याला मिळालेला पुरस्कार राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एनसीपीए, टाटा थिएटर येथे स्वीकारला.
            महाराष्ट्राला विपुल वनसंपदा लाभली असून 6 राष्ट्रीय उद्याने, 40 अभयारण्ये आणि 4 व्याघ्र प्रकल्प यांचा त्यात समावेश आहे. ताडोबा आणि पेंच या व्याघ्र प्रकल्पांसाठी विशेष व्याघ्र संरक्षण बल निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली असून जंगलातील अवैध शिकारी आणि घुसखोर यांची माहिती देणाऱ्या व्यक्तींना इनाम देण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र निधीचीही तरतूद करण्यात आली आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, स्थानिक आदिवासींना वनरक्षकांच्या भरतीत प्राधान्य देण्यात आले असून 1200 वनरक्षकांची अलीकडेच भरती करण्यात आली आहे.
            महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी श्रीनिवास रेड्डी, गोवा येथील अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक रिचर्ड डिसोझा, केरळातील वायनाड प्रकृती संरक्षण समितीचे एन. बदुशा, दक्षिण वायनाड वनक्षेत्रातील विभागीय वन अधिकारी पी.धनेशकुमार या कर्तव्यनिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाईल्ड लाईफ सर्व्हिस पुरस्कार  तसेच यंग नॅचरलिस्ट ॲवॉर्ड, ग्रीन टिचर ॲवॉर्ड, विंग अंडर दी विंग्ज, लाईफ टाईम सर्व्हिस ॲवॉर्ड या पुरस्कारांचे विविध निसर्गप्रेमींना प्रदान करण्यात आले.
            यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, सँक्चुरी एशिया वाईल्ड लाईफचे बिट्टु सहेगल, महेंद्र कोठारी, प्रसिद्ध दिग्दर्शिका विजया मेहता, डीएसपी ब्लॅक रॉक, ड्युईस बँक यांचे पदाधिकारी आणि निसर्गप्रेमी उपस्थित होते.

दहावी व बारावीच्या गुणपत्रिका मिळणार 3 डिसेंबर रोजी

                मुंबई, दि. 30 : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) ऑक्टोबर, 2012 चा निकाल 28 नोव्हेंबर, 2012 रोजी जाहीर करण्यात आला आहे. गुणपत्रिकांचे वाटप संबंधित माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना सोमवार दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी
11 वाजता करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप त्याच दिवशी दु. 3 वाजता करण्यात येईल, असे सचिव, राज्य मंडळ, पुणे यांनी कळविले आहे.
            ज्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करावयाची आहे त्यांनी मूळ गुणपत्रिका प्राप्त झाल्यावर (मंगळवार दि. 4 डिसेंबर 2012 पासून) विहित नमुन्यात विहित शुल्कासह (गुरुवार दि. 13 डिसेंबर,2012 पर्यंत) संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करावयाचा आहे. अर्जासोबत मूळ गुणपत्रिकेची छायाप्रत जोडणे अनिवार्य आहे. इंटरनेटवरील गुणपत्रिकेच्या आधारे गुणपडताळणीसाठी केलेले अर्ज अवैध ठरविण्यात येतील.
            ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची छायाप्रत पाहिजे असेल त्यांनी ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर विहित नमुन्यात विहित शुल्कासह मंगळवार दि. 18 डिसेंबर पर्यंत संबंधित मंडळाकडे अर्ज करावयाचा आहे. अर्जासोबत मूळ गुणपत्रिकेची किंवा ऑनलाईन गुणपत्रिकेची छायाप्रत जोडणे अनिवार्य आहे. विहित नमुन्यातील अर्ज मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
            ज्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी-मार्च 2013 मध्ये होणाऱ्या परीक्षेस प्रविष्ट व्हावयाचे आहे, त्यांनी नियमित शुल्कासह गुरुवार दि. 13 डिसेंबर पर्यंत व विलंब शुल्कासह मंगळवार दि. 18 डिसेंबर पर्यंत माध्यमिक शाळांकडे / कनिष्ठ महाविद्यालयांकडे आवेदनपत्र सादर करावीत.
            परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत पुन:श्च परीक्षेस प्रविष्ठ होण्याची संधी सन 2008 पासून लागू करण्यात आली आहे. त्यानुसार ऑक्टोबर 2012 च्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस सर्व विषय घेवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फेब्रुवारी-मार्च 2013 ही संधी उपलब्ध राहील.
            मार्च 2012 मध्ये इयत्ता 12वी मधील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित या विषयांची जुन्या अभ्यासक्रमाची शेवटची परीक्षा घेण्यात आली. या  परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑक्टोबर 2012 व मार्च 2013 या दोन परीक्षांना संधी देण्यात आली आहे.
            भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित या विषयांचे उच्चकरण झाल्याने या विषयांची उच्चीकृत अभ्यासक्रमानुसार प्रथम परीक्षा मार्च 2013 मध्ये होणार आहे. त्यामुळे मार्च 2013 च्या परीक्षेत जुन्या अभ्यासक्रमाचे या विषयाचे जे विद्यार्थी अनुत्तीर्ण होतील, त्या विद्यार्थ्यांना ऑक्टोबर 2013 मध्ये उच्चीकृत अभ्यासक्रमानुसार परीक्षा द्यावी लागेल. मार्च 2013 ही शेवटची संधी राहील.
            विभागीय मंडळनिहाय हेल्पलाईनचे दूरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.
            पुणे- (020) 25536712; नागपूर-(0712) 2553503; औरंगाबाद (0240) 2334228; मुंबई - (022) 27893756; नाशिक -(0253) 2592143; कोल्हापूर -(0231) 2696103; अमरावती - (0721) 2662608; लातूर- (02382)228570; कोकण (2352) 231250.

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षण शुल्कात 7 टक्क्यांनी वाढ



           मुंबई, दि. 30 : उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या शिक्षण शुल्क समितीमार्फत खाजगी संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण शुल्क निश्चित करण्यात आले असून शैक्षणिक वर्ष 2009-10 पासून या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यापुढील शैक्षणिक वर्षी 7 टक्क्यांनी वाढीव शिक्षण शुल्क भरावे लागेल. ही दरवाढ अभ्यासक्रमाच्या पूर्ण कालावधीसाठी लागू राहणार आहे.
            जर सन 2009-10 करिता शैक्षणिक शुल्क एक लाख रुपये व अभ्यासक्रम चार वर्षाचा असेल तर सन 2010-11, 2011-12 व 2012-13 या कालावधीसाठी दरवर्षी एक लाख सात हजार इतके शिक्षण शुल्क आकारण्यात येणार आहे. 
            शासनाने सामाजिक मागास तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी लागू केलेल्या शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेंतर्गत सामाजिक न्याय, आदिवासी आणि उच्च व तंत्र शिक्षण या विभागांनी शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती संबंधित संस्थेकडे करताना वाढीव प्रमाणात 7 टक्के शिक्षण शुल्क अदा करणे आवश्यक आहे.
            हा शासन निर्णय शिक्षण शुल्क समितीच्या पूर्वसहमतीने 7 नोव्हेंबर 2012 रोजी प्रसिध्द झाला असून महाराष्ट्र शासनाच्या www. maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याचा संगणक सांकेतांक 201211071532200408 असा आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक एमटी-सीईटी प्रवेश परीक्षेसाठी सक्षम प्राधिकारी



              मुंबई, दि. 30 : राज्यात सन 2013-14 या शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र या अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी एमटी-सीईटी  प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी सक्षम प्राधिकारी म्हणून संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य,मुंबई यांची नेमणूक करण्यात आली आहे.
            या प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा संचालक, तंत्रशिक्षण यांनी तंत्रशिक्षण संचालनालया अंतर्गत निर्माण करायची असून या परीक्षेचे नियोजन, संनियंत्रण, परीक्षेचा निकाल, विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन आदी जबाबदाऱ्याही संचालक, तंत्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्यावर असणार आहेत.
            हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www. maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक 201210311532148308 असा आहे.

अंशदान निवृत्तीवेतन योजनेतील थकबाकीच्या रक्कमेवर व्याज 1 जून पासून देय



             मुंबई, दि. 30 : नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे 1 जानेवारी 2006 ते 31 मार्च 2009 या कालावधीतील सुधारित वेतनाच्या थकबाकीची रक्कम जमा करण्याकरिता कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे. त्यानुसार थकबाकीची रक्कम 2009 पासून दरवर्षी जून महिन्यात जमा करावयाची आहे. थकबाकीची रक्कम प्रत्यक्षात कोणत्याही दिनांकास जमा केली असली तरी थकबाकीच्या रकमेवरील व्याज प्रत्येक वर्षाच्या 1 जून पासून देय राहील.
            नवीन योजनेंतर्गत जमा होणारे कर्मचाऱ्याचे नियमित मासिक अंशदान व त्यावरील शासनाचे अंशदान अशा एकत्रित रकमेवरील व्याज प्रमाणकाच्या दिनांकापासून अथवा चलनाद्वारे बँकेत पैसे जमा झाल्याच्या दिनांकापासून अनुज्ञेय राहील.
            जिल्हा परिषदा , मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालये तसेच कृषी विद्यापीठे इत्यांदीमधील कर्मचाऱ्यांना उपरोक्त सूचना योग्य त्या फेरफारांसह लागू राहतील..
            हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharshtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 201211161233281505 असा आहे.

Thursday, 29 November 2012

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.


 *मंत्रिमंडळ निर्णय :                                          दिनांक : 29 नोव्हेंबर 2012



       

नगर रचना विभागातील उपसंचालकांच्या पदांची
सहसंचालक पदात श्रेणीवाढ करण्यास मान्यता
नगर रचना संचालनालयातील विभागीय उपसंचालकांची सहा पदे सहसंचालक नगर रचना या पदात श्रेणीवाढ करण्याचा व नगर विकास विभागात सहसंचालक नगर रचना या दर्जाचे सहसचिवांचे एक पद निर्माण करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला. या निर्णयामुळे श्रेणीवाढ झाल्याने सहसंचालक यांची आठ पदे, नवनिर्मित एक पद अशी एकूण 9 पदे व उपसंचालक यांची 15 पदे होतील.
गेल्या काही वर्षात राज्यात नागरीकरणाचे प्रमाण वाढून ते 45 टक्क्यांवर पोचले आहे. देशातील एकूण नागरीकरणाच्या तुलनेत हे प्रमाण दीड पटीने जास्त आहे. राज्याच्या नगर रचना संचालनालयाकडून विकास नियंत्रण नियमावलीचे कामकाज पार पाडले जाते, त्याचप्रमाणे प्रत्येक नगर परिषदा, महानगरपालिका क्षेत्रासाठीचे विकास आराखडे तयार करणे, जिल्ह्यांचे प्रादेशिक विकास आराखडे तयार करणे अशी कामे केली जातात. याशिवाय विविध तांत्रिक कामांची प्रकरणे, न्यायालयीन प्रकरणे, विकास योजनांची तपासणी अशा महत्वपूर्ण कामांचा देखील यात समावेश आहे. या संचालनालयात प्रादेशिक स्तरावर उपसंचालक पदांची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु वाढत्या नागरीकरणामुळे त्याप्रमाणे नवीन धोरणांची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यासाठी अधिक अनुभवी आणि गुणवत्तापूर्ण अधिकाऱ्यांची गरज निर्माण झाली आहे.
74व्या घटना दुरूस्तीनुसार महानगरक्षेत्रासाठी नियोजन समित्या स्थापन झाल्या आहे. या समित्यांचे अध्यक्ष मुख्यमंत्री असून त्यात विधीमंडळ सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी मिळून एकूण 55 ते 60 सदस्यांचा समावेश आहे. त्यामुळे समन्वयासाठी या श्रेणीवाढीची आवश्यकता भासते. नागरीकरणाच्या जटील समस्या विचारात घेऊन जलदगतीने अचूक निर्णय घेणे, त्याचप्रमाणे शाखा कार्यालयावर नियंत्रण ठेवणे यामुळे शक्य होणार आहे.
00000
महाराष्ट्र शिक्षण व रोजगार हमी (उपकर) अधिनियम 1962 मध्ये
सुधारणा करण्यास मान्यता
भांडवली मुल्यावर आधारीत शिक्षण उपकर व रोजगार हमी उपकर आकारण्यासाठी महाराष्ट्र शिक्षण व रोजगार हमी (उपकर) अधिनियम 1962 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली.
·        महानगरपालिकेच्या सुधारणा केलेल्या अधिनियमात पट्टीयोग्य मुल्यावर मालमत्ता कर आकारणी करण्याचे अधिकार बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना नाहीत. महानगरपालिका क्षेत्रात डिसेंबर 2012 पासून भांडवली मुल्यावर मालमत्ता कर आकारणी सुरू होणार असून नागरिकांना कर जमा करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी द्यावा लागतो. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये 1 एप्रिल 2010 पासून नवीन झालेल्या इमारतींचे पट्टीयोग्य मुल्य उपलब्ध नाही. मालमत्ता करासोबतच शिक्षण उपकर व रोजगार हमी उपकर यांची आकारणी केली जाते. त्यामुळे या अधिनियमात सुधारणा करणे आवश्यक ठरले. ज्या नगरपालिका भांडवली मुल्यावर आधारीत मालमत्ता कर आकारणीचा पर्याय स्विकारतील त्याच्या बाबतच सुधारीत तरतुदी लागू होतील. भांडवली मुल्यावर आधारीत राज्य शिक्षण व रोजगार हमी उपकराची आकारणीमुळे कर आकारणीमध्ये पादर्शकता येईल. राज्य शिक्षण उपकर शिक्षणाचा अभिवृद्धीसाठी व रोजगार हमी उपकर ग्रामीण भागातील रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीसाठी उपयोगात आणला जातो.
00000

महापरिनिर्वाण दिनासाठी जमणाऱ्या नागरिकांना प्रशासनातर्फे आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात - मुख्य सचिव



               मुंबई, दि. 29 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे जमणाऱ्या नागरिकांना महापालिका प्रशासनातर्फे आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाची भूमिका यशस्वीरित्या पार पाडावी, अशा सूचना मुख्य सचिव जयन्त कुमार बाँठिया यांनी आज येथे दिल्या.
            मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. महापरिनिर्वाण दिनासाठी जमणाऱ्या अनुयायांना पिण्याच्या पाण्याबरोबरच स्वच्छतागृहांची उपलब्धता करून द्यावी. वाहतुकीचे नियोजन करून मार्गदर्शक फलक जागोजागी लावण्यात यावेत. वैद्यकीय सेवा आणि सुसज्ज रुग्णवाहिका आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात तसेच याठिकाणी मदत केंद्र आणि माहिती केंद्रही सुरू करण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी यावेळी दिले.
मुंबई महापालिकेच्यावतीने चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क या परिसरात करण्यात आलेल्या विविध सोयी-सुविधांची माहिती उपायुक्त श्री. क्षीरसागर यांनी यावेळी दिली.
बैठकीस नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंग, परिवहन विभागाचे प्रधान सचिव शैलेशकुमार शर्मा, माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव प्रमोद नलावडे, मुंबईचे जिल्हाधिकारी चंद्रशेखर ओक, मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी संजय देशमुख, समन्वय समितीचे महेंद्र साळवे, चंद्रकांत कांबळे, नागसेन कांबळे, भन्ते राहुल मित्र आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजची प्रवेश पात्रता परीक्षा 1 व 2 डिसेंबर रोजी



            मुंबई, दि. 29 : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी डेहराडून (उत्तरांचल) येथील राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालयाची प्रवेश पात्रता परीक्षा 1 व 2 डिसेंबर 2012 रोजी कै. गेनबा सोपानराव मोझे हायस्कूल, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड नागपूरकर चाळ, येरवडा पुणे-6 येथे घेण्यात येणार आहे.  ही परीक्षा फक्त मुलांसाठीच आहे. 
            या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांचे वय 1 जुलै 2013 रोजी 11 वर्ष सहा महिनेपेक्षा कमी व 13 वर्षापेक्षा अधिक नाही असे विद्यार्थी पात्र समजण्यात येतील.  म्हणजेच जन्म 2 जुलै 2000 ते 1 जानेवारी 2002 या कालावधीत असावा. विद्यार्थी 1 जुलै 2013 ला कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमध्ये इयत्ता 7 वी या वर्गात शिकत असावा किंवा 7 वी पास असावा.
          सदर परीक्षेचे वेळापत्रक दिनांक , वार,  वेळ,  विषय आणि गुण पुढीलप्रमाणे आहेत :-
            दिनांक 1.12.2012 शनिवार रोजी सकाळी 10 ते 12 इंग्रजी- 125 गुण; दुपारी 14 ते 15.30  गणित- 200 ; दि.2.12.2012 रविवार रोजी सकाळी 10 ते  11 सामान्यज्ञान 75 गुण.
            परीक्षेसाठी इंग्रजी, गणित आणि सामान्यज्ञान या तीन विषयांचे लेखी पेपर असतील. परीक्षार्थींना गणिताचा व सामान्यज्ञानाचा पेपर इंग्रजी अथवा हिंदीमध्ये लिहिता येईल.  गणित व सामान्यज्ञान विषयांच्या प्रश्नपत्रिका इंग्रजी / हिंदी  या भाषेत उपलब्ध होतील.  लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती 5 एप्रिल 2013 रोजी घेण्यात येणार आहेत. 
            या परीक्षेसाठी महाराष्ट्रातून बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र त्यांच्या घरच्या पत्त्यावर पाठविण्यात आलेली आहेत. ज्यांना प्रवेशपत्रे मिळालेली नसतील, त्यांनी परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावरुन प्रिंटआऊट काढून घ्यावी असे आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-1 यांनी कळविले आहे.

दहशतवादाचा सामना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे कौशल्य आत्मसात करण्याची गरज - मुख्यमंत्री



           मुंबई, दि. 29 : दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी पोलीस  यंत्रणांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे कौशल्य  आत्मसात करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे सांगितले.
            महाराष्ट्र पोलीस आणि संशोधन व सुधारणा विभागाच्या संयुक्त विद्यमाने राज्य पोलीस मुख्यालयात आयोजित केलेल्या दहशतवादाचा सामना करण्याबाबतच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. गृहमंत्री आर.आर.पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, पोलीस महासंचालक संजीव दयाळ, तसेच संशोधन आणि सुधारणा विभागाचे पोलीस महासंचालक कुलदीप शर्मा उपस्थित होते.
            मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, दहशतवादाचे स्वरुप व्यापक बनले आहे. शेजारील राष्ट्राकडून पसरवला जाणारा दहशतवाद, धार्मिक दहशतवाद, दहशतवादासाठी होणारा सोशल मिडीयांचा वापर यांच्या मदतीने काही विघातक शक्ती लोकशाहीवर आघात करण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकशाहीवरील हा हल्ला रोखण्यासाठी सक्षम अशी व्यूहरचना आखणे गरजेचे आहे. त्यासाठी या परिसंवादाचा निश्चितच उपयोग होईल. प्रत्येक देशाकडे दहशतवादाबाबत स्वतंत्र असे कायदे आहेत. आपल्याही देशात पोटा सारखे कायदे करण्यात आले आहेत. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी अत्याधुनिक प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच अत्याधुनिक हत्यारांची खरेदी यावर भर देण्याची आवश्यकता आहे. तसेच रेल्वेस्थानक, विमानतळ, बसस्थानक अशा महत्वाच्या  ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
            या राष्ट्रीय परिसंवादासाठी देशभरातून 60 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला असून एकत्रितपणे दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी त्याचा निश्चितच उपयोग होईल असे सांगून गृहमंत्री आर. आर. पाटील म्हणाले, या परिसंवादाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, गुप्तचर यंत्रणांचे सक्षमीकरण, प्रशिक्षण, सुसंवाद, परस्परातील समन्वय व सहकार्य वाढविण्याची आवश्यकता असल्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
            दहशतवादाचा  मुकाबला, तसेच अंतर्गत सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी फोर्सवनची स्थापना करण्यात आली. तसेच 55 हजार पोलिसांची भरती करण्यात आली असून आगामी पाच वर्षात आणखी 63 हजार पोलिसांची भरती करण्यात येणार असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले.
            दहशतवाद सुरक्षा व्यवस्थेसमोरील सर्वात मोठे आव्हान असून या परिसंवादाच्या माध्यमातून त्याचा मुकाबला करण्यासाठी अधिकाधिक उपाय सुचवले जातील, अशी अपेक्षा गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

ग्राहक तक्रार निवारण मंचांचे निकाल जाहीर


              जळगांव, दि. 29 :- राज्यातील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचांचे अध्यक्ष व सदस्यपदासाठी घेण्यात आलेल्या परिक्षेचे निकाल मुंबई उच्च न्यायालयाचे http:bombayhighcourt.nic.in  / index.html या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून याची संबंधितांनी नोंद घ्यावी असे आवाहन प्रबंधक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच जळगांव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांचा जिल्हा दौरा


          जळगांव, दि. 29 :- राज्याचे कृषि, परिवहन राज्यमंत्री तथा जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री   ना. गुलाबराव देवकर हे जिल्हा दौ-यावर येत असून त्यांचा  दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
            शुक्रवार दिनांक 30 नोव्हेबर 2012 रोजी सायंकाळी 6-00 वाजता शासकीय विश्रामगृह पद्मालय, जळगांव येथे आगमन व राखीव. मुक्काम जळगांव.
            शनिवार दिनांक 1 डिसेंबर 2012 रोजी सकाळी 10-00 वाजता पथराड बस शेड व नियोजित श्री. उध्दवराज गोल्हाईत चेरीटेबल ट्रट औरंगाबाद संचलीत मागसवर्गीय वसतीगृह वास्तुचे उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती. राखीव व मुक्काम जळगांव.
            रविवार दिनांक 2 डिसेंबर 2012 रोजी राखीव , सायंकाळी 4-00 वाजता भोरस, ता. चाळीसगांव येथे रामेश्वर दूध्‍ उत्पादक सोसायटी इमारतीचे उदघाटन , राखीव, रात्री 11-15 वाजता अमरावती एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण

मा. मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांचे खिरोदा येथे आगमन व प्रयाण



        जळगांव, दि. 29 – मा. मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांचे हेलिकॅप्टरने दुपारी 12 वाजता खिरोदा (जि. जळगांव.)येथील हेलीपॅडवर आगमन झाले. यावेळी त्यांच्यासमवेत सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, वनमंत्री पतंगराव कदम, महाराष्ट्र कॉग्रेस प्रदेशचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे आदि मंत्रीगण होते.
          पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांनी मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे हेलीपॅडवर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, पोलीस अधिक्षक एस. जयकुमार, प्रांताधिकारी राहुल मुंडके, उपजिल्हाधिकारी डॉ. संतोष थिटे, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पानसरे आदि उपस्थित होते.
          यावेळी मा. मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांना पोलिस बॅड पथकाकडून आगमन   ( दुपारी 12 वाजता) व प्रयाण प्रयाणच्या वेळी  ( दुपारी 1.30 वाजता ) मानवंदना देण्यात आली. तर दुपारी दीड वाजता मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांचे खिरोदा हेलीपॅडवरुन नंदुरबारकडे प्रयाण झाले. यावेळी त्यांच्यासमवेत वरील मंत्रीगण बरोबरच महसुलमंत्री ना. बाळासाहेब थोरात ही होते.

महात्मा ज्योतिबा फुले यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन



महात्मा ज्योतिबा फुले  यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

     नाशिक दिनांक :28: महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त श्री.रवींद्र जाधव यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले .
            उपआयुक्त सर्वश्री टी.एम.बागुल, रावसाहेब भागडे,चंद्रकांत गुडेवार,सहाय्यक आयुक्त श्री.पी.बी.वाघमोडे,माहिती उपसंचालक श्री.देवेंद्र भुजबळ,अन्य अधिकारी,कर्मचारी यांनीही महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले .

* * * * * *

जळगावात 30 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन


जळगांव, दि. 28 :- जळगांव शहरातील पोलिस परेड मैदान व क्रीडा संकुल मैदानावर दिनांक 30 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2012 या कालावधीत सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आला असून सदरच्या मेळाव्यास धुळे, नंदुरबार, हिंगोली, नांदेड, जालना, परभणी, जळगांव, औरंगाबाद व बुलढाणा आदि नऊ जिल्हयातील इच्छूक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅ. मोहन कुलकर्णी यांनी केले आहे.
            सदरच्या भरती मेळाव्यात सैन्य दलातील सोल्जर जी. डी. टेक्नीकल, सोल्जर जी. डी. महार, सोल्जर क्लार्क, ट्रेडसमन, नर्सिग सहाय्यक आदि पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. तरी वरील सर्व जिल्हयातील इच्छूक  व आवश्यक असलेली शैक्षणिक व शारिरीक पात्रता धारण करणा-या उमेदवारांनी पोलिस परेड मैदानावर पहाटे 3 ते सकाळी 7  या वेळेत उपस्थित राहावे. त्यानंतर आलेल्या उमेदवारांना प्रवेश देण्यात येणार नाही याची नोंद घेण्याचे कळविण्यात येत आहे.
            पोलिस परेड मैदान व क्रीडा संकुलाचे मैदानावर होणारी सैन्य भरती प्रक्रिया पुढीलप्रमाणे-
            सोल्जर जी. डी., सोल्जर टेक्नीकल व सोल्जर महार पदासाठी धुळे व नंदुरबार जिल्हा (दि. 30 नोव्हेंबर), हिंगोली व नांदेड  ( 1 डिसेंबर ), जालना  व परभणी ( दि. 2 डिसेंबर ), जळगांव ( दि. 3 डिसेंबर), बुलढाणा ( दि. 4 डिसेंबर ) व औरंगाबाद ( दि. 7 डिसेंबर ) अशा प्रकारे भरती प्रक्रिया संपन्न होईल.
            तसेच वरील नऊ जिल्हयासाठी दिनांक 7 डिसेंबर रोजी ट्रेडसमन पदाकरिता चाचणी होईल. त्याचप्रमाणे  सर्व जिल्हयांच्या उमेदवारांकरिता दि. 8 डिसेंबर रोजी सोल्जर क्लार्क, सोल्जर टेक्नीकल, नर्सिग सहाय्यक पदांची भरती केली जाणार आहे. तर शेवटी दि. 9 डिसेंबर रोजी सर्व जिल्हयातील माजी सैनिक, एन. सी. सी. नॅशनल खेळाडू करिता पदे  भरती होणार असून दि. 5 डिसेंबर रोजी मेडीकल टेस्ट घेतली जाणार असल्याची माहिती कॅप्टन मोहन कुलकणी यांनी  दिली आहे.
            तरी जळगांव जिल्हयासह औरंगाबाद, बुलढाण, हिंगोली, नांदेड, जालना, परभणी , धुळे व नंदुरबार जिल्हयातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सैन्य भरती मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कॅप्टन कुलकर्णी यांनी केले आहे.

Monday, 26 November 2012

जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिनाची शपथ

           जळगांव, दि. 26- भारताचे संविधनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी अधिकारी आणि कार्मचा-यांना शपथ दिली यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल गायकवाड इतर अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते.   
-शपथ- 

भारताचे संविधान
उददेशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताने एक सार्वर्भौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय :
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा
व उपासना यांचे स्वातंत्र्य
दर्जाची व संधीची समानता :
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा
आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करुन :
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, 1949 रोजी
याव्दारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करुन स्वत:प्रत अर्पण करीत आहोत
00000


सन 2012 – 13 शैक्षणिक वर्षासाठी संच मान्यता व स्टाफ प्रोफाईल मंजूरीसाठी नाशिक येथे शिबीर



          जळगांव, दि. 26 – जिल्हयातील सर्व विदयालयाची सन 2012 -13 शैक्षणिक वर्षासाठी एन. सी. टी. ई. मान्यता प्राप्त दिनांक 31 ऑगस्ट 2009 च्या निकषांप्रमाणे संच मान्यता करण्यासाठी तसेच केलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांच्या नियुक्त्यांना वैयक्तीक मान्यता व स्टॉफ प्रोफाईलला मान्यता मिळण्यासाठी शिबीराचे आयोजन शिक्षण उपसंचालक, नाशिक विभाग, नाशिक येथे जळगांव जिल्हयासाठी जिल्हाधिकारी दिनांक 1 डिसेंबर 2012 रोजी सकाळी 10-00 वाजता करण्यात आले आहे असे प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगांव यांनी एका पत्रकान्वये कळविलेले आहे.

बाल कामगार प्रकल्प संस्थेमार्फत आयोजित संनियंत्रण प्रणाली प्रशिक्षण कार्यशाळा

           जळगांव, दि. 26 :- राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प संस्था जळगांव व पुणे येथील यशदा संस्थेमार्फत बाल कामगार प्रकल्प संस्थेचे प्रकल्प संचालक आणि सरकारी कामगार अधिका-यांसाठी आयोजित करण्यांत आलेल्या कार्यशाळेचे उदघाटन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांचे हस्ते दिप प्रज्वलन करुन झाले.
            या कार्यक्रमाप्रसंगी प्रकल्पाचे सदस्य सचिव जी. जे. दाभाडे, सहाय्यक कामगार अधिकारी, प्रकल्प संचालिका अंजली मोढे, व इतर जिल्हयातील सर्व प्रकल्प संचालक व सरकारी कामगार अधिकारी उपस्थित होते.
            या कार्यक्रमासाठी प्रकल्पाचे जीवन मोरे, अश्पाकअली सैय्यद, वैशाली कोकाटे, डॉ. लोकेश चौधरी, महेंद्र एस. भोई, जयश्री पवार व सर्व बाल कामगार शाळेतील शिक्षकवृंद कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.            

Thursday, 22 November 2012

पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांचा सुधारित जिल्हा दौरा



        जळगांव, दि. 22 :- राज्याचे कृषि, परिवहन राज्यमंत्री तथा जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री  ना. गुलाबराव देवकर हे जिल्हा दौ-यावर येत असून त्यांचा  सुधारित दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे,    
 शुक्रवार, दिनांक 23 नोव्हेंबर, 2012 सकाळी 06.05वा. जळगांव रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने मधुबन बंगल्याकडे प्रयाण. सकाळी 6.15 वा. मधुबन बंगला येथे आगमन व राखीव, सकाळी 9.00 वा. वडली, जवखेडा येथे विविध कामांचा शुभारंभ , सायं 5.00 वा. म्हसावद येथे विविध कामांचा शुभारंभ रात्री 9.50 वा. सेवाग्राम एक्सप्रेसने नागपूरकडे प्रयाण.
शनिवार, दिनांक 24 नोव्हेंबर, 2012 रात्री 9.00 वा. सेवाग्राम एकसप्रेसने जळगांवकडे प्रयाण. रविवार, दिनांक 25 नोव्हेंबर, 2012 पहाटे 4.20 वा. सेवाग्राम एक्सप्रेसने जळगांव रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने मधुबन बंगल्याकडे प्रयाण, पहाटे 4.30 वा. मधुबन बंगला जळगांव येथे आगमन व राखीव, सकाळी 9.00 वा. चोरगांव ता. धरणगांव येथे विविध कामांचे उदघाटन, सकाळी 11.00 वा. धरणगांव शहरातील डांबरीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ दुपारी 2.00 वा. श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : वडोदा, ता. चोपडा, सायं4.00 वा. गायत्री महिला दुध उत्पादक संस्था बोनस वाटपाचा कार्यक्रम व प्रगती महिला कृषि विज्ञान मंडळास भेट स्थळ : साळवे,  ता. धरणगांव,  मुक्काम जळगांव.

पिण्याच्या पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर होण्यासाठी मीटर बसविणे आवश्यक - मुख्यमंत्री



           मुंबई, दि. 22 : पिण्याचे शुध्द पाणी प्रत्येक नागरिकाला मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी पाण्याचा योग्य वापर होणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याचा योग्य व काटकसरीने वापर होण्याच्या यादृष्टीने पाणी ग्राहकासाठी पाण्याचे मीटर बसविणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज बैठकीत सांगितले.

            पाणी पुरवठा स्वच्छता विभागाच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे आज मंत्रालयात सादरीकरण करण्यात आले. यावेळी पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, राज्यमंत्री रणजित कांबळे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ए. के. जैन, पाणी पुरवठा स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मालिनी शंकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव राधेश्याम मोपलवार आदी उपस्थित होते.
            राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक पाणी ग्राहकाने गरजे इतकेच पाणी वापरावे यासाठी पाण्याचे मीटर बसविण्याबाबत प्राधान्याने विचार करणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री  यावेळी सांगितले. यासाठी पाण्याच्या वापराचे मोजमाप करणारे मीटरचे तांत्रिक दृष्टया उत्तम डिझाईन करुन घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. पिण्याच्या पाण्याच्या नियोजनबध्द वापरासाठी लवकरच संबंधितांची बैठक आयोजित करुन त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.
            पाण्याची गळती थांबविणे, घनकचरा व्यवस्थापनाचे नियोजन करणे, 15 ते 20 टक्के काम शिल्लक राहिलेल्या पाणी पुरवठा योजनांचे काम  पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्राधान्य देणे आदी कामांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी यावेळी सांगितले.
            पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातंर्गत वासो, आर एस पी एम यू, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या प्रमुख पाणी पुरवठा विभागांसह उपविभागांची सद्यस्थिती, त्यांच्या समस्या, त्यावर करावयाच्या उपाय योजना, या विभागांच्या आस्थपनेवरील अधिकारी / कर्मचारी यांचे व्यवस्थापन याबद्दलची सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे मांडण्यात आली.