मुंबई,
दि. 18- पोलीसांनी
या महिन्यात सुरु केलेले जनता दरबार, ज्येष्ठ नागरिक भेट योजना आणि तक्रार/सूचना
पेटी योजना हे उपक्रम कायमस्वरुपी सुरु राहण्यासाठी शासनस्तरावरुन निर्णय घेतला जाणार
असून मुंबईत यशस्वी होत असलेली ज्येष्ठ नागरिक भेट योजना यापुढे राज्यातील मोठ्या
शहरांमध्ये टप्याटप्याने राबविण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी
आज केली.
मुंबई
पोलीसांच्या तक्रार/सूचना पेटी योजनेचे उद्घाटन आज सायंकाळी गृहमंत्री
श्री. पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील, आमदार नितीन सरदेसाई, पोलीस आयुक्त डॉ. सत्यपालसिंह आदी उपस्थित होते.
श्री. पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील, आमदार नितीन सरदेसाई, पोलीस आयुक्त डॉ. सत्यपालसिंह आदी उपस्थित होते.
महानगरात
बसविण्यात येणा-या एक हजार तक्रार सूचना पेट्यांमधून गंभीर स्वरुपाची माहिती अथवा
तक्रार प्राप्त झाल्यास त्यातून पोलीसांनी एफआयआर दाखल करुन घेण्याची भूमिका
स्वीकारण्याचे आवाहन गृहमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केले. कायद्याचे पालन
करणारे सामान्य लोक पोलीस ठाण्यात निर्भिडपणे आले पाहिजेत , तेथे सन्मानाची, आदराची वागणूक मिळते असा विश्वास
जनतेत निर्माण होण्याची गरज गृहमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
लोकशाही
व्यवस्थेत सर्वसामान्य माणूस हा आपला मालक आहे असे मानून त्यांना सन्मान दिल्यास
जनता आणि पोलीस यांच्यात जवळीक निर्माण होईल.तक्रारपेटीच्या माध्यमातून
गुन्हेगारीबद्दल चांगली माहिती
देणा-यांचे नाव गुप्त ठेवून सिक्रेट फंडातून त्यांना बक्षीस देण्यात येईल. पोलीस
दलाने आधुनिकतेचा वापर करुन मुंबई पोलीसांच्या वेबसाईटच्या माध्यमातून लोकांची
गा-हाणी, तक्रारी स्वीकारुन त्यांना उत्तरे देण्याचे आवाहनही गृहमंत्र्यांनी शेवटी
केले.
यावेळी
ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री श्री. जयंत पाटील यांनी पोलीसांच्या या उपक्रमाचे
कौतूक करुन वेबसाईटद्वारे घरबसल्या तक्रारी नोंदविता येतील आणि या तक्रारी पोलीस
आयुक्तांनाच हाताळता येतील, अशी वेबसाईट तयार करण्याची सूचना केली. तक्रारपेटीच्या
माध्यमातून चांगली माहिती देणा-याचा आणि उत्कृष्ट तपास करणा-या अधिका-याचे कौतूकही
पोलीसांच्या वार्षिक समारंभात होईल, असा विश्वास व्यक्त करुन पालकमंत्री श्री.
पाटील यांनी पोलीस दलासाठी आवश्यक तो निधी पुरविण्याची ग्वाहीदेखील यावेळी दिली.
प्रारंभी
पोलीस आयुक्त डॉ. सत्यपालसिंह यांनी प्रास्ताविकातून तक्रार/सूचना पेटी योजनेची
माहिती दिली. तक्रार पेटीची चावी ही दुस-या यंत्रणेकडे राहणार असल्याने आणि सर्व
तक्रारींवर वरिष्ठ स्तरावर निर्णय होणार असल्याने हा उपक्रम निश्चितच यशस्वी होईल
असे सांगून जोपर्यंत जनता पोलीसांबरोबर येत नाही तोपर्यंत कितीही चांगला लीडर असला
तरी तो यशस्वी होत नाही म्हणून जनतेनेही या उपक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन
पोलीस आयुक्तांनी यावेळी केले.
यावेळी
मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात पोलीस ठाण्यांच्या अधिका-यांना तक्रार
सूचना पेट्यांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास सहपोलीस आयुक्त
(कायदा-सुव्यवस्था) सदानंद दाते, सहपोलीस आयुक्त (प्रशासन) हेमंत नगराळे, सह पोलीस
आयुक्त (वाहतूक) विवेक फणसाळकर, अपर पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश आदींसह सामाजिक,
राजकीय क्षेत्रातील मान्यवर, पोलीस अधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी पोलीस
उपायुक्त श्री. संजय शिंत्रे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment