Friday, 19 October 2012

माहिती तंत्रज्ञानाच्या अधिकाधिक वापरासाठी राज्य निवडणूक आयोगाला ‘ईडीजीई 2012’ पुरस्कार

          मुंबई, दि. 19 : माहिती तंत्रानाचा (आयटी) अधिकाधिक वापर करणाऱ्या संस्थांना ‘इन्फॉर्मेशन वीक’ नियतकालिकातर्फे देण्यात येणारा यंदाचा ‘ईडीजीई 2012’ (एन्टरप्रायजेस ड्रायव्हिंग ग्रोथ अँड एक्सलन्स थ्रू आयटी) पुरस्कार राज्य निवडणूक आयोगाला प्रदान करण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात माहिती तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याबद्दल आयोगाला या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
          गोरेगाव येथील प्रदर्शन केंद्रात झालेल्या एका शानदार कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण करण्यात आले. राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्यासह राज्य निवडणूक आयोगाचे अपर मुख्य सचिव चाँद गोयल, सहायक आयुक्त अविनाश सणस यांनी हा पुरस्कार स्वीकारला. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.
          राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अधिकाधिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यासाठी www.mahasec.com हे अद्ययावत संकेतस्थळ विकसित केले आहे. या संकेतस्थळावर महानगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणूक प्रभागांच्या इलेक्ट्रॉनिक नकाशांची सुविधा आहे. निवडणूक होत असलेल्या संबंधित महानगरपालिकेच्या एकत्रित नकाशावरून आपल्या प्रभागाचा नकाशा शोधता येतो. त्यात प्रभागातील निवडणूक अधिकाऱ्यांचे नाव, पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक उपलब्ध होतो. सर्वात महत्वाचे म्हणजे मतदारांची संख्या, प्रभागातील मतदार यादी आणि त्यातील आपले मतदान केंद्रही घरबसल्या शोधता येते. त्याचबरबोर हेल्पलाईन आणि एसएमएसद्वारेही मतदार यादीतील नाव शोधण्याची सुविधा आयोगाने उपलब्ध करून दिली होती.
          स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या वापराबरोबरच आयोगाच्या संकेतस्थळावर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र, आयोगाच्या विविध सूचना, आदेशही उपलब्ध करून देण्यात आले होते. प्रसारमाध्यमांना वेळोवेळी ई-मेलच्या माध्यमातून प्रसिद्धिपत्रके व निवडणूक निकालांचीही माहिती उपलब्ध करून दिली जात होती. एकूणच माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे आयोगाने मतदार, उमेदरावर, राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमांशी सातत्याने संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. 

No comments:

Post a Comment