Thursday, 4 October 2012

माजी सैनिकांच्या तक्रारींचा निपटारा तात्काळ केला जाईल -- जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर



जळगांव, दि.4 :- माजी सैनिकांच्या शासकीय विभागाशी विशेषत: महसूल विभागाची संबंधीत ज्या काही तक्रारी असतील त्या तक्रारीचा निपटारा तात्काळ केला जाईल असे आश्वासन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सैनिक दरबारात माजी सैनिकांना दिले.
         जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने आज सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सैनिक दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. सदरच्या दरबारात जिल्हयातील माजी सैनिक / मा. सैनिकांच्या पत्नी व त्यांच्या कुंटुंबियांच्या वतीने विविध समस्या मांडण्यात आल्या यामध्ये जिल्हयातील सर्व माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना बीपीएल प्रमाणे धान्य मिळावे, बेघर माजी सैनिकांना घरकुल, शासनाकडून जमिन मिळणे, अनुकंपावर नोकरी मिळणे, आदि मागण्या करण्यात आल्या.
            तसेच उमाळे (ता. जळगांव) येथील मोहमद बजीर शेख या माजी सैनिकास 1976 मध्ये शासनाकडून 84 आर जमिन मिळाली होती. परंतु 2003 मध्ये सदरच्या जमिनीची  परस्पर सौदे पावती करण्यात आली असून त्या जमिनीच्या सातबारा उता-यावरुन सदरच्या व्यक्तीचे नाव काढून टाकण्याची मागणी मोहमद शेखच्या कुटुंबियांनी केली. मोहमंद शेख या माजी सैनिकाचे सन 1983 मध्ये निधन झाले असल्याने सदरची सौदे पावती ही गैरव्यहार आहे असे शेख कुटुबियांनी सांगितले. याविषयी जिल्हाधिकारी राजूरकर यांनी कारवाई करण्याची आश्वासन दिले आहे.
            माजी सैनिक / विधवा/पाल्य आदिंना ते आर्थिकदृष्टया सक्षम व्हावेत म्हणून त्यांना शासनाकडून रोख मदतीबरोबरच शासकीय विभागात त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे किंवा उपलब्ध पदांनुसार नियुक्ती करण्यात येत असते अशी माहिती जिल्हाधिकारी राजूरकर यांनी दिली त्याप्रमाणेच माजी सैनिकांच्या त्यांच्या तक्रारीबाबतचा सैनिक दरबार तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरावर आयोजित करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
            माजी सैनिक / अधिकारी यांची जिल्हयातील विविध शासकीय मंडळे/ समित्या यांवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. जेणे करुन माजी सैनिक / अधिकारी हा मुख्य प्रवाहात येऊन त्यांच्यामधील एकटेपणाची भावना दूर होण्यास मदत होईल. व शासकीय कामात त्यांच्याकडून सहकार्य मिळेल.यावेळी सुभेदार जी.आर.पाटील, दिलीप बडगुजर, अशोक पाठक आदिनी आपले 1962 व 1965 च्या युध्दातील अनुभव कथन केले.
            यावेळी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने मा. जिल्हाधिकारी राजूरकर यांच्या हस्ते माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. सदरचे धनादेश हे माजी सैनिकांना शासनाकडून मदतीच्या स्वरुपात देण्यात आलेले आहेत. यात श्रीमती आशाबाई रमेश सोनवणे, श्रीमती सविता जितेंद्र माळी, रविंद्र पांडूरंग फालक, भाऊसाहेब धर्मा पाटील, प्रभाकर निवृत्ती पाटील, पितांबर रामकृष्ण पाटील, दिनकर पाटील, एकनाथ महाजन, विलास जोर्वे आदिंचा समावेशआहे.
            यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅ. मोहन कुलकर्णी, निवृत्त ब्रिगेडियर श्री. नाथू, निवृत्त फलाईट लेफटनंट, श्री. चौधरी, सुभेदार जी.आर.पाटील, हवालदार डी.एम.सोनवणे, आदिसह माजी सैनिक व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

No comments:

Post a Comment