Thursday, 18 October 2012

बांधकाम उद्योगाने 10 टक्के विकासदर गाठला - मुख्यमंत्री



           मुंबई, दि.18 : या वर्षात आतापर्यंत बांधकाम उद्योगाने 10 टक्के विकासाचा दर गाठला असून बांधकाम व्यवसायास चालना देण्यासाठी पूरक अशा शासकीय धोरणामुळेच या अर्ध आर्थिक वर्षात 16.53 दशलक्ष डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक झालेली आहे, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे सांगितले. 
एक्झिबिशन सेन्टर, गोरेगांव येथे इकॉनॉमिक टाइम्स ने आयोजित केलेल्या ‘एटेक 2012’  प्रदर्शनाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री बोलत होते.
बांधकाम या क्षेत्रातील महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होण्यासाठी शासन निश्चितपणे मदत करेल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, सार्वजनिक, खासगी भागीदारीतून या क्षेत्रात नवीन संधी निर्माण होतील. आपल्या राज्यात अतिशय कुशल व बौध्दिक मनुष्यबळ उपलब्ध असून अतिशय धडाडीचे उद्योजक आहेत.  राज्यातील उद्योगास पोषक असे वातावरण निर्माण झाल्यामुळे आणि या क्षेत्रात लागणारे परवाने अतिशय सुलभरित्या प्राप्त होत असल्याने या क्षेत्रातील स्पर्धेला जागतिक स्तरावर आपण अतिशय सक्षमपणे तोंड देत आहोत असेही मुख्यमंत्री म्हणाले. 
हरित क्षेत्र इमारतींना आम्ही सवलती दिलेल्या आहेत. यामध्ये सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर व विजेच्या कमी वापर,  पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण, बांधकामासाठी पर्यावरण पूरक साधनसामुग्रीचा वापर याचा समावेश आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले या क्षेत्रात हरित इमारती निर्माण व्हाव्यात यासाठी शासकीय इमारतीं, सार्वजनिक कार्यालये यांनी अटींचे पालन करावे असे बंधन शासनाने घातले आहे. आम्हाला पर्यावरणाचा मुद्दा महत्त्वाचा वाटत असून त्याशिवाय आता पर्याय नाही. आम्ही जागतिक दर्जाच्या सुविधा या मुंबई महानगरात विकसित करीत आहोत.  भाडेतत्वावरील घरे हा त्यापैकी एक महत्वाकांक्षी प्रकल्प असून सार्वजनिक हिताच्या दृष्टीकोनातून झोपडट्टयांची वाढ रोखण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. 45 प्रकल्पांसाठी जमीन देण्यात आली असून पुढील दोन वर्षात भाडे तत्वावरील एक लाख घरांची निर्मिती होईल. लवकरच ठाणे, मानपाडा येथे भाडेतत्वावरील प्रकल्पातून 3000 सदनिका बांधल्या जातील. या सदनिकांच्या क्षेत्रात बालवाडी, दुकाने, कल्याणकेंद्र अशा सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
मुंबईमध्ये जे नोकरीच्या, करिअरच्या शोधात येतात त्यांना किफायतशीर किंमतीत छोटी घरे उपलब्ध व्हावीत यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. 160 ते 300 चौरस फूटाच्या सदनिकांचे क्षेत्र वाढविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. अधिक घरांच्या स्टॉक निर्माण व्हावा यासाठी आम्ही नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली असून त्यातून विशेष नगर वसाहती तसेच किफायतशीर भाडेतत्वावरील घरे या योजना एकत्रित केल्या जाऊन कार्यान्वित होतील.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मेट्रो, मोनो रेल, इतर पायाभुत सुविधा प्रकल्प कालबध्द कार्यक्रम राबवून पूर्ण करण्यात येणार आहेत. आपण आपल्या सूचना, शिफारशी या परिषदेतून मांडाव्यात या सूचनांचे आम्ही निश्चितच स्वागत करु. मुंबईच्या विकासात आपल्या सहकार्याची आम्हाला गरज आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.  
            ए.एल.एल. डिझाईन (युके), रिकार्डो ई बोफिल, (स्पेन), अँड्रे टेम्स् (ऑस्ट्रेलिया), वास्तुविशारद हफिझ कॉन्ट्रॅक्टर, तसेच या क्षेत्रातील अनेक वास्तुविशारद, बांधकाम व्यावसायिक यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment