Monday, 15 October 2012

राज्याच्या नवीन औद्योगिक धोरणात हिरे उद्योगासाठी विशेष सवलती : मुख्यमंत्री

मुंबई, दि. 15 : महाराष्ट्रात हिरे उद्योगाच्या विकासास प्रचंड वाव असून राज्याच्या नवीन औद्योगिक धोरणात या उद्योगासाठी विशेष सवलती देण्यात येतील, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे सांगितले.
          वांद्रे येथील हॉटेल ताज लॅन्ड येथे इंटरनॅशनल डायमंड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित 35 व्या जागतिक हिरे परिषदेत ते बोलत होते. यावेळी इंटरनॅशनल डायमंड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष मोती गँज, सरचिटणीस  रोनी वॅंडरलिंडेन, उपाध्यक्ष वसंत मेहता, भारत डायमंडचे अध्यक्ष अनुप मेहता तसेच जगभरातील हिरे उद्योजक उपस्थित होते.
          मुख्यमंत्री म्हणाले की, हिरे उद्योग क्षेत्रात मुंबई आघाडीवर असून वांद्रे-कुर्ला संकुलात भारतातील प्रमुख हिरे उद्योग केंद्र  उभारण्यात आले आहे. राज्यात या क्षेत्रासाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ विपुल प्रमाणात उपलब्ध असून हिरे उद्योगाचे प्रशिक्षण देणारी संस्थाही येथे कार्यरत आहे. याशिवाय जानेवारी 2011 मध्ये मुंबईतील ताडदेव येथे केंद्र शासनाच्या वाणिज्य मंत्रालयाने आणखी एक प्रशिक्षण संस्था उभारली आहे. या उद्योगात 100 टक्के थेट परकीय गुंतवणुकीस परवानगी देण्यात आल्यामुळे बहुराष्ट्रीय स्तरावरील टिफनी, कार्टीअर झेल या ब्रॅंडना भारतात व्यापारास  मोठ्या प्रमाणात वाव मिळाला आहे. शासन या उद्योगासाठी सर्वतोपरी मदत करील, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

* * * * * * *

No comments:

Post a Comment