चाळीसगांव दि.13 :- येथील एज्युकेशन सोसायटीच्या विविध शैक्षणिक विभागातून नेत्रदीपक यश मिळावणा-या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करुन विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून यशाचे शिखर गाठावे, असे प्रतिपादन राज्याचे कृषि व परिवहन राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.गुलाबराव देवकर यांनी यावेळी केले.
येथील एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित आर.सी. कळंत्री विद्यालयाची इमारत, महाविद्यालयातील युजीसींतर्गत बांधण्यांत आलेल्या 4 वर्गखोल्यांच्या विस्तारीत भाग, मुलींचे वसतिगृह व आ.बं. मुलांचे व मुलींचे हायस्कुल येथील संगणक कक्षाच्या उद्घाटन व विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक कौतुक समारंभाप्रसंगी ना. गुलाबराव देवकर बोलत होते.
पालकमंत्री ना. देवकर पुढे म्हणाले की, पुर्वी विद्यार्थ्यांना परिक्षांमध्ये मिळणा-या गुणांची टक्केवारी खूप कमी होती. परंतु आता विद्यार्थी 90 ते 95 टक्केच्या पुढे गुण पाडत आहेत. शिक्षणाचा दर्जा उंचावल्यामुळे तसेच परिक्षांमधील स्पर्धांमुळे टक्केवारीमध्ये वाढ झाली आहे. परिणामी पालकांची नव्हे तर शिक्षक, प्राध्यापक तसेच शाळांच्याही जबाबदारीत वाढ झाली आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थीनी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी होते. आ.राजीव देशमुख, आ. अपुर्व हिरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप देशमुख,उदेसिंग पवार, माजी आ. साहेबराव घोडे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती रोहिदास पाटील, संस्थाध्यक्ष ऍ़ड. नेताजी सुर्यवंशी, मॅनेजींग बोर्डाचे चेअरमन नारायणभाऊ अग्रवाल तसेच विश्वस्त व संचालक मंडळाचे पदाधिकारी आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते
विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर त्यांनी भाषेसह इतर भाषांवर प्रभुत्व मिळवून आधुनिक तंत्रज्ञानाला बुध्दीची जोड देऊन आपला आत्मविश्वास वाढविणे गरजेचे आहे. या आत्मविश्वासाच्या जोरावर विद्यार्थ्यांना नविन भारत निर्माण करावयाचा आहे, असे प्रतिपादन अरुणभाई गुजराथी यांनी यावेळी केले.
आ. अपुर्व हिरे यांनी पटपडताळणी, कॉपी मुक्त परिक्षा, मानवविकास उपक्रमांतर्गत बसेसच्या बाबतीत ग्रामीण भागातील प्रवास करणा-या विद्यार्थ्यांना येणा-या अडचणी,परिक्षा काळात पर्यवेक्षकांवर दाखल होणारे गुन्हे, शिक्षण कायदा यावर सविस्तर मनोगत व्यक्त केले. तसेच शिक्षक प्रतिनिधी म्हणून शिक्षकांवर अन्याय होऊ नये यासाठी शासनाने जाणीवपुर्वक प्रयत्न करावे अशी विनंती त्यांनी केली.
आ. राजीव देशमुख यांनी विविध परिक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळविणा-या विद्यार्थ्यांनर कौतुकाची थाप देऊन या विद्यार्थ्यांनी संस्थेचेच नव्हे तर शहराचेही नांव उज्वल केले आहे, त्यामुळे आनंद व्यक्त केला. ज्या विद्यार्थ्यांना बक्षिस मिळाले नाही त्यांनी निराश न होता त्यांनी नव्या जोमाने, जिद्दीने व मेहनतीने अभ्यास करुन शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्ता स्पर्धेचा फायदा घेऊन आपला व्यक्तिमहत्त्व विकास घडविण्याचा प्रयत्न करावा, असे मार्गदर्शनपर आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रारंभी मान्यवरांचा सत्कार शाल, पुषगुच्छ व श्रीगणेश प्रतिमा देऊन करण्यांत आला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुकपर सत्कार अभिनंदपत्र व स्मृतिचिन्ह देऊन करण्यांत आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव वसंतराव चंद्रात्रे यांनी केले तर सुत्रसंचालन प्रा. डॉ. किरण गंगापूर यांनी केले व आभार सहसचिव मु. रा. अमृतकार यांनी मानले.
या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment