जळगाव, दिनांक 23 - जिल्हयातील वाघुर धरणाच्या परिसरात या वर्षी
अत्यल्प पाऊस पडल्यामुळे धरणात दिनांक 22 ऑक्टोंबर,2012 रोजी फक्त 2.42 दशलक्षघनमीटर
इतका अत्यल्प उपयुक्त साठा आहे. धरणातील सध्या उपलब्ध असलेले पाणी पिण्यासाठी
राखुन ठेवण्यात आलेले आहे. शासनाचे आदेशानुसार जलाशयातील पाण्यावर चालत असलेले
सर्व कृषी पंप त्वरीत बंद करुन त्याची विद्युत जोडणी महावितरण कंपनीने खंडीत
करण्यात आलेली आहे. धरणात पाणी उपलब्ध नसल्यामुळे जलसंपदा विभागाने यापूर्वी पाणी
परवानगी दिलेली असली तरी विद्युत पंपाने अथवा इतर माध्यमाने धरणातून शेतीसाठी पाणी
उचलण्यास बंदी घालण्यात आली आहे असे असतांना धरणांच्या जलाशयातील काही कृषी पंप
चालु असल्याचे आढळुन आल्यास असे कृत्य हे पिण्याच्या पाण्याची चोरी अथवा गैरप्रकार
समजुन भारतीय दंड संहिता कलम-430 अन्वये गुन्हा ठरेल. सदरील गुन्हा अदखलपात्र
स्वरुपाचा असून अशा गुन्हेगारांविरुध्द कायद्यात शिक्षेची तरतुद आहे तरी सर्व
संबंधीतांना या निवेदनाव्दारे जाहिर आवाहन करण्यात येते की, वाघुर जलाशयामधुन
शेतीपंप लावुन पाणी वापर करु नये व असे केल्याचे निदेर्शनास आल्यास अपकृती
करणा-याविरुध्द गुन्हा नोंदवुन योग्य ती पुढील कारवाई करण्यात येईल. चालु वर्षी
पाण्याची भीषण पाणी टंचाई जाणवणार असल्याने सर्व शेतकरी बंधुंनी जलसंपदा विभागास
या बाबतीत सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता, वाघुर धरण विभाग, जळगाव
यांनी एका प्रत्रकान्वये केले आहे.
* * * * * * * *
जिल्हयात साथ रोगांच्या प्रतिबंधाकरिता
स्वच्छता पंधरवाडा मोहिम राबवावी
--पालकमंत्री ना.गुलाबराव
देवकर
जळगाव, दिनांक 23 - जिल्हयात शहरी व ग्रामीण भागात डासांचा मोठा
प्रार्दुभाव झाला असून त्यातून साथीच्या रोगांचा फैलाव होऊन नागरिक हैराण झालेले
आहेत त्यामुळे प्रशासनाने सर्व नागरिक, कर्मचारी, अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा
सहभाग घेऊन जिल्हयात ``स्वच्छता पंधरवाडा`` मोहिम राबविण्याची सूचना पालकमंत्री
ना.गुलाबराव देवकर यांनी दिली. ते आज दुपारी पद्मालय विश्रामगृह येथे आयोजित डेंग्युबाबतच्या
आढावा बैठकीत बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर
राजूरकर, प्रभारी महानगरपालिका आयुक्त सोमनाथ गुंजाळ, प्रांताधिकारी रविंद्र
राजपूत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एस.लाळीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी
पवार, मनपा आरोग्य अधिकारी विकास पाटील, सहाय्यक आरोग्य अधिकारी एस.बी.सोनवणे,
जिल्हा सहकारी बॅकेचे संचालक वाल्मीक पाटील आदि उपस्थित होते.
ना.देवकर पुढे म्हणाले की, साथीच्या
रोगांवर प्रतिबंधाकरिता सर्व शासकीय विभागांनी समन्वय ठेवुन कार्य करावे. डासांवर
नियंत्रण आणणे महत्वाचे असून त्याकरिता आरोग्य विभागाने जळगाव शहरासह व ग्रामीण
भागात सर्वत्र फॉगींग, ॲबेटींग करणे आवश्यक आहे. डेंग्यु, चिकनगुनिया, स्वाईन फल्यू
आदि साथीच्या रोगांवर सर्वसामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले
आहे त्याकरिता प्रशासनाने त्वरीत डासांचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी कार्यवाही
करावी, असे त्यांनी सूचित केले.
जिल्हयात सर्वत्र डासांचा प्रार्दुभाव
झाला असून शहरी व ग्रामीण भागात स्वच्छता मोहिम प्रशासनाने राबविण्याची सूचना
ना.देवकर यांनी केली त्याकरिता सर्व नागरिक, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, लोकप्रतिनिधी
यांच्या सहभागातून जिल्हयात ``स्वच्छता पंधरवाडा`` मोहिम राबविण्याची सूचना
त्यांनी केली. या मोहिमेची प्राथमिक तयारी प्रशासनाने करुन नोव्हेंबरच्या पहिल्या
आठवडयापासून सदरच्या मोहिमेची अंमलबजावणी करावी त्याकरिता पूर्वतयारी आढावा बैठक 1
नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी आरोग्य विभागाच्या
अधिका-यांनी जिल्हयातील आजपर्यंतचे डेंग्यु, चिकनगुनिया, स्वाईन फल्यू आदि रुग्णांबाबत
माहिती ना.पालकमंत्री यांना दिली तसेच आरोग्य विभागाच्या वतीने साथीच्या
प्रतिबंधाकरिता करण्यात आलेल्या उपाय-योजनांची माहितीही बैठकीत देण्यात आली
यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी नशिराबाद, कु-हे, अंतुर्ली,
शिरसाळा, खिरोदा आदि गावांमध्ये फॉगींग तेथील नागरिकांची प्राथमिक तपासणी करण्यात
आल्याची माहिती दिली. डेंग्युच्या संदिग्ध रुग्णांचे रक्ताचे सॅंपल त्वरीत पुणे
येथील प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्याची सुविधा सामान्य रुग्णालयात करण्यात आल्याची
माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एस.लाळीकर यांनी दिली.
जळगाव महानगरपालिकेच्या हद्दीतील
सुमारे साडेपाच लाख लोकांचा सर्व्हे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आला
असून त्यात सुमारे 1200 लोकांना ताप असल्याचे आढळले तर 69 हजार घरातील पाणी
साठयाची तपासणी करुन तेथे फॉगींग, ॲबेटींग, पाणी साठा नष्ट करणे आदि कार्यवाही
करण्यात आल्याची माहिती प्रभारी आयुक्त गुंजाळ यांनी दिली.
जिल्हा आरोग्य अधिकारी व मलेरिया
अधिकारी यांनी शिरसोली गावात जाऊन तेथील स्वच्छतेबाबत कार्यवाही करावी तसेच
साथीच्या रोगांचा प्रार्दुभाव होऊ नये म्हणून तात्काळ उपाय योजावेत अशी सूचना
ना.देवकर यांनी केली तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्वत्र अस्वच्छता पसरली असून
शल्य चिकित्सकांनी लक्ष घालुन साफसफाईची कामे करुन घेण्याची सूचना त्यांनी केली.
1 नोव्हेंबर रोजी बैठक
जिल्हयात सर्वत्र अस्वच्छता पसरलेली
असल्याने डासांचा प्रार्दंभाव झालेला आहे त्याकरिता प्रशासनातर्फे स्वच्छता
पंधरवाडा राबविला जाणार आहे. त्यासंबंधीची पुर्वतयारी बैठक दिनांक 1
नोव्हेंबर,2012 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 3 वाजता मा.पालकमंत्री यांचे
अध्यक्षतेखाली होणार आहे तर दिनांक 6 ते 20 नोव्हेंबर,2012 या कालावधीत जिल्हयात
सर्वत्र ``स्वच्छता पंधरवाडा`` मोहिम राबविली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी
ज्ञानेश्वर राजूरकर यांनी दिली.
* * * * * * * *
महाराष्ट्र जीवन
प्राधिकरणाने सामूहिक
पाणी पुरवठा
योजना बंद करु नयेत
--पालकमंत्री ना.गुलाबराव
देवकर
जळगाव, दिनांक 23
- जिल्हयातील सामूहिक पाणी पुरवठा
योजनांची थकीत पाणी पुरवठा रक्कम व वीज बिले सदरच्या गावांनी भरणे आवश्यक आहे तरी
जिल्हयात टंचाईसदृष्य परिस्थिती असल्याने अशा योजनेतून होणारा पाणी पुरवठा
महाराष्ट्र् जीवन प्राधिकरणाने थांबवु नये अशी सूचना पालकमंत्री ना.गुलाबराव देवकर
यांनी केली ते पद्मालय विश्रामगृह येथे आयोजित पहुर-नेरी परिसरातील आठ गावांच्या
पाणी पुरवठा योजनेबाबत आढावा घेत होते.
यावेळी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर
राजूरकर, महाराष्ट्र् जीवन प्राधिकरणाचे अभियंता श्री.जैन, जिल्हा परिषदेच्या पाणी
पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.ठाकुर व पहुर-नेरी परिसरातील ग्रामस्थ
उपस्थित होते.
सदरची योजना थकीत वीज
बील व कर्मचा-यांच्या पगाराबाबतच्या समस्येत अडकली असून महाराष्ट्र् जीवन
प्राधिकरणाकडून सदरच्या योजनेतून होणारा पाणी पुरवठा बंद करण्याची प्रक्रिया सुरु
आहे. ही योजना जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचे प्रस्तावित आहे परंतू जिल्हा परिषदेकडे
असलेल्या 12 सामुदायिक योजनाच सुरळीत नसल्याने ही योजना ही त्यांच्याकडून चालविणे
शक्य नसल्याची माहिती पाणी पुरवठा अधिकारी (जि.प.) श्री.ठाकुर यांनी दिली.
* * * * * * * *
जिल्हयात पुर्नवसनाची
कामे दर्जेदार व्हावीत
--जिल्हाधिकारी
ज्ञानेश्वर राजूरकर--
जळगाव, दिनांक 23 - जिल्हयातील पुर्नवसनाची कामे दर्जेदार होणे आवश्यक
असून लोकांच्या पुर्नवसनाबाबत संबंधीत विभागाने लोकांची व प्रशासनाची ही सोय होऊन
सदरचे पुर्नवसन त्वरीत मार्गी लागेल याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी
ज्ञानेश्वर राजूरकर यांनी केले.
जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या सभागृहात आज सकाळी आयोजित पुर्नवसनाबाबतच्या बैठकीत ते अधिका-यांना
मार्गदर्शन करत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी सोमनाथ गुंजाळ, तापी सिंचन विभागाचे
अधिक्षक अभियंता व्ही.डी.पाटील, जिल्हा पुर्नवसन अधिकारी श्री.राजगुरु, विशेष
भुसंपादन अधिकारी सर्वश्री प्रविण महिरे, सैंदाणे, दीपमाला चौरे, कार्यकारी
अभियंता राजश्री घाणे, तहसिलदार बबनराव काकडे, सर्व तालुका भूमि निरिक्षक आदि
उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राजूरकर यांनी
जिल्हयातील वाघुर, हतनुर, सुकी, पाडळसे धरणांमुळे पुर्नवसित झालेले लोक तसेच
अंजनी, तापी नदीच्या पुररेषेमुळे पुर्नवसित लोकांच्या पुर्नवसनाबाबतचा आढावा घेतला
यामध्ये विविध प्रकल्प व पुरांमुळे पुर्णत: व अशंत: पुर्नवसन करण्यात आलेल्या
गावांचा ही आढावा घेण्यात आला.
जिल्हयातील पुर्नवसनाची
कामे व समस्या त्वरीत मार्गी लावण्याकरिता जिल्हा पुर्नवसन अधिका-यांनी इतर
संबंधीत विभागांशी समन्वय साधणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी राजूरकर यांनी सांगितले
तसेच पुर्नवसनाचे काम हाती घेतल्यानंतर तेथे रस्ते, वीज, गटारी, स्मशानभूमी, पाणी
पुरवठा आदि कामांना प्राधान्य देण्याची सूचना त्यांनी केली.
तसेच ज्या ठिकाणी
पुर्नवसनाबाबत अडचणी निर्माण होत असतील अशा ठिकाणी पुर्नवसन अधिकारी,
प्रांताधिकारी, अभियंता, तहसिलदार व संबंधीत लोकांमध्ये समन्वय बैठक घेऊन सदरचे
प्रश्न मार्गी लावण्याची सूचना जिल्हाधिकारी राजूरकर यांनी केली.
* * * * * * * *
25 ऑक्टोंबरला रावेर येथे दारु विक्री बंद ठेवण्याचे आदेश
जळगाव, दिनांक 23 - जिल्हयात दिनांक 25 ऑक्टोंबर,2012 रोजी रावेर
येथे दुर्गादेवी विसर्जनानिमित्त मिरवणुकी निघणार आहेत. सदर उत्सव शांततेत व
सुरळीतपणे पार पडावा व त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,
सामाजिक सलोखा रहावा तसेच या कालावधीत रावेर येथील कायदा व सुव्यवस्था अबाधीत
रहावी म्हणून जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे
कलम 142 (1) नुसार दिनांक 25 ऑक्टोंबर,2012 रोजी रावेर नगरपालिका हद्दीतील व त्या
सिमेलगतची देशी / विदेशी मद्याची दुकाने / परमीट रुम, बिअर शॉपी व ताडी विक्रीची
दुकाने पुर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सदर आदेशाची अंमलबजावणी
काटेकोरपणे करावी उपरोक्त आदेशाचे उल्लघंन केल्याचे आढळुन आल्यास त्यांच्या
विरुध्द कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही या आदेशात नमुद करण्यात
आले आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment