मुंबई,
दि. 30 : पर्यावरणाचे संरक्षण आणि जागतिक तापमान वाढ हा संपूर्ण जगभरात कळीचा
मुद्दा बनलेला आहे. देऊळगावकर यांनी या महत्त्वाच्या विषयावर आणि प्रत्येक सजीव
प्राणीमात्राच्या जीवन मरणाशी संबंधीत लिहिलेले
"विश्वाचे आर्त" पुस्तक प्रत्येक संवेदनशील माणसाला विचार करायला लावेल,
असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.
प्रसिद्ध लेखक अतुल देऊळगावकर यांनी
लिहिलेल्या "विश्वाचे आर्त" या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते आज रवींद्र नाट्य मंदिर येथे करण्यात आले.
त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी लोकवाड्.मय गृहाचे सतीश काळसेकर,
श्रीमती वैशाली वैद्य, संदीप वासलेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, प्रचंड वेगाने
होणारे नागरिकीकरण, जंगलाची बेसुमार तोड, प्रदूषणकारी वायूंचे उत्सर्जन,
वाहनापासून होणाऱ्या हवेचे प्रदूषण आदी विविध कारणांमुळे पृथ्वीचे वातावरण संकटात
आले असून पर्यावरण आणि तापमान वाढ याबाबत प्रबोधन होण्याची गरज आहे. देऊळगावकर
यांचे पुस्तक यासाठी मोलाचा हातभार लावेल, असेही त्यांनी सांगितले.
हवामान बदल आणि जागतिक तापमान
वाढीच्या समस्येमुळे जग विनाशाच्या उंबरठ्यावर ठाकले असून या समस्येवर मात
करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची आवश्यकता आहे. "मला वाचवा" अशी
साथ घालून वसुंधरा विनवणी करीत आहे हेच "विश्वाचे आर्त" आहे. ही आर्त
आपणास ऐकू यावयास हवी. श्री. देऊळगावकर यांनी या पुस्तकातून एका अत्यंत
महत्त्वाच्या विषयाला वाचा फोडली आहे, या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर झाल्यास इतर
भाषिक लोकांनाही हे पुस्तक उपयुक्त ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त
केला.
यावेळी या "विश्वाचे आर्त"
या पुस्तकातील निवडक पुस्तकाचे वाचन अतुल पेठे, गजानन परांजपे, गितांजली कुलकर्णी
यांनी केले.
No comments:
Post a Comment