Tuesday, 2 October 2012

ग्रामसभांनी गावाचा विकासाचा आराखडा तयार करावा -- पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर





       जळगांव दिनांक 2 :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ग्रामीण भागाच्या विकासाकरिता विविध योजना राबविताना निधीची कमतरता नसल्याने ग्रामसभांनी गावाच्या परिसरात विविध विकास कामांचा आराखडा तयार करावा. तो पूर्ण करण्यासाठी त्याचा पाठपुरावा करण्याचे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांनी केले. ते आज नांदेड (ता. धरणगांव) येथे आयोजित महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जागृती अभियान कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ग्रामस्थांना मार्गदर्शन करत होते.
          यावेळी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल गायकवाड, उपजिल्हाधिकारी (रोहयो) जितेंद्र वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. पं.) राजन पाटील, नांदेड गावचे सरपंच राजेश अतरदे, उपसरपंच प्रविण अतरदे, पंचायत समिती सदस्या श्रीमती रेखा अतरदे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक वाल्मिक पाटील, प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी के. डी. महाजन, धरणगांव तहसिलदार महेंद्र पवार आदि अधिकारी/ पदाधिकारी यांचेसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
          प्रारंभी ना. देवकर यांच्य हस्ते महात्मा गांधी नरेगा जागृती अभियानाचा शुभारंभ दिपप्रज्वलन नांदेड गावांमधील नोंदणीधारक मजुरांना जॉबकार्डचे (मजुर पत्रक) वितरण करुन झाला. यामध्ये आत्माराम भोमटू धोबी, आण्णा ताराचंद भिल, प्रकाश खैरनार, राजू भिल, वसंत वाजळे आदि बेरोजगारांना जॉबकार्डचे वाटप ना. देवकर जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरुपात करण्यात आले.
          रोहयो उपजिल्हाधिकारी जितेंद्र वाघ यांनी अभियानाचा उद्देश सांगितला. तसेच जिल्हयात मागील सहा महिन्याच्या कालावधीत महात्मा गांधी नरेगा योजनेतून साडेसहा लाख मजुरांना रोजगार उपलब्ध करुन दिला असून सुमारे 20 कोटी पेखा अधिक निधी मजुरीवर खर्च केल्याची माहिती त्यांनी दिली. सर्वसामान्य लोकांना सदरच्या योजनेविषयी माहिती व्हावी त्यांच्यात जागृती निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. नांदेड गावांमधील ग्रामस्थ कलासंस्कृतीची जोपासना चांगल्या प्रकारे करत असून त्यांनी श्रमसंस्कृती ही जोपासण्याचे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल गायकवाड यांनी केले.  
          महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी महत्वपूर्ण असून त्याअंतर्गत जलसंधारण, मृदसंधारण इतर सार्वजनिक वैयक्तीक कामे घेता येतील असे जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी सांगितले. सदरचे अभियान 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत राबविले जाणार असून ही योजना जास्तीत जास्त लोकभिमुख केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.                                                                        
          त्याप्रमाणेच मजुरांची मजुरी पूर्वी पोस्टातून दिली जात होती. पंरतु मजुरीचे पैसे जमा होण्यासाठी दिरंगाई होत असल्याने अभियानाच्या काळात सर्व जॉबकार्ड धारकांचे पोस्टातील खाते बँकामध्ये वर्ग करण्यात येतील असे श्री. राजूरकर यांनी सांगितले. तसेच मजुरांना पंधरा दिवसात त्यांची मजुरी देण्याची जबाबदारी संबंधित अधिका-यांची असल्याने ती वेळेत देण्याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी केली. सदरच्या अभियानात जिल्हयातील जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेण्याचे आवाहन श्री. राजूरकर यांनी केले.
          ना. देवकर यांनी अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यामध्ये सदरच्या योजनेतून जास्तीत जास्त कामे गावांमध्ये करण्यासाठी ग्रामसभांनी कामांचे नियोजन करावे नियोजित केलेली सर्व कामे पूर्ण करावीत. त्याकरिता पदाधिकारी अधिकारी यांनी समन्वय ठेवून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. महात्मा गांधी  नरेगा मधून विविध प्रकारची कामे करता येतात. शेतरस्ते रस्त्याची इतर कामे मोठया प्रमाणावर सूचवून ती तात्काळ पूर्ण करण्याकरिता प्रयत्न करण्याची सूचना ना. देवकर यांनी केली. या योजनेतून केल्या जाणा-या कामांना निधीची कमतरता नसल्याने गावाचा परिसराच्या विकासासाठी लोकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
          याअंतर्गत दिले गेलेले  जॉबकार्ड हे शासनाकडून शंभर दिवसांच्या कामाची हमी असून पंधरा दिवसांच्या आत रोजगार संबंधितांना मिळाल्यास 25 टक्के बेरोजगार भत्ता देण्याची तरतुद असल्याने जिल्हयातील कोणतीही व्यक्ती मजुरीपासून वंचित राहणार नाही. असे  ना. देवकर यांनी सांगितले.
नांदेड येथे रस्ता कामाचा शुभारंभ
          या योजनेतून नांदेड गावांमधील पाच विहिरींच्या कामांना मंजुरी मिळाली असून श्री. किशोर कोळंबे या शेतक-याला विहिर कामाची वर्क ऑर्डर ना. देवकर यांच्या हस्ते देण्यात आली. तसेच नदीकाठ ते नांदेड गाव हा पाचशे मीटर रस्त्याच्या मुरुम कामाचा शुभारंभ पालकमंत्री ना. देवकर जिल्हाधिकारी राजूरकर यांच्या हस्ते करण्यात आला.
 धरणगांव क्रीडा संकुलाच्या कामाची पाहणी
       पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांनी आज दुपारी धरणगांव तालुका क्रीडा संकुलाच्या कामाची पाहणी केली. सद्यस्थितीत येथे क्रीडागणांच्या सपाटीकरणाचे काम सुरु असून विद्यार्थ्यांसाठी मैदान धावपट्टीचे काम लवकर पूर्ण करण्याची सूचना त्यांनी उपअभियंता श्री. सुरवाडे यांना केली. क्रीडागणांच्या कामाकरिता सुमारे 70 लाखाचा निधी आजपर्यंत उपलब्ध झालेला आहे.
          यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा सहकारी बँकेचे संचालक वाल्मिक पाटील, उपअभियंता (सार्व.बांधकाम) श्री. सुरवाडे आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment