मुंबई, दि. 30 : डेंग्यूच्या
प्रतिबंधासाठी आरोग्य विभागासोबत महापालिका, जिल्हापरिषद व जिल्हास्तरीय
यंत्रणांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.अशी सूचना आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी
आज येथे केली.
मुंबईसह
राज्यातील काही भागात डेंग्यूचा प्रादुर्भाव जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर
आरोग्यमंत्र्यांनी मंत्रालयात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
चर्चेच्या
प्रसंगी आरोग्यमंत्री म्हणाले की, डेंग्यू रोगाला कारणीभूत असणारे विशिष्ट प्रजातींचे
डास साठवून ठेवलेल्या उघड्या स्वच्छ पाण्यात जसे डबे, टायर, पाण्याच्या टाक्या अशा
ठिकाणे आढळून येतात. त्यामुळे महापालिका प्रशासनाने अशी ठिकाणी शोधून मोठ्या
प्रमाणावर स्वच्छता मोहीम हाती घ्यावी. नागरिकांना जनजागृतीच्या माध्यमातून
स्वच्छतेचे महत्व पटवून द्यावे, जेणे करून डेंग्यूला कारणीभूत ठरणाऱ्या डासांची
उत्पत्ती तेथे होणार नाही. डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी महापालिका, जिल्हापरिषद
आणि आरोग्य विभागाने एकत्रित उपाययोजना करावी, ग्रामीण भागात डेंग्यू संदर्भातील
जनजागृतीच्या कामासाठी आशा कर्मचाऱ्यांची देखील मदत घेण्यात यावी असे श्री. शेट्टी
यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व
जिल्हा रुग्णालयातील औषधांच्या साठ्याबाबतचा आढावाही यावेळी घेण्यात आला. सर्व
रुग्णालयात औषधांची उपलब्धता राहील याबाबत आरोग्य संचालनालयाने दक्षता घ्यावी असे
निर्देश श्री. शेट्टी यांनी यावेळी दिले.
डेंग्यूच्या
आजाराबाबत आरोग्य विभागामार्फत मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली
असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव टी. सी. बेंजामिन यांनी सांगितले.
आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले असल्याचे
श्री. बेंजामिन यांनी सांगितले.
बैठकीस एनआरएचएमचे प्रकल्प संचालक विकास
खारगे, आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील, डॉ. सतीश पवार, डॉ. खाणंदे आदींसह वरिष्ठ
अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment