Friday, 5 October 2012

निरपराध लोकांवर गुन्हे नोंदवू नयेत --पालकमंत्री ना.गुलाबराव देवकर

             जळगाव, दिनांक 5 - रावेर येथे  झालेल्या दंगलीमध्ये दोन्ही समाजातील अनेक दंगलखोरांना पोलिसांकडून अटक करण्यात आलेली असून त्यामधील अनेक लोक निरपराध असल्याची दोन्ही समाजाची भावना असल्याने अटक केलेल्या सर्व दंगलखोरांची पूर्वीची पार्श्वभुमी पाहून व त्यांचा दंगलीमधील सहभागाची चौकशी करुन निरपराध लोकांवर गुन्हे नोंदवू नयेत, अशी सूचना पालकमंत्री ना.गुलाबराव देवकर यांनी केली ते आज सकाळी रावेर येथील शासकीय विश्रामगृहात पोलिस अधिक्षक व हिंदु-मुस्लीम समाजाच्या लोकांशी चर्चा करत होते.
          यावेळी पोलिस अधिक्षक एस.जयकुमार, अपर पोलिस अधिक्षक रुपसिंग तडवी, भुसावळ प्रांतधिकारी राहुल मुंडके, तहसिलदार बबनराव काकडे, जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष गप्‍फार मलीक, राष्ट्रवादी कॉग्रेसचे समन्वयक विलास पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी देवेंद्र शिंदे आदिसह दोन्ही समाजाचे लोक उपस्थित होते.
          रावेर येथे दिनांक 29 व 30 सप्टेंबर रोजी हिंदु-मुस्लीम समाजामध्ये दंगल उसळली त्यातून दोन्ही बाजूचे सुमारे 50 घरांना आगी लावण्यात आल्या ती दंगल आटोक्यात आणण्यासाठी पोलिस प्रशासनाने तत्परता दाखविली व दोन्ही समाजातील दंगलखोरांना अटक केल्याची माहिती पोलिस अधिक्षक एस.जयकुमार यांनी पालकमंत्र्यांना दिली.
          जर सदरची कारवाई पोलिस प्रशासनाकडून झाली नसती तर सन 2008 च्या दंगलीपेक्षा ही मोठी दंगल होऊन सुमारे दोनशे ते अडीचशे घरांचे नुकसान झाले असते, असे जयकुमार यांनी सांगितले. दंगलखोरांनी काही पोलिस अधिकारी व तहसिलदार यांच्यावरही दगडफेक केली त्यातून हे अधिकारी कसबसे वाचले असेही त्यांनी सांगितले.
          त्यामुळे दंगलीत अटक केलेल्या प्रत्येकाची कसून चौकशी केली जात असून जर  यामध्ये काही निरपराध नागरिक असतील तर त्या लोकांना सोडून दिले जाईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी पोलिस प्रशासनाने अल्पावधीतच दंगल अटोक्यात आणून मोठी जीवीत व वित्त हानी टाळल्याने हिंदु-मुस्लीम समाजाच्या लोकांकडून प्रशासनाचे अभिनंदन करण्यात आले.
          ना.देवकर यांनी  प्रशासनाचे व दोन्ही समाजातील लोकांचे म्हणणे ऐकूण घेऊन दंगलीमध्ये अटक केलेल्या लोकांमध्ये जर कोणी निरपराध असेल तर पोलिस विभागाने त्याची चौकशी करुन त्यांना सोडून देण्याची सूचना केली त्यानंतर तहसिलदार बबनराव काकडे यांनी दंगलीमध्ये नुकसान झालेल्या लोकांची माहिती पालकमंत्र्यांना दिली.
          ना.देवकर यांनी रावेर येथील संभाजीनगर व नागझिरी भागात जाऊन दंगलीमध्ये नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली व सदरच्या लोकांचे त्यांनी सांत्वन केले तसेच सदरच्या लोकांना शासनाकडून मदत मिळणेकरिता त्वरीत कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला ना.देवकर यांनी दिल्या.
          यावेळी दंगलीमध्ये नुकसान झालेल्या श्रीमती शोभाताई भानुदास महाजन, श्रीमती बेबाबाई काशिनाथ महाजन, नजीम शब्बीर, शेख इरफान खॉ शब्बीर, शेख अरीफ खॉ शेख आदि नागरिकांना ना.देवकर यांच्या हस्ते तात्काळ मदत म्हणून पिवळे व केसरी रेशन कार्ड देण्यात आले.
          पाहणीच्या वेळी सर्व नागरिकांना ना.देवकर यांना ख-या दंगलखोरांना अटक करा परंतु निरपराध लोकांवर गुन्हे नोंदवू नयेत तसेच झालेल्या नुकसानीकरिता शासनाकडून त्वरीत मदत मिळावी आदि मागण्या करण्यात आल्या.
जखमी पोलिस अधिका-याची भेट
       सदरच्या दंगलीमध्ये आपले कर्तव्य बजावत असतांना दंगलखोरांवर अटकाव करतेवळी दगडफेकीमध्ये पोलिस निरिक्षक अनिल आखाडे जखमी झाले त्यांच्या डाव्या पायाला जबर मार लागून फॅक्चर झाले आहे या अधिका-याच्या घरी जाऊन ना.देवकर यांनी त्यांची भेट घेतली व त्यांची विचारपूस केली.

No comments:

Post a Comment