Saturday, 25 August 2012

पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा प्रश्न अधिकाऱ्यांनी गांभिर्याने हाताळावा . . पालकमंत्री गुलाबराव देवकर


     
    जळगांव दिनांक 25:- जिल्हयात उदभवलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबाबत सर्व योजना राबविणाऱ्या अधिकाऱ्यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गांभीर्याने हाताळावा व सर्व लोकांना पिण्याचे पाणी मिळेल असे नियोजन करुन सर्वाना पिण्याचे पाणी उपलब्ध होईल याची दक्षता घ्यावी  तसेच जिल्हयातील टंचाई निवारणाबाबत चालढकल करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई  करण्याचे  निर्देश पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी टंचाई आढावा बैठकीत दिले.
          आज अल्प बचत भवनात पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली  जिल्हयातील लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची टंचाईबाबत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस विधानसभेचे विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे, जि.प. अध्यक्ष दिलीप खोडपे, खासदार हरिभाऊ जावळे, महापौर विष्णु भंगाळे, जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, जि.प. मुध्यकार्यकारी अधिकारी शितल उगले, मनपा आयुक्त सोमनाथ गुंजाळ, अति. मु.का. अधिकारी सुनिल गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, मंचावर उपस्थित होते.
          याबैठकीत जिल्हयातील आतापर्यत पडलेल्या पावसाचा आढावा घेण्यात येऊन धरणातील व मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा आणि जिल्हयातील पिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच पाणी टंचाई निवारणार्थ हाती घेतलेल्या उपाय योजनांचा आढावा घेतला.  यात प्रामुख्याने  जिल्हयातील 22 गावांना 15 टॅकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत असून 93 विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तसेच 13 गावातील 12 तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनांव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत असुन 193 गावांत 318 विंधन विहीरी नव्याने घेण्यात आल्या आहेत. तसेच 41 गावांमध्ये 51 नविन कुपनलिका घेण्यात आल्या आहेत.  तसेच चाळीसगांवात 40 विहीरींचे खोलीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच 8 गावातील नळ योजनांची दुरुस्ती करण्यात आली आहे.  जिल्हयातील धरणगांव, चोपडा , अंमळनेर या शहरी भागात पाणी टंचाई निवारणार्थ चार पाणी योजनांना मंजुरी देण्यात आली असून ही कामे पुर्ण झालेली आहेत. तसेच या बैठकीत पेयजल टंचाई निवारणार्थ भविष्यकालीन योजनांसाठी आस्कमिक कृती आराखडाही तयार करण्यात आला असून तो बैठकीत सादर करण्यात आला.
          बैठकीत आ. साहेबराव पाटील, आ. संजय सावकारे, आ. चिमणराव पाटील, आ. गिरीष महाजन, आ. दिलीप वाघ, आ. राजीव देशमुख, आ. जगदीश वळवी, आ. मनिष जैन जिल्हयातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती, सर्व नगरपालिकांचे नगराध्यक्ष , सर्व तहसिलदार, सर्व गटविकास अधिकारी , सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी, जिल्हयातील सर्व यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठया संख्याने उपस्थित होते.
0 0 0 0 0

No comments:

Post a Comment