Friday, 3 August 2012

जात प्रमाणपत्र तपासणीस मुदतवाढ

 मुंबई, दि. 3 : सन 2011-12 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत शिकत असणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग जातीच्या विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत जातीच्या प्रमाणपत्राच्या तपासणीसाठी अर्ज सादर केलेले नाहीत, असे विद्यार्थी 2011-12 या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषध निर्माणशास्त्र या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छित असल्यास त्यांनी 16 ऑगस्ट 2012 पर्यंत आपले अर्ज संबंधित महाविद्यालयामार्फत संस्थेच्या प्राचार्यांकडे सादर करावेत. शैक्षणिक संस्थेने असे प्रस्ताव संबंधित विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे 23 ऑगस्ट 2012 पर्यंत पाठवावेत. विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी संबंधित विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे 30 ऑगस्ट 2012 पर्यंत हे प्रस्ताव पाठवावेत. समितीने अर्ज तपासून द्यावयाचा अंतिम दिनांक 15 नोव्हेंबर 2012 हा आहे. सामाजिक न्याय विभागातर्फे 25 जुलै 2012 रोजी हा शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे.
शैक्षणिक संस्थेने तसेच विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी प्राप्त पडताळणी प्रकरणे एकत्रितरित्या अंतिम तारखेला न पाठविता, हे अर्ज जसे प्राप्त होतील तसे तातडीने पुढे सादर करावेत. 
उशिरा आलेल्या अर्जांपैकी इयत्ता 12 वी मध्ये काही विद्यार्थ्यांच्या जातीचा दावा संशयास्पद असल्याने दावा तपासण्यास उशिर झाला व पर्यायाने संबंधित विद्यार्थ्यांस वैद्यकीय, अभियांत्रिकी , वास्तुशास्त्र व औषधी निर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयात पुढील शैक्षणिक वर्षामध्ये पदवी अभ्यासक्रमात  प्रवेश मिळण्यास अडचणी निर्माण झाल्यास अथवा प्रवेश मिळू न शकल्यास त्याची जबाबदारी शासनावर अथवा जाती प्रमाणपत्र तपासणी समितीवर राहणार नाही, असे संबंधित विद्यार्थ्यांकडून लेखी घेऊनच त्यांचे अर्ज तपासणीसाठी स्वीकारावेत असे आदेश शासनाने दिले आहेत.

No comments:

Post a Comment