Thursday, 9 August 2012

मंत्रिमंडळ निर्णय : चारा डेपो 15 ऑगस्ट नंतर बंद करून गरजेप्रमाणे जनावरांच्या छावण्या उघडणार

           राज्यातील सर्व चारा डेपो 15 ऑगस्टनंतर बंद करून त्या ऐवजी जेथे गरज असेल त्या भागात मागणीप्रमाणे जनावरांच्या छावण्या सुरु करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. सध्या ज्या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे तेथे 31 ऑगस्टपर्यंत टँकर सुरु राहतील. त्यानंतर टँकर सुरु ठेवण्याबाबत आवश्यकतेप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी निर्णय घ्यावा, असाही निर्णय घेण्यात आला.   
          राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील टंचाई सदृश्य परिस्थिती, पर्जन्यमान, चारा डेपो आणि जनावरांच्या छावण्या यांचा आढावा घेण्यात आला. 7 ऑगस्टपर्यंत राज्यातील अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, रत्नागिरी, सातारा, गडचिरोली आणि नागपूर या 8 जिल्ह्यामध्ये 100 टक्क्यांपेक्षा जास्त पर्जन्यमान झाले आहे. 9 जिल्ह्यात 76 ते 100 टक्के, 16 जिल्ह्यात 50 ते 75 टक्के पाऊस पडला आहे. 50 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस मुंबई आणि जालना या 2 जिल्ह्यात पडला आहे.  राज्यातील विविध प्रकल्पांच्या जलाशयातील पाणी साठा 43 टक्के झाला आहे. राज्यात 94 टक्के पेरण्या झाल्या आहेत. 
          यापूर्वी टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या 15 जिल्ह्यांमध्ये 1543 टँकरद्वारे 30 लाख 76 हजार 700 लोकसंख्येला पिण्याचा पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टंचाईग्रस्त भागात एकूण 344 चारा डेपो उघडण्यात आले आहेत.  सांगली (73), सातारा (38), सोलापूर (65), पुणे (22), नाशिक (6), अहमदनगर (107) आणि उस्मानाबाद (33) अशा 344 चारा डेपोतून चारा विक्री केली जात आहे.  आतापर्यंत 8 लाख 96 हजार 958 टन चारा उचलण्यात आला आहे.  यावर आतापर्यंत 221 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. राज्यात जनावरांच्या एकूण 44 छावण्या उघडण्यात आल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यात 26, नाशिकमध्ये 1, सातारा जिल्ह्यात 16 आणि सांगली जिल्ह्यात 1 अशा 44 छावण्यांमध्ये 28 हजार 956 जनावरे आहेत.  आतापर्यंत यावर 11 कोटी 20 लाख रुपये खर्च झाला आहे.
          राज्यातील टंचाई परिस्थिती लक्षात घेऊन याबाबतच्या सर्व उपाययोजनांना 31 जुलै 2012 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.  तथापि, राज्याच्या काही भागामध्ये पावसाची स्थिती अद्याप समाधानकारक नसल्यामुळे चारा डेपो 15 ऑगस्टपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय झाला. मात्र यानंतर कोठेही चारा डेपो सुरु केला जाणार नाही. आवश्यक असेल त्या ठिकाणी जनावरांच्या छावण्या सुरु करण्यात येतील. पिण्याच्या पाण्याचे टँकरही 31 ऑगस्टपर्यंत चालू ठेवले जाणार आहेत. त्यानंतर ज्या ठिकाणी गरज आहे अशा ठिकाणी टँकर सुरु करण्याचे अधिकारी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.
0 0 0 0 0

No comments:

Post a Comment