Tuesday, 21 August 2012

देशी मद्य एमआरपी विक्रीसंदर्भात आयुक्त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती एक महिन्यात निर्णय घेणार -गणेश नाईक


    मुंबई, दि. 21 : देशी मद्य  एमआरपी किंमतीने विक्री करण्याच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असून या समितीच्या अहवालानुसार अंतिम निर्णय एक महिन्याच्या आत घेण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक यांनी आज येथे सांगितले.
     यशवंतराव चव्हाण केंद्रात राज्य उत्पादन शुल्क अधिकारी व देशी मद्य उत्पादक वितरक, किरकोळ विक्रेते संघ यांची बैठक श्री. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या बैठकीत राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री राजेंद्र मुळक, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रधान सचिव आनंद कुलकर्णी, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त संजय मुखर्जी, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव विजय अचलिया, वित्त विभागाचे प्रधान सचिव क्षत्रपती शिवाजी, सह आयुक्त श्री.शेलार,  तसेच देशी मध्य उत्पादक, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   श्री. नाईक पुढे म्हणाले की, किरकोळ तसेच घाऊक देशी मद्य विक्रेत्यांना एमआरपी किंमतीने देशी मद्य विक्री करताना येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी  राज्य उत्पादन शुल्क आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असून यामध्ये देशी मद्य उत्पादकांचे प्रतिनिधी, विक्रेत्यांचे प्रतिनिधी, विधी व न्याय विभागाचे उपसचिव, वित्त विभागाचे उपसचिव यांचा समावेश असणार आहे. ही समिती आपला अहवाल तीन आठवड्यामध्ये सादर करेल. या अहवालावर विचार करुन एक महिन्याच्या आत योग्य तो निर्णय घेण्यात येईल. या संदर्भातील निर्णय घेताना राज्य शासनाची उद्दिष्टपूर्ती, घाऊक व किरकोळ विक्रेत्यांचे तसेच ग्राहक या सर्वांचे हित सांभाळण्याचा प्रयत्न करण्यात येईल. हे सर्व करताना कायद्याची अंमलबजावणी होणे हे सुध्दा अत्यंत महत्वाचे आहे असेही श्री. नाईक यांनी यावेळी सांगितले.
    उत्पादन शुल्क आयुक्त श्री. मुखर्जी यांनी देशी मद्य विक्री संदर्भात एमआरपी किंमत लावणे कसे महत्वाचे आहे यासंदर्भात सादरीकरण केले. एमआरपी किंमत नसल्यास ग्राहकाची फसवणूक तसेच शासनाच्या  महसूलांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे सांगितले.
    यावेळी राज्यभरातून आलेल्या घाऊक, किरकोळ देशी मद्य विक्रेते, उत्पादक यांनी एमआरपी किंमतीने मद्य विक्री करताना येणाऱ्या अडचणी संदर्भात आपली भूमिका मांडली.

No comments:

Post a Comment