मुंबई, दि. 9: जगातील इतर
देशापेक्षा भारतातील लोकशाही अधिक बळकट असल्यामुळे आज विविध पातळीवर प्रगती करत असून भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज
येथे केले.
स्वातंत्र्य चळवळीत हुतात्मा झालेल्या
स्वातंत्र्य सैनिकांच्या ऑगस्ट क्रांती मैदानातील
स्मृती स्तंभाला आज 9 ऑगस्ट, या ऑगस्ट क्रांती दिनी मुख्यमंत्र्यांनी पुष्पचक्र
अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर आयोजित
कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. या
प्रसंगी सार्वजनिक आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, महिला व बालविकास मंत्री वर्षा गायकवाड, माजी केंद्रीय मंत्री मुरली
देवरा, आमदार माणिकराव ठाकरे आदीनीही स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन
स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन केले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले
की 9 ऑगस्ट 1942 या दिवशी याच मैदानावर महात्मा गांधीजींनी "चले
जाव" चा नारा दिला. स्वातंत्र्य चळवळीतील अत्यंत महत्त्वाचा असा हा
दिवस आहे. भारतीय राज्यघटना मजबूत असल्याने देश विविध पातळ्यांवर प्रगती करत आहे. सध्या हवामान बदलामुळे नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. दारिद्र्य रेषेखालील माणसाला तसेच शेतकऱ्यांना
अधिक सुविधा देण्याची आवश्यकता आहे.
राज्यातील सामान्य माणसाचा विकास करुन राज्याचा सर्वांगीण विकास करायचा
असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी
स्वातंत्र्यसैनिक शांती पटेल, भिलारे
गुरुजी, रामेश्वर राऊत, रमेश कुलकर्णी, श्रीमती नीलप्रभा आदी
मान्यवरांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
रमजान महिना शांती,
प्रेम, सद्भावना संदेश देणारा
-मुख्यमंत्री
मुंबई, दि. 9 : इस्लाम
धर्मातील पवित्र अशा रमजान महिना शांती, प्रेम, सद्भावना आणि बंधुभावाचा संदेश
देणारा असून राज्यातील नागरिकांनी या महिन्याचे पावित्र्य राखत राज्याच्या विकास प्रक्रियेत
योगदान दयावे, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
गिरगाव चौपाटी येथील विल्सन महाविद्यालयात काल झालेल्या
इफ्तार पार्टी कार्यक्रमात ते बोलत होते. माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी
यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुस्लिम बोहरा
समाजातील मुस्तफाभाई घडीयालवाला, जोएबभाई बुटवाला, बद्रुभाई पटेल यांच्यासह विविध
क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
श्री. चव्हाण म्हणाले की, राज्यातील विविध समस्यांच्या
निराकरणासाठी सर्वांनी मिळून एकजुटीने काम केले पाहिजे. बंधुभावाचे वातावरण कायम
राहिले तरच विकास प्रक्रियेला गती येऊ शकेल. व्यापार, उद्योग, निर्यात अशा विविध
क्षेत्रात महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे राज्य आहे. सर्व जातीधर्मांतील लोकांनी
खांद्याला खांद्या लावून वाटचाल केल्यास आपण कोणत्याही प्रकारच्या समस्येचे सहज
निराकरण करु शकू, असेही ते म्हणाले.
पर्यावरण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री संजय देवतळे,
राज्यमंत्री श्रीमती फौजिया खान यांनीही या कार्यक्रमात भाग घेतला.
* * * * *
No comments:
Post a Comment