अहमदनगर दि. 12 - जिल्हयात सातत्याने निर्माण होणा-या टंचाई परिस्थितीवर कायम स्वरुपी मात करण्यासाठी अधिकाधिक साठवण बंधारे (चेक डॅम) बांधण्यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी केले.
पाथडी तालुक्यातील मोहोज खुर्द येथे जनावरांच्या छावणीस आज राज्यपाल के. शंकरनारायन यांनी भेट दिली. यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
राज्यपाल पुढे म्हणाले की, गेल्या दोन दिवसापासून लोकप्रतिनिधी , शेतकरी, शेतमजूर, शासकीय अधिकारी यांच्याशी पाण्याची उपलब्धता कशी वाढवावी याबाबत चर्चा केली. आकाशात ढग आहेत, पाऊस पडत नाही. नद्यांमध्ये पाण्याचा थेंब नाही. पीक परिस्थिती वाईट आहे. जनावरांसाठी जमिनीत गवत उगवले नाही. गावात पाणी नाही. जनावरांना चारा नाही म्हणून शेतकरी छावणीत जनावरे आणत आहेत ही दुःखाची बाब आहे. पुढील दोन वर्षे पुरेल एवढे अन्नधान्य शासनाकडे उपलब्ध आहे. जिल्हयात पाऊस नाही. अशावेळी कोणांवरही टिका टिपणी करुन उपयोग नाही. देश स्वतंत्र्य झाला त्यावेळची लोकसख्या 30 कोटी होती. आता ही लोकसंख्या 122 कोटीवर गेली आहे. त्यामुळे पाण्याची गरजही वाढली आहे. यासाठी प्रत्येक गावागावात साठवण बंधारे उभारण्याची आवश्यकता आहे असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य म्हणून ओळखले जाते. ही श्रीमंती मुंबई सारख्या मोठया शहरामुळे दिसून येते. ग्रामीण भागातही अशीच श्रीमंती वाढविण्यासाठी अधिकाधिक सुविधा वाढविण्याची आवश्यकता आहे. ग्रामस्थांनी केलेल्या मागण्याच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री व केंद्र शासनाशी चर्चा करुन वास्तव परिस्थिती त्याच्यासमोर मांडून अधिकाधिक मदत देण्यासाठी पाठपुरावा केला जार्इल असेही राज्यपाल यांनी सांगितले.
राज्यात दर दहा वर्षानी टंचाई परिस्थिती निर्माण होत आहे. या टंचाई परिस्थितीच्या निवारणार्थ शासनाने आर्थिक मदतीबरोबर विविध उपाययोजना करुन मात केलेली आहे. परंतू ही परिस्थिती उदभवू नये यासाठी कायम स्वरुपी योजनावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे सांगून जिल्हयाचे पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी जनावारांच्या छावण्या गावागावात सुरु करुन त्यांना चांगल्या प्रकारचा चारा, पाणी, सुग्रास पशुखाद्य मिळावे जिल्हयातील अवर्षण- प्रवण भागात असणा-या सात तालुक्यासाठी जलसंधारण कामाकरिता प्रत्येकी 50 कोटी रुपयाचा निधी मिळावा. टंचाई उपाय योजनासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अधिकाधिक निधी मिळावा आदि मागण्या यावेळी केल्या. जिल्हयात अपु-या पावसामुळे टंचाईची तीव्रता वाढत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांच्या चा-याकरिता मागणी वाढत आहे. त्यासाठी जिल्हयाला विशेष आर्थिक मदत मिळावी नगर जिल्हयातील आवर्षण -प्रवण तालुक्याकरिता साठवण बंधा-यांकरिता आर्थिक निधी उपलब्ध व्हावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी केले.
पाथर्डी तालुक्यात सातत्याने टंचाई परिस्थिती निर्माण होत असल्याने हा तालुका कायम स्वरुपी दुष्काळी जाहिर करुन आर्थिक निधी मिळावा अशी मागणी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा मोनिका राजळे यांनी केली.
पाथर्डी, शेवगांव तालुके दुष्काळी जाहिर करण्याची मागणी करुन आमदार चंद्रशेखर घुले यांनी सर्व पिकांवरील कर्ज माफ करावे. जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्यासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध व्हावा. मागेल त्याला काम , जनावरांचा चारा व पाणी, पिण्याचे पाणी, जनावरांच्या छावण्या अधिकाधिक सुरु करण्यात याव्यात अशा मागण्या केल्या.
यावेळी प्रताप ढाकणे व शेतक-यांनी, विविध मागण्या राज्यपाल महोदयासमोर मांडल्या यामध्ये विद्यार्थ्याची शैक्षणिक फि माफ करावी, पाथर्डी तालुका दुष्काळी जाहिर करावा, जनावरांना चारा पाणी, सुग्रास पशुखाद्य मिळावे. प्रत्येक गावात जनावरांच्या छावण्या सुरु कराव्यात, पिक विम्याला संपूर्ण संरक्षण मिळावे. संपूर्ण कर्ज माफी मिळावी आदि मागण्या केल्या .
प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. संजीव कुमार यांनी जिल्हयात 26 जनावरांच्या छावण्या सुरु असून या छावण्यात 10 हजार 712 लहान मोठे जनावरे दाखल आहेत. मोहोज खुर्द या छावणीमध्ये 238 जनावरे दाखल आहेत अशी माहिती दिली.
पाथर्डी तालुक्यातील मोहोज खुर्द येथे सिध्दार्थ सहकारी दुध उत्पादक संस्थेच्या वतीने जनावरांची छावणी 14 मे पासून सुरु करण्यात आलेली आहे. या छावणीत परिसरातील 8 गावातील 238 लहान मोठी जनावरे दाखल आहेत अशी माहिती संस्थेचे चेअरमन श्री वांढेकर यांनी दिली.
यावेळी राज्यपाल यांनी जनावरांच्या छावणीस प्रत्यक्ष भेट देवून शेतक-यांची अस्थेवाईकपणे विचारपूस केली. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र पाटील, जिल्हा पुनर्वसन अधिकारी गोरक्ष गाडीलकर , रोहयो उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सोपान कासार, नगरचे उप विभागीय अधिकारी राजेंद्र पाटील, पाथर्डीच्या तहसीलदार वंदना खरमाळे आदि अधिकारी , शेतकरी ,ग्रामस्थ उपस्थित होते.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment