Monday, 30 September 2013

मागासवर्गीयांच्या विकासासाठी जनजागृतीची आवश्यकता- आ.साहेबराव पाटील

 




                              मागासवर्गीयांच्या विकासासाठी जनजागृतीची आवश्यकता 
                                           -- आ.साहेबराव पाटील
 [            जळगाव दि.30 : भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्यातील दुर्बल घटक विशेषत: अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या लोकांचा शैक्षणिक आर्थिक विकास होण्यासाठी जनजागृती झाली पाहिजे, असे प्रतिपादन कृषिभूषण आ.साहेबराव पाटील यांनी दहिवद ता.अमळनेर येथील आयोजित पारधी समाजाच्या जनजागृती मेळाव्यात केले.
            एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे पारधी समाजाचा जनजागृती मेळाव्याचे आयोजन दहिवद ता.अमळनेर येथील आश्रमशाळेत केले होते. या प्रसंगी  सरपंच विलास भदाणे, जि.प.सदस्य भगवान पाटील, पारधी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश चव्हाण, प्रकल्प अधिकारी शुक्राचार्य दुधाळ, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
            आदिवासी क्रांतीकारक बिर्सा मुंडा तसेच सरस्वती प्रतिमेचे पूजन आ.साहेबराव पाटील यांच्या हस्ते करुन या मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला. आदिवासी विकास विभागामार्फत पारधी समाजाच्या 26 घरकुल लाभार्थ्यांना यावेळी धनादेशाचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर पारधी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आ.पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी दहिवद तसेच वैजापूर येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर करुन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. विजय नाना पाटील आर्मी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संचलन करुन मानवंदना दिली.
            प्रकल्प अधिकारी शुक्राचार्य दुधाळ यांनी मार्गदर्शनपर भाषणात पारधी जमात ही देशाची मूळ राज्यकर्ती जमात असुन कालातंराने ही जमात मागासली गेल्याने या जमातीचे शैक्षणीक आर्थिक उत्कर्ष करण्याचा ऊद्देश समोर ठेवुन या जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी विकास विभागामार्फत एकुण 465 प्रकारच्या विविध योजना राबविल्या जातात परंतु या योजनांविषयीची माहिती ही लाभार्थ्यांपर्यत पोहचत नसल्यामुळे शासनाच्या कल्याणकारी योजनांपासुन लाभार्थी वंचित राहतात. त्यासाठी जनजागृती मेळाव्यामुळे विविध जमाती प्रवाहात येतील असा आशावाद व्यक्त करुन पारधी समाजाचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्यात आला असुन त्याविषयी तसेच विविध योजनांविषयीचा उवापोह त्यांनी आपल्या भाषणातुन केला.
            या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक प्रकल्प अधिकारी ए.डी.माळी यांनी केले कार्यक्रमासाठी पारधी समाजाचे राज्याध्यक्ष आत्माराम पवार, पारधी समाज तालुकाध्यक्ष मधुकर चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पन्नालाल मावळे यांच्यासह पारधी समाजातील विविध अधिकारी, पदाधिकारी परिसरातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment