जळगाव, दि. 13 :- शासनाच्या आधारभूत किंमतीत धान्य खरेदी करण्याच्या
धोरणामुळे शेतक-यांना त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला मिळतो, असे प्रतिपादन
राज्याचे कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय आणि
भटक्या व विमुक्त जातींचे कल्याण राज्यमंत्री तथा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री संजय
सावकारे यांनी भुसावळ येथे केले.
शासनाच्या आधारभूत धान्य खरेदी योजने अंतर्गत आज भुसावळ कृषी उत्पन्न बाजार
समितीत पालकमंत्री सावकारे यांच्या हस्ते उडीद, मुग, सोयाबीन या कडधान्याच्या
खरेदी केंद्राचे उदघाटन करण्यात आले.
याप्रसंगी बोलतांना सावकारे म्हणाले की, शासनाच्या आधारभूत किंमतीत
धान्य खरेदी करण्याच्या धोरणामुळे शेतक-यांना त्यांचा योग्य मोबदला मिळण्याची हमी
असते. खुल्या बाजारात त्यांच्या मालाला या किंमती पेक्षा जास्त भाव मिळू शकतो. खास
शेतक-यांसाठी असणा-या या योजनेचा फायदा इतरांना होऊ नये यासाठीही शासन दक्षता घेत
आहे. स्थानिक शेतक-यांना माल साठवणीसाठी आवश्यक गोदामे उपलब्ध करुन देण्यासाठी
आम्ही वखार महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत असेही त्यांनी उपस्थितांना
आश्वास्त केले.
उडीद पिकासाठी 4300 रुपये तर मुगासाठी 4500 रुपये प्रतिक्विंटल आधारभूत भाव
असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी मार्केटींग फेडरेशनचे चेअरमन, ॲड. रविंद्र
भैय्या पाटील, शेती संघाचे संचालक गजानन सरोदे, पंचायत समितीच्या सभापती मंगला
झोपे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पाटील, प्रवीण भोळे, उपसभापती अण्णा
शिंदे आदि उपस्थित होते.
No comments:
Post a Comment