Sunday, 15 September 2013

राज्यात 1257 ठिकाणी नवीन रुग्णालये सुरु करणार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची जळगाव येथे घोषणा


राज्यात 1257 ठिकाणी नवीन रुग्णालये सुरु करणार
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची जळगाव येथे घोषणा

                 जळगाव, दि. 15-  देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आरोग्य सुविधांच्या बाबतीत अग्रेसर असला तरी विकसित राष्ट्रांच्या बरोबरीने आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. आरोग्य सुविधा अधिकाधिक लोकांपर्यंत उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्याचा जीपीएस सर्व्हे करुन 1257 ठिकाणी नवीन रुग्णालये सुरु करण्याचा,तसेच 55 रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी घोषणा  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केली. तात्काळ आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी शासनाने इएमआरसी ही विनामूल्य रुग्णवाहिका सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच राज्यातील कुपोषण दूर करण्यासाठी राज्य शासनाने राबविलेल्या राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य पोषण आहार मिशनमुळे कुपोषणाचे प्रमाण कमी होत असून या योजनेची युनिसेफने वाखाणणी केली आहे, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.
                 जळगाव येथे ऑर्कीड मल्टी सुपर स्पेशिॲलिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल हे होते. याप्रसंगी प्रवचनकार रमेशभाई ओझा तसेच राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांचीही उपस्थिती  होती.
               यानिमित्त छत्रपती शिवाजी क्रीडा संकूलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, विनामूल्य रुग्णवाहिका सेवा एका टोल फ्री क्रमांकावर दुरध्वनी केल्यावर आजाराची आणि आपल्या ठिकाणाची माहिती दिली तरी आपल्याला घेण्यासाठी रुग्णवाहिका हजर होईल, असे या योजनेचे स्वरुप असल्याचे  त्यांनी सांगितले . माता आणि बालमृत्युचे प्रमाण कमी करण्यात आपण यशस्वी झालो असलो तरी याबाबत जागतिक निकष प्राप्त करण्यासाठी आमचे प्रयत्न  सुरु आहेत. देशाला प्रगतीपथावर न्यायचे असेल तर देशात मंदिरांपेक्षा विद्यामंदिरे आणि आरोग्य मंदिरांची संख्या वाढविणे आवश्यक आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
       याप्रसंगी डॉ. नरेंद्र दोशी यांचा प्रदीर्घ वैद्यकीय सेवेबद्द्ल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
                  आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी  यांनी  याप्रसंगी सांगितले की, राज्यातील सर्वसामान्य जनतेला दुर्धर आजारांचे उपचार  मोफत करता यावे यासाठी शासनाने राजीव गांधी जिवनदायी आरोग्य योजना सुरु केली आहे. पहिल्या टप्प्यात ही योजना आठ जिल्ह्यात लागू झाली  आहे.  गेल्या वर्षभरात या योजनेअंतर्गत 90 हजार शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या. त्यात कॅन्सर, ह्दय शस्त्रक्रिया या सारख्या महागड्या शस्त्रक्रियांचाही समावेश होता. लवकरच राज्यातील अन्य जिल्हयातही योजना लागू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. खाजगी इस्पितळांनी या योजनेत सहभागी होऊन अधिकाधिक रुग्णांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या सोहळ्याप्रसंगी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल, रमेशभाई ओझा, आ. गोपालदास अग्रवाल यांचीही समयोचित भाषणे झाली.
         तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांचे  जळगाव विमानतळावर सकाळी अकराच्या सुमारास आगमन झाले. जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्या स्वागतासाठी  जळगावचे पालकमंत्री संजय सावकारे, जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, जि. मुख्य कार्यकारी अधिकारी शितल उगले , पोलीस अधिक्षक एस. जयकुमार आदी मान्यवर उपस्थित होते.
                 या उदघाटन सोहळयास कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय आणि भटक्या व विमुक्त जातींचे कल्याण राज्यमंत्री  तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री  संजय सावकारे, जळगाव महानगरपालिकेचे महापौर किशोर पाटील, खा. ईश्वर जैन, आ. शिरीष चौधरी, आ. गोपालदास अग्रवाल, आ. संजय दत्त, आ. रामरतन बापू राऊत,  आ. मनिष जैन, माजी खासदार उल्हास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
                 प्रास्ताविक डॉ. परेश दोशी यांनी  आभारप्रदर्शन डॉ. प्रीती दोशी यांनी केले,तर सूत्रसंचालन अपूर्वा वाणी यांनी केले.

No comments:

Post a Comment