Tuesday, 9 April 2013

जागतिक पातळीवर कोणत्याही राष्ट्राचे वैश्विक व नैतिक स्थान सैनिकी शक्तीवर न ठरता विज्ञान तंत्रज्ञानातील योगदान व कुशल मनुष्यबळावरच ठरणार --उपराष्ट्रपती मो.हमीद अन्सारी



          जळगाव दिनांक 9 -  येत्या काही दशकात जागतिक पातळीवर कोणत्याही राष्ट्राचे वैश्विक   नैतीक स्थान सैनिकी शक्तीवर  ठरता विकसित विज्ञान तंत्रज्ञानातील योगदान आणि कौशल्य असलेल्या मनुष्यबळावरच ठरणार आहे, याचे भान विद्यापीठांनी ठेवण्याची गरज आहे असे प्रतिपादन भारताचे उपराष्ट्रपती मो. हामिद अन्सारी यांनी केले.
         उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा एकविसावा पदवीप्रदान समारंभ उपराष्ट्रपती मो. हामिद अन्सारी यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाच्या पदविदान सभागृहात झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री. के. शंकरनारायणन् होते. यावेळी भारताच्या हरित क्रांतीचे जनक पद्मविभूषण प्रा. एम.एस. स्वामीनाथन यांना डॉक्टर ऑफ लेटर्स या सर्वोच्च सन्माननीय पदवीने सन्मानीत करण्यात आले. कृषी परिवहन राज्यमंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. गुलाबराव देवकर, कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम उपस्थित होते.
            उपराष्ट्रपती म्हणाले की, आर्थिक सामाजिक विकासासाठी ज्ञान आणि कौशल्य या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत. कौशल्य विकसित करणे हे वैयक्तिक त्या व्यक्तीच्या  सामाजिक स्वीकार आणि मूल्यवृध्दीसाठी शक्तीमान आयुध आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या मते कौशल्य संवर्धन विकसित करणे हे शाश्वत विकासासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. पंतप्रधानांचे कौशल्य विकसनचे सल्लागार     श्री. एस. रामादोराई यांच्या मते कौशल्य विकसनातुनच शैक्षणिक गुणवत्ता ठरणार आहे. कौशल्याचे प्रशिक्षण स्त्री - पुरूषांना देऊन नवनिर्मितीची गुंतवणूक, तंत्रज्ञानातील बदल, उद्योजकीय विकास, आर्थिक बदल यातुन आर्थिक व्यवस्था नवीन रोजगार निर्मितीचे मार्ग शोधणार आहे.
             विद्यार्थ्यांनी कौशल्य आणि ज्ञान सातत्याने अद्ययावत करणे गरजेचे आहे. त्याचा संबंध गुणवत्तापूर्ण रोजगाराशी आहे. भारतात तरुणांची संख्या अधिक असल्यामुळे जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे.  या पार्श्वभूमीवर जागतिक अर्थकारणात भारताला मोठी संधी आहे. कौशल्य हेच भांडवल असणारा देश अशी  भारताची जगात ओळख होणार आहे. असे सांगून उपराष्ट्रपती श्री. अन्सारी म्हणाले की, सन 2020 पर्यंत 560 लाख  प्रशिक्षीत मनुष्यबळाचा तुटवडा जाणवणार आहे.  एका शोध निबंधात स्पष्ट झाले आहे की, भारतात 4 कोटी 50 लाख लोक कार्यरत आहेत. त्यापैकी, फक्त 8 ते 9 टक्के हे संघटीत / औपचारिक गटात आहेत. तर 5 टक्के लोकांकडे बाजारपेठेला उपयोगी असणारे कौशल्य उपलब्ध आहे. इतर देशांमध्ये मात्र हे प्रमाण 50 ते 60 टक्के आहे. भारतीय अर्थव्यवस्था बदलून परिपक्व होऊ लागली आहे. तसे
            रोजगाराच्या क्षेत्रातही बदल होऊ लागले आहेत. कृषी क्षेत्राकडून  उत्पादन आणि सेवा क्षेत्राकडे  लोक वळू लागले आहेत. हे अपरिहार्य आहे. पण या क्षेत्रात विशेष कौशल्याची गरज असून, त्या त्रुटीकडे लक्ष द्यावे लागणार आहे. सन 2022 मध्ये स्थुल राष्ट्रीय उत्त्पन्नाचा दर 8 टक्क्यावर आणायचा असेल तर 5 कोटी कुशल मनुष्यबळाची गरज भासणार आहे. तेव्हाच हे शक्य आहे, जेव्हा दरवर्षी 12 कोटी लोक जोडले जातील. विकास दर शाश्वत ठेवण्यासाठी मनुष्यबळाला तांत्रिक शिक्षण देऊन व्यवसायभिमूख कौशल्य उच्च शिक्षणातून कौशल्ये देणे गरजेचे आहे. सध्या 3 कोटी 40 लाख कुशल मनुष्यबळ तंत्रशिक्षण घेऊन तयार होतात. इतर देशांच्या तुलनेत ही संख्या कमी असून, तंत्रशिक्षणात दरवर्षी 15 कोटींपर्यंत हे उद्दिष्ट्य गाठण्याचे आव्हान आपल्या समोर आहे. अकराव्या पंचवार्षिक योजनेत राष्ट्रीय कौशल्य विकास मिशन स्थापनेची शिफारस करण्यात आली. यातून कौशल्य विकासासाठी एकत्रित प्रयत्न केले गेले. 2009 मध्ये कौशल्य विकासासाठी राष्ट्रीय धोरण आखले होते.
            बाराव्या पंचवार्षिक योजनेत 2017 पर्यंत 50 कोटी कुशल मनुष्यबळ निर्माण करावयाचे आहे. त्यासाठी शासन,  कार्पोरेट क्षेत्र, नागरी समाज, स्वयंसेवी संस्था यांनी एकत्रीतपणे प्रयत्न केले तरच हे सर्व शक्य आहे. बाराव्या पंचवार्षिक योजनेत आपली उच्चशिक्षण यंत्रणा गुणात्मक दर्जामध्ये कमी पडते आणि बरीच विद्यापीठे रोजगाराच्या बाजारपेठेत उपयुक्त ठरणाऱ्या विषयात पदवीधर निर्माण करते असे नमूद केले आहे. यशपाल समितीच्या अहवालात भारतीय शिक्षण पध्दतीत व्यावसायिक शिक्षण हे विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या कार्य क्षेत्राबाहेर आहे. हे अंतर मोडून काढण्यासाठी विद्यापीठांनी तंत्रशिक्षण, औद्योगिक प्रशिक्षण यांचे अभ्यासक्रम राबविले पाहिजेत. व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठात प्रवेश देऊन त्यांचे ज्ञान अद्ययावत करण्याची गरज आहे, असे नमूद केले आहे.  या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासारख्या शैक्षणिक संस्थेसमोर  आव्हान उभे आहे की, त्यांनी नियोजीत अभ्यासक्रमात बदल करून कौशल्य विकासाकडे लक्ष केंद्रीत करणाऱ्या अभ्यासक्रमांचा समावेश करायला हवा. यात गुणात्मकतेला अतिशय महत्त्व आहे, असेही उपराष्ट्रपतींनी यावेळी सांगितले.
            यावेळी उपराष्ट्रपतींनी ग्रामीण आणि मागास विशेषत: 25 टक्के आदिवासी असलेल्या भागात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने केवळ दोन दशकांच्या प्रवासात उत्तम शैक्षणिक केंद्र म्हणून महत्त्वाचे स्थान निर्माण केल्याचा उल्लेख केला. आदिवासी आणि अल्पसंख्यांक समाजातील दूर्बल घटकांच्या शैक्षणिक विकासाकडे विद्यापीठाकडून विशेष  लक्ष दिले जात आहे. नंदूरबार येथील प्रस्तावित अकादमी स्थापनण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. प्रयोगशाळा ते जमीन आणि प्रयोगशाळा ते उद्योग  हे दोनही उपक्रम वाखाणण्याजोगे आहेत. नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम, गुणवत्तापुर्ण शिक्षण, संशोधन आणि शिक्षकांच्या बळावर या विद्यापीठाने विश्वासार्हता प्राप्त केली आहे, असेही उपराष्ट्रपतींनी सांगितले.
            राज्यपाल श्री. के. शंकरनारायणन् कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम यांच्या हस्ते डॉक्टर ऑफ लेटर्स ही पदवी स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना प्रा. एम.एस. स्वामीनाथन यांनी दुष्काळ, अन्नधान्य सुरक्षा अशा काही महत्त्वाच्या विषयांवर आपली मते मांडली. ते म्हणाले की, उत्तर महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आहे. महाराष्ट्रात नेहमीच दुष्काळ पडतो. दुष्काळ निवारण कार्यक्रम, पाणी  व्यवस्थापन असे कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतलेले आहेत. मात्र वातावरणात भरपूर बदल होत असल्यामुळे दुष्काळ आणि पूर या नैसर्गिक आपत्ती वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी सजग राहून शाश्वत पाणी सुरक्षेसाठी काही कार्यक्रम घेतले पाहिजेत. केंद्रीय भूजल मंडळ, केंद्रीय पाणी संसाधन मंत्रालय आणि राज्य सरकार यांच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात 353 ब्लॉकपैकी 9 ब्लॉकचा उपसा क्षमतेपेक्षा अधिक झाला आहे. एका ब्लॉकने धोक्याची पातळी गाठली आहे तर 19 ब्लॉक धोक्याच्या पातळीजवळ आहे. मात्र 324 ब्लॉक अजूनही सुरक्षीत वर्गात आहेत. पावसाळ्याच्या आधी गतवर्षी केलेल्या सर्व्हेक्षणानुसार महाराष्ट्रात पाणी पातळी 5 ते 20 मीटर जमिनीच्या खाली आढळून आलेली आहे. जे भूजल साठे सुरक्षीत आहेत त्यांना अभय देण्याची गरज आहे. शेती, पशुधनासाठी जेव्हा अत्यावश्यक असेल तेव्हाच या साठ्याचा उपयोग करायला हवा. पावसाच्या पाण्याचे घरात आणि शेतात संवर्धन करावे लागणार आहे. ग्रामसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी पाण्याच्या एका थेंबावर पिकाचे अधिक उत्पन्न कसे होईल याचे धोरण आखण्याची गरज आहे. यातून 2/3 भारतीय लोकसंख्येची उपासमारीतून सुटका होणार आहे. उपासमारीपासून अन्न सुरक्षेपर्यंतचा भारताचा हा प्रवास शास्त्रीय कौशल्य, राजकीय इच्छाशक्ती आणि शेतकऱ्यांचे श्रम यांच्या एकत्रित प्रयत्नाने झाला आहे. उत्पन्नातील बदल केलेल्या धान्य प्रकाराबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. ही भीती दूर करण्यासाठी विद्यापीठांनी जैविक साक्षरता मोहिम राबवून लोकांना त्याचे फायदे धोके समजावून सांगत उत्पन्नातील तंत्रज्ञानाशी त्यांना जोडून घ्यावे. या विद्यापीठाचे विद्यार्थी आपल्या ग्रामीण परिसरासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देतील. पण त्यासोबतच पारंपरिक शहाणपण पर्यावरण संतुलनाचे भानही त्यांना असेल अशी अपेक्षा प्रा. स्वामीनाथन यांनी  व्यक्त केली.
            कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम यांनी आपल्या मनोगतात विद्यापीठाच्या वाटचालीची माहिती दिली.  संशोधन, सामंजस्य करार, उपकेंद्रांची बळकटी, प्रयोगशाळा ते जमीन, प्रयोगशाळा ते उद्योग आणि विद्यार्थ्यांसाठी  राबविल्या जाणाऱ्या योजनांचा आढावा त्यांनी आपल्या भाषणात घेतला. पदवीचा उपयोग समाजासाठी करावा. सर्व बदलांना सामोरे जाण्याची तयारी विद्यार्थ्यांनी ठेवावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
            दीक्षांत मिरवणूकीने सभामंडपात अतिथींचे आगमन झाले. विद्यापीठाचा मानदंड घेऊन मिरवणूकीच्या अग्रभागी संगणक केंद्रप्रमुख श्री. बी.पी. पाटील हे होते. दीक्षांत मिरवणूकीत प्रमुख अतिथींसह अधिसभा सदस्य, विद्या परिषद सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्य हे सहभागी होते. प्रारंभी राष्ट्रगीत विद्यापीठ गीताने सुरूवात  झाली. त्यानंतर कुलसचिव प्रा.ए.एम.महाजन यांनी राज्यपालांकडे कार्यक्रम सुरू करण्याची परवानगी मागितली. विविध विद्याशाखांच्या अधिष्ठातांनी स्नातकांना पदवी प्रदान करण्यास्तव केलेल्या विनंतीनुसार राज्यपाल श्री. के. शंकरनारायणन् यांनी स्नातकांना पदवी प्रदान केल्या. अधिष्ठातांमध्ये, कला ललितकला विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. शिरीष पाटील, मानसनीति समाजविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आसाराम पैठणे, विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. बी.व्ही. पवार, विधी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. युवाकुमार रेड्डी, वैद्यक औषधनिर्माणशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. व्ही.आर. पाटील, अभियांत्रिकी तांत्रिकी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. जयंतराव पाटील, वाणिज्य व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.आर. चौधरी, शिक्षणशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.टी. भूकन यांचा समावेश होता.
            प्रा. स्वामीनाथन यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन प्रा. ज्योत्स्ना मेश्राम यांनी केले.  यावेळी गुणवत्ता यादीतील 74 विद्यार्थ्यांना अतिथींच्या हस्ते सुवर्णपदके देण्यात आली. सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन प्रभारी परीक्षा नियंत्रक डॉ. अमूलराव बोरसे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रिती अग्रवाल आणि डॉ. आशुतोष पाटील यांनी केले.
            यावेळी मंचावर  कुलसचिव प्रा.ए.एम.महाजन, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. व्ही.आर. पाटील, प्रा.डॉ.रमेशचंद्र शिंपी, डॉ. अजय साळी, प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्रा.डी.जी. हुंडीवाले, प्राचार्य डॉ. इकबाल शहा, प्राचार्य डॉ. डी.आर. पाटील, डॉ. सुनील गरूड, डॉ. गौरी राणे, श्री. विष्णू भंगाळे, डॉ. शिवाजी देवरे, प्राचार्य डॉ. पी.एच. पवार, डॉ. अरविंद चौधरी, डी.आर. नंदनवार, शोभाताई मोरे, श्री. दिलीप शिंदे उपस्थित होते.    या समारंभात 17,525  स्नातकांना पदव्या देण्यात आल्या. यामध्ये, कला ललितकला विद्याशाखेचे  2746 स्नातक, मानसनीति समाजविज्ञान विद्याशाखेचे 2533 स्नातक,  विज्ञान विद्याशाखेचे  3919  स्नातक, विधी विद्याशाखेचे 281,  वैद्यक औषधनिर्माणशास्त्र विद्याशाखेचे 386  स्नातक, अभियांत्रिकी विद्याशाखेचे 3228  स्नातक, आयुर्वेद विद्याशाखेचे 02  स्नातक,  वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखेचे 3181 स्नातक आणि  शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या 1249 स्नातकांचा समावेश आहे. यावेळी गुणवत्ता यादीतील 74  विद्यार्थ्यांना सुवर्णपदक 53 विद्यार्थ्यांना पीएच.डी. देण्यात आली.

No comments:

Post a Comment