चाळीसगांव दिनांक 25 :- दुष्काळावर
मात करण्यासाठी लोकसहभागातुन मोठया प्रमाणात गाळ काढण्याचे काम सुरु असून या मोहिमेला
जिल्हयातील शेतक-यांनी व्यापक स्वरुप देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजुरकर
यांनी चाळीसगांव तालुक्यातील मन्याड धरणाची उप विभागीय अधिकारी गणेश मिसाळ यांच्या
समवेत पहाणी करतांना केले. मागील ब-याच कालावधीपासुन धरणात साठलेला गाळ हा शेतीसाठी
उपयुक्त असुन यामुळे जमीनीचा पोत सुधारुन मातीची रचना देखील चांगली होणार आहे. त्यामुळे
मातीच्या पाणी धरुन ठेवण्याच्या क्षमतेत वाढ होईल, तसेच उत्पादकता वाढुन दुष्काळामुळे
कमी झालेले उत्पादन येत्या हंगामात काही अंशी भरुन निघण्यास नक्कीच मदत होईल तसेच गाळ
उपश्यामुळे धरणातील पाणी साठवण क्षमता वाढणार आहे, असा दुहेरी फायदा विचारात घेऊन या
स्तुत्य उपक्रमास शेतक-यांनी साथ द्यावी
असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.
पाचोरा महसुल उप विभागातुन आज रोजी सुमारे
10 लाख ब्रास इतका गाळ उपसा झालेला आहे. तालुक्यातील मन्याड धरणातुन आजतागायत सर्वाधीक
2 लाख ब्रास गाळ उपसा झाला असुन त्यामुळे 21 कोटी लिटर इतकी पाणी क्षमता वाढली आहे
या उपक्रमासाठी लोकसहभागातुन आजतागायत रु.8 कोटीचे काम झाले आहे. तर पाचोरा तालुक्यातील
हिवरा प्रकल्पातुन 1.5 लाख ब्रास गाळ उपसा झाला आहे. तसेच लोहारा लघुप्रकल्पातुन 53
हजार ब्रास गाळ उपसा झालेला आहे. त्याचप्रमाणे वलठाण धरणातुन 25 हजार ब्रास, खडकीसीम
धरणातुन 10 हजार ब्रास, राजुरी धरणातुन 70 हजार ब्रास गाळ उपसा झाला आहे. पाचोरा महसुल
विभागातुन बहुळा मध्यम प्रकल्प, अगनावती मध्यम प्रकल्प, गाळण लघु प्रकल्प, बदरखे, गारखेडा,
सार्वेखाजोळे, बांबरुड राणीचे, वाकडी, गहुले, पिंपळगांव हरेश्वर, पिंप्री डांभुर्णी,
हातगांव, पिंप्री उंबरहोळ, वाघळा, ब्राम्हणशेवगा, कुंझर, बोरखेडा, देवळी-भोरस आदि गावातील
मध्यम तसेच लघु प्रकल्पातुनही गाळ उपसाच्या कामांना गती देण्यासाठी तसेच संबंधित शेतक-यांना
प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी राजुरकर यांनी शासकीय सुटीच्या दिवशीही तालुक्याचा
दौरा करुन शेतक-यांना प्रोत्साहित केले व लोकांना कुठलीही अडचण येणार नाही या बद्दल
आश्वासीत केले. त्याच बरोबर संपुर्ण जिल्हयामध्ये गाळ काढण्याच्या मोहिमेला व्यापक
स्वरुप देण्याचे आवाहन करुन स्थानिक शेतक-यांनी देखील उपलब्ध असलेल्या धरणातुन गाळ
काढुन नेण्याचे आवाहन केले. येत्या पावसाळयापर्यंत गाळ काढण्याची मोहिम सुरु राहणार
असुन याचा अधिकाधिक शेतक-यांनी लाभ घ्यावा व दुष्काळावर मात करुन आपला जिल्हा भविष्यात
सुजलाम सुफलाम होण्यासाठी सर्वोतोपरी सहभाग नोंदवावा असेही सांगितले.
यावेळी
सभापती विजय जाधव, पिंपळवाडचे सरपंच शिरीष जगताप, तहसिलदार दिपक गिरासे, उप अभियंता
एस.पी.ठाकरे, आर.एन.पवार, तमगव्हाणचे माजी सरपंच किशोर पाटील, गावातील पोलीस पाटील
लोधेंसह गावकरी मोठया संखेने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment