Thursday, 4 April 2013

राष्ट्रीय खादी व ग्रामोद्योग पुरस्काराचे राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण महाराष्ट्रातील प्रत्येकी 3 व्यक्ती, संस्था आणि बँकाचा समावेश




            नवी दिल्ली, दि. 4 : सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम मंत्रालयातर्फे खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना वर्ष 2011-12 साठी प्रदान करण्यात आलेल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील 3 व्यक्ती, 3 संस्था आणि 3 बँकाचा समावेश आहे.  
येथील विज्ञान भवनात काल, बुधवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
के. एच. मुनिअप्पा, सचिव माधव लाल, खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्‍यक्ष देवेन्‍द्रकुमार आर देसाई,  कोयर बोर्डाचे अध्‍यक्ष प्रो. जी. बालचन्‍द्रन, एनएसआयसी चे अध्‍यक्ष एच.पी. कुमार आणि मंत्रालयाचे इतर वरिष्‍ठ अधिकारी उपस्‍थि‍त होते.
विभागीय राष्ट्रीय खादी कारागीर (कापड कातणारा) पुरस्कार वर्धा येथील ग्रामसेवा मंडळ गोपुरीच्या लक्ष्मी रामकृष्ण लोखंडे यांना प्रदान करण्यात आला. खादी कारागीरासाठी (विणकर) देण्यात येणारा पश्चिम विभागासाठीचा पुरस्कार चंद्रपूर येथील नाग विदर्भ चरखा संघाचे कारागीर मुमताज वल्दूदन निजामुद्दीन यांना प्रदान करण्यात आला.पश्चिम विभागीय ग्रामोद्योग कारागिराचा राष्ट्रीय पुरस्कार अमरावती जिल्हयातील धारणी येथील प्रगती बहुउद्देशीय संस्थेचे कारागीर राजेश झापर्‍या जाम्बेकर यांना प्रदान करण्यात आला.
प्रधानमंत्री रोजगार कार्यक्रमांतर्गत गृह उद्योगासाठी देण्यात येणारा राष्ट्रीय पुरस्कार रत्नागीरी जिल्हयातील रसिका महिला गृह उद्योगाच्या उद्योजक रसिका परेश तांबट यांना प्रदान करण्यात आला. स्फूर्ती क्लस्टर पुरस्कार नांदेडच्या मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीला प्रदान करण्यात आला. तर राष्ट्रीय खादी आणि ग्रामोद्योग भवनचा पुरस्कार मुंबईच्या विले पारले (प.) येथील खादी ग्रामोद्योग भवनाला प्रदान करण्यात आला.
सुक्ष्म आणि लघु उद्योगाला कर्ज उपलब्ध करुन देणा-या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेला देण्यात येणारा राष्ट्रीय पुरस्कार मुंबईच्या स्टेट बँक ऑफ इंडिया (स्टेट बँक भवन,मॅडम कामा रोड), सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना विभागीय स्तरावर देण्यात येणारा राष्ट्रीय पुरस्कार मुंबई येथील बँक ऑफ बडौदा (वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स) आणि बँक ऑफ इडिया (वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स) यांना प्रदान करण्यात आला.

No comments:

Post a Comment