Friday, 19 April 2013

टंचाई निवारणाच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई - पालकमंत्री

जळगाव : टंचाईची भीषणता कमी करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. सर्व विभागांनी टंचाई निवारणाच्या कामांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. या कामांमध्ये कोणी हलगर्जीपणा करत असेल  तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी सूचित केले.

पद्मालय शासकीय विश्रामगृह येथे आज सकाळी आयोजित पाणी व चारा टंचाई आढावा बैठकीत श्री. देवकर अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, तापी  सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. डी. पाटील, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकूर, प्रांताधिकारी रविंद्र राजपूत, राहुल मुंडके, गणेश मिसाळ, तुकाराम हुलवडळे, पशुसंवर्धन उपायुक्त प्रकाश फालक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी किसन मुळे, महापालिका पाणी  पुरवठा विभागाचे अभियंता श्री. जाधव आदींसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

श्री. देवकर म्हणाले, वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा थकबाकी राहिल्याने खंडित करु नये. सदरचे वीज बिल भरण्यासाठी गावांना मुदत द्यावी. त्यानंतरही संबंधित गाव वीज बिल भरत नसेल तर जिल्हा प्रशासनाशी चर्चा करावी. परंतु, कोणत्याही परिस्थितीत वीज पुरवठा खंडित करु नये. वीज वितरण कंपनीच्या कारभाराबद्दल जनतेच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. त्यामुळे सदर विभागाने टंचाईच्या परिस्थितीची जाणीव ठेवून काम करावे, अशी सूचनाही श्री. देवकर यांनी केली. टंचाईच्या कामांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याने या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यावर त्वरित कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात महात्मा फुले जल व भूमी अभियानांतून तलावातील गाळ काढण्याची कामे अत्यंत मंद गतीने सुरु आहेत. ती मोठ्या प्रमाणावर हाती घेणे आवश्यक असल्याचे श्री. देवकर यांनी सांगितले. जून अखेरपर्यंत जिल्ह्यातील तलावामधील जास्तीत जास्त गाळ काढून शेतकऱ्यांच्या शेतावर टाकण्याच्या कामात प्रशासनाने अधिक गतिमानता आणणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील चारा उपलब्धतेची माहिती घेऊन आवश्यक त्या ठिकाणी चारा छावणी सुरु कराव्यात. तसेच  सर्व तालुकानिहाय चारा परिस्थितीची माहिती घ्यावी, अशी श्री. देवकर यांनी सूचना केली. तसेच  टंचाईची भीषणता पाहता ज्या ट्रान्सफॉर्मरवरुन पाणी पुरवठा योजनांना वीज पुरवठा केला जात असेल आणि ते जर नादुरुस्त असतील तर ते 24 तासांच्या आत वीज कंपनीने दुरुस्त करुन देणे गरजेचे असल्याचे त्यांनी  सांगितले.

रोहयो अंतर्गत शेत रस्ते, शिव रस्ते, नाला खोलीकरण आदी कामांसाठी गावे स्वत:हून पुढे येत असतील तर त्यांना त्वरित कामे द्या. तसेच सर्व प्रांताधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर बैठका घेऊन सदरची कामे मार्गी लावण्याची सूचना देवकर यांनी केली. यावेळी जिल्ह्यातील रोहयो कामांचा आढावाही घेण्यात आला.

प्रारंभी जिल्हाधिकारी राजूरकर यांनी प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यात जिल्ह्यात 104 टँकर, 257 विहीर अधिग्रहण, 640 बोअरवेल्सना मंजुरी, 549 बोअरवेल पूर्ण करुन 198 पंप कार्यान्वित झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तात्पुरती पाणी पुरवठा योजनांच्या प्रस्तावांना त्वरित मंजुरी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले

No comments:

Post a Comment