Monday, 22 April 2013

सहकारी पीक संरक्षक संस्थांनी मानसिकता बदलणे आवश्यक -- पालकमंत्री गुलाबराव देवकर




         जळगाव, दिनांक 22:-  जळगांव जिल्हा सहकारी पीक संरक्षक सोसायटयांचे फेडरेशन अंतर्गत जिल्हयात सुमारे पाऊणे तीनशे प्राथमिक पीक संरक्षक संस्था कार्यरत आहेत.  आजच्या स्पर्धेच्या युगात संस्था जीवंत राहाव्यात म्हणून त्यांनी मानसिकता बदलणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी केले.
  
      जळगांव जिल्हा सहकारी पीक संरक्षक सोसायटयांचे फेडरेशनचा सुवर्ण महोत्सव समारंभाचे उदघाटन प्रसंगी ना. देवकर बोलत होते.  यावेळी राज्य मार्केटींग फेडरेशनचे अध्यक्ष रविंद्र पाटील, मनसे जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे, जिल्हा सहकारी बॅकेचे संचालक वाल्मिक पाटील, फेडरेशनचे चेअरमन वसंतराव पंडीतराव कोल्हे, जिल्हा सहकारी बोर्डाचे चेअरमन बापूराव हिंमतराव देशमुख, दिपीप बंडगर, उपसभापती विजय नारखेडे आदि मान्यवरांसह सोसायटयांचे पदाधिकारी उपस्थित होते.

     श्री. देवकर म्हणाले, स्पर्धेच्या युगात पिक संरक्षक सोसायटयांचनी फेडरेशनच्या माध्यमातून कृषि विषयक इतर कार्ये सुरु करुन आर्थिक उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे.  या सोसायटयामार्फत खते व बियाणे, कृषि औषधी आदि कार्ये करावीत. पीक कर्ज वाटपात सहकारी पीक सरंक्षक संस्थांचे ना हरकत प्रमाणपत्रा घेणे याबाबत राज्य शासन धोरणात्मक निर्णय होईल. परंतु कोंडवाडे, पीक पहाणी व नुकसानीचे पंचनामे या कामात सोसायटयांनी कशा प्रकारे सहभागी करुन घेता येईल याकरिता प्रयत्न केला जाईल असे ना. देवकर यांनी सांगितले.

     प्रारंभी ना. देवकर  यांचे हस्ते दीपप्रज्वलन करुन जिल्हा सहकारी पीक संरक्षक सोसायटयांचे फेडरेशनच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. फेडरेशनचे संचालक नानासाहेब शामराव पाटील यांनी प्रास्तावीकात फेडरेशन समोरील आडचणी व समस्या मांडून फेडरेशनच्या 50 वर्षाच्या कार्याचा लेखाजोखा मांडला.

     जिल्हयातील सहकारी पीक संरक्षक सोसायटयांना संरक्षण मिळणे आवश्यक असून संस्थांनी ही वसुली करुन संस्था टिकवून ठेवल्या पाहिजेत, असे मार्केटींग  फेडरेशनचे अध्यक्ष रविंद्र पाटील यांनी सांगितले.  यावेळी जिल्हा सहकारी बोर्डाचे चेअरमन बापूराव हिंमतराव देशमुख यांचे ही मार्गदर्शनपर भाषण झाले.

     यावेळी ना. देवकर व मान्यवरांच्या हस्ते जळगांव जिल्हा सहकारी पीक संरक्षक सोसायटयांचे फेडरेशनच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त स्मरणिकेचे प्रकाशन संपन्न झाले. 

    कार्यक्रमाचे प्रास्तावीक व आभार नानासाहेब पाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment