जळगाव, दिनांक 20:- राज्यात उदभवलेल्या पाणी
टंचाईला सामोरे जाण्यासाठी मागेल
त्या गावाला टॅकरव्दारे पाणी दिले जाईल, कोणीही पाण्यावाचून वंचित राहणार नाही,
अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जळगांव जिल्हा
टंचाई परिस्थितीच्या आढावा बैठकीत बोलतांना दिली.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्यात दोन
तीन वर्षापासून कमी पाऊस पडला आहे. त्यास कदाचित हवामानातील बदल कारणीभूत असून
त्यामुळे राज्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती उदभवली आहे. राज्यातील
दुष्काळ कायमस्वरुपी दूर करण्यासाठी दिर्घकालिन उपाय योजण्यासाठी काळजीपूर्वक व
काटेकोरपणे नियोजन करण्यात येत आहे. तसेच
पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्थाही करण्यात येत आहे. ज्या गावांना टॅकरने
पाणीपुरवठा करण्यात येतो त्या गावांना सिमेंट बंधारे बांधणे, शेततळी करणे आणि बंधाऱ्यातील
गाळ उपसा करणे या कामांना प्राधान्य देण्यात येऊन तलावांमधील गाळ शेतीसाठी तसेच
विटभटटयांसाठीही वापरण्यात यावा असे सांगून त्यांनी पाणी टंचाई दूर करण्यासाठी
खाजगी संस्थांनी पुढे यावे असे आवाहनही
यावेळी केले.
प्रारंभी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर
यांनी जिल्हयातील टंचाई परिस्थिती निवारण्यासाठी करण्यात येत असलेल्या विविध उपाय
योजनांचा आढावा सादर केला. पालकमंत्री
गुलाबराव देवकर यांनी जिल्हयातील टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाय
योजनांसाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीची मागणी करुन खांन्देशासाठी विदर्भाच्या धर्तीवर
खान्देश विकास कार्यक्रम आखावा अशी सूचना केली. तसेच कापूस, केळी यांच्या नुकसान भरपाईसाठी अनुदानाची
रक्कम त्वरीत मिळावी अशीही विनंती केली.
या आढावा बैठकीस वस्त्रोद्योग मंत्री नसीम
खान, आ. शिरीष चौधरी, आ. मनिष जैन,जळगांव महानगरपालिकेचे महापौर किशोर पाटील, स्थायी
समिती अध्यक्ष रमेश जैन, जळगांव जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शितल उगले
, जिल्हा पोलिस अधिक्षक एस जयकुमार तसेच जिल्हयातील विविध पदाधिकारी, अधिकारी उपस्थित
होते.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment