Friday, 26 April 2013

कामगार न्यायालयात 1 मे रोजी विधी साक्षरता कार्यक्रम



            जळगांव, दि. 26 :-  कामगार न्यायालय जळगांव येथे जागतिक कामगार दिनानिमित्त समाजातील कामगार वर्गास त्या दिवसाचे महत्व व कामगारांच्या हक्काबद्दल जनजागृती व्हावी म्हणून दि. 1 मे रोजी सकाळी 10.30 वा. विधी साक्षरतेचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमास येथील लेबर लॉ प्रॅक्टीशनर्स असोसिएशन यांचे सहकार्य आहे. तरी जिल्हयातील कामगार वर्ग युनियन  प्रतिनीधी व वकील बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कामगार न्यायालयाचे न्यायालयीन अधिक्षक अशोक पानपाटील यांनी केले आहे.

वन्यप्राणी व पक्ष्यांसाठी कृत्रिम पाणवठे तयार करण्याचे आवाहन- जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर



        जळगांव, दि. 26 :- जिल्हयात पाणी टंचाईची भीषणता दिवसेंदिवस वाढत आहे. टंचाईच्या झळा नागरिकांबरोबरच वन्यप्राण्यांना ही बसत असल्याने वनविभागाने वनक्षेत्रात कृत्रिम पाणवठे बनविण्याचे काम हाती  घेतलेले आहे. परंतु वन्यप्राणी व पक्षी यांचा अधिवास महसूल क्षेत्रात ही असल्यामुळे पाणी उपलब्ध असलेल्या शेतक-यांनी शेतावर वन्य प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे तयार करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी केले आहे.
              जिल्हयात वनक्षेत्रात वनविभागामार्फत वन्य प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे सुरु केले जात आहेत. परंतु ज्या शेतक-यांकडे विहिर, बोअरवेल आदिचे पाणी उपलब्ध आहे अशांनी शेतावर जलकुंड तयार करुन प्राण्यांना पाणी पिण्यासाठी उपलब्ध करावे. तसेच ग्रामीण स्तरावर ग्रामपंचायत, वन संरक्षण समित्या , सामाजिक कार्यकर्ते, पक्षीमित्र, लोकप्रतिनिधी आदिनी या कार्यात पुढाकार घेऊन स्थानिक स्तरावर पाण्याचे कुंड व पानवठे तयार करण्यासाठी सक्रीय सहभाग देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजूरकर यांनी कले आहे. नागरि क्षेत्रातील नागरिकांनी  ही  पक्ष्यांसाठी भांडयात पाणी ठेवून पक्षाप्रती सदभाव दाखवावा.

Thursday, 25 April 2013

महाराष्ट्र दिनाचा मुख्य समारंभ पोलिस कवायत मैदानावर



           जळगांव, दि. 25 :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 53 व्या वर्धापन दिनानिमित्त दि 1 मे 2013 रोजी सकाळी 8 वाजता पोलिस कवायत मैदानावर ध्वजारोहणाचा मुख्य समारंभ पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे हस्ते होणार आहे. तरी सदर समारंभास मान्यवर, नागरिक विदयार्थी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी केले आहे.
        जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित वर्धापन दिन साजरा करणेबाबतच्या बैठकीत जिल्हाधिकारी राजूरकर बोलत होते यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. एस.एन. लाळीकर, अप्पर पोलिस अधिक्षक  एन. अंबिका, तहसिलदार कैलास देवरे , उपअभियंता श्री. फेगडे, श्रीमती बढे, क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील आदि उपस्थित होते.  
      राज्य स्थापनेचा 53 वा वर्धापन दिनाचा समारंभ साजरा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस विभाग, महापालिका आरोग्य विभाग, जळगांव तहसिल कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक , क्रीडा कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय आदि विभागांकडे देण्यात आलेली जबाबदारी योग्य व काटेकोरपणे पूर्ण करण्याची सूचना जिल्हाधिकारी राजूरकर यांनी केली
      तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वज वंदन कार्यक्रम सकाळी 7.10 वा. आयोजित करण्यात आलेला आहे.                                                  

ग्राहकमंच सदस्य व अध्यक्ष तोंडी परिक्षेचा निकाल जाहिर



          जळगांव, दि. 25 :- राज्य ग्राहक वाद निवारण आयोग, महाराष्ट्र राज्य, मुबंई यांच्याकडून म. सदस्य , राज्य आयोग, महाराष्ट्र आणि म. अध्यक्ष, जिल्हा मंच या पदांसाठी दिनांक 20 एप्रिल 2013 रोजी घेण्यात आलेल्या तोंडी परीक्षेचा निकाल परिशिष्ट अ व परिशिष्ट ब जिल्ह ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, जळगांव कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रदर्शित करण्यात आलेला आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी असे प्रबंधक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच जळगांव यांनी कळविले आहे.

शासकीय बहुउद्देशिय अपंग संमिश्र केंद्रात प्रवेशासाठी 15 जून पर्यतअर्ज करावेत



     जळगांव, दि. 25 :- शासकीय बहुउद्देशीय अपंग संमिश्र केंद्र या संस्थेत सन 2013 – 14 या वर्षाकरिता वय वर्षे 6 ते 15 या वयोगटातील अंध, मुकबधिर अस्थिव्यंग मुलांना प्रवेशासाठीचे विहीत नमुन्यातील अर्ज दि. 31 मे 2013 पर्यत या कार्यालयाकडून पुरवठा करण्यात येतील सदरील अर्ज संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करुन दि. 15 जून 2013 पर्यत स्विकारले जातील उशीरा प्राप्त झालेल्या अर्जाचा प्रवेशासाठी विचार केला जाणार नाही . विहीत मुदतीच्या आत प्राप्त झालेल्या योग्य त्या उमेदवारास जून महिन्यात मुलाखतीस बोलविण्यात येईल मुलाखत संपल्यानंतर दुस-या दिवशी निकाल घोषीत करण्यात येईल असे अधिक्षक शासकीय बहुउद्देशीय अपंग संमिश्र केंद्र या संस्थाकडून कळविण्यात येत आहे.
         या संस्थेत शासनामार्फ मोफत भोजन, निवास, गणवेश, अंथरुण – पांघरुण, क्रमिक पुस्तके, शालेय साहित्य, औषधोपचार, शालेय व कला शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे. अर्ज पाठवितांना अर्जासोबत खालील प्रमाणपत्राच्या झेरॉक्स पाठवाव्यात आणि मुलाखतीचे वेळी मूळ प्रमाणपत्र घेवून उपस्थित रहावे.
अपंगत्वाचे वैदयकिय प्रमाणपत्र, जन्मतारखेचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, मुलांचे 4 फोटो, (शक्यतो अपंगत्व दिसेल असे)
        वरील तिन्ही अपंगत्वाचे प्रवर्गानुसार त्या विभागातील तज्ञांचा वैदयकिय दाखला व मुकबधिरासाठी श्रवणालेख आवश्यक आहे.
        अस्थिव्यंग मुलांना शारिरीक पुन:र्वसन हा मुख्य उद्देश साध्य करण्यासाठी प्रवेश दिला जाईल. त्या कालावधीत त्यांना शालेय शिक्षण दिले जाईल, शारिरीक पुन:र्वसन झाल्यानंतर त्याचे पुढील वर्षी संस्थेतून नाव कमी करण्यात येईल.
         संस्थेत प्रवेश दिल्यानंतर संस्थेचे सर्व नियमांचे उमेदवार व पालकांनी कटाक्षाने पालन करणे आवश्यक आहे. वरील सर्व बाबींची पूर्तता केलेले अर्जच फक्त विचारात घेतले जाईल. अपूर्ण भरलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. परिपूर्ण प्रवेश अर्ज अधिक्षक , शासकीय अपंग संमिश्र केंद्र, जळगांव कडे पाठवावेत तसेच अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांकावर 9421712828, 9673970531 वर संपर्क साधावा.   

सामाजिक आर्थिक व जात सर्वेक्षणाचे काम आठ दिवसात पूर्ण करावे - जिल्हाधिकारी

          जळगांव, दि. 25 :- सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण 2011 अंतर्गत जिल्हयात जामनेर, भडगांव व मुक्ताईनगर, भुसावळ, पारोळा व भडगांव तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागामधील सवैक्षणाचे काम अत्यंत मंद गतीने सुरु आहे. तरी सदर सर्वेक्षसणाचे काम संबंधीत शासकीय अधिकारी व बेल कंपनीच्या अधिका-यांनी परस्परांत समन्वय ठेवनू आठ दिवसात काम पूर्ण करण्याची सूचना जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी केली.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज दुपारी आयोजित सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण 2011 आढावा बैठकीत जिल्हाधिकारी राजूरकर उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. यावेळी सहाय्यक प्रकलप संचालक अनिल भोकरे, जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे, मुख्याधिकारी सर्वश्री बी. टी. बावीस्कर, किरण देशमुख, प्रभाकर सोनवणे, सोमथ्नाथ शेटे, गट विकास अधिकारी सी. जी. सुनील दुसाने, राजेश पाटील, श्री. मोरे आदिसह बेल कंपनीचे इंजिनिअर श्री. सोनार, श्री. शशांक व श्री. प्रजापती आदि उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी राजूरकर म्हणाले यात सर्वेक्षणाचे काम मंदगतीने होत असलेल्या तालुक्यातील संबंधित अधिकारी / कर्मचारी यांनी बेल कंपनीच्या इंजिनिअर्सशी कामाबाबत पाठ पुरावा करणे आवश्यक आहे. सदरचे काम हे अत्यंत महत्वपूर्ण असून ते आठ दिवसात पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली.
            प्रारंभी  सहाय्यक प्रकल्प संचालक अनिल भोकरे यांनी तालुकानिहाय जात सर्वेक्षणाच्या कामाची माहिती बैठकीत दिली. यात भुसावळ, अंमळनेर, चोपडा व बोदवड पंचायत समित्यांचे जात सर्वेक्षणाचे काम 100 टक्के पूर्ण झालेले आहे. तर चाळीसगांव 98 टक्के, एरंडोल 90 टक्के, रावेर 83 टक्के, पारोळा 81 टक्के, पाचोरा 73 टक्के तर धरणगांव 71 टक्के काम पूर्ण झालेले परंतू जळगांव ( 43 टक्के), मुक्ताईनगर (53 टक्के), भडगांव ( 57 टक्के), जामनेर (58 टक्के) व यावल (62 टक्के)  या पाच पंचायत समित्यांचे जात सर्वेक्षणाचे काम मंदगतीने सुरु असल्याबद्दल जिल्हाधिकारी राजूरकर यांनी नाराजी व्यक्त केली.
नगरपालिका क्षेत्रात फैजपूर, सावदा, चाळीसगांव, चोपडा, अंमळनेर, धरणगांव व रावेर या नगरपालिकांमध्ये सर्वेक्षणाचे काम 100 टक्के  झालेले आहे. तर जामनेर (93 टक्के), यावल ( 86 टक्के), पाचोरा (89 टक्के) काम झाले असल्याची माहिती श्री. भोकरे यांनी दिली.                                        

Wednesday, 24 April 2013

दुष्काळावर मात करण्यासाठी गाळ काढण्याच्या मोहिमेला व्यापक स्वरुप द्या - जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजुरकर


        चाळीसगांव दिनांक 25 :- दुष्काळावर मात करण्यासाठी लोकसहभागातुन मोठया प्रमाणात गाळ काढण्याचे काम सुरु असून या मोहिमेला जिल्हयातील शेतक-यांनी व्यापक स्वरुप देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजुरकर यांनी चाळीसगांव तालुक्यातील मन्याड धरणाची उप विभागीय अधिकारी गणेश मिसाळ यांच्या समवेत पहाणी करतांना केले. मागील ब-याच कालावधीपासुन धरणात साठलेला गाळ हा शेतीसाठी उपयुक्त असुन यामुळे जमीनीचा पोत सुधारुन मातीची रचना देखील चांगली होणार आहे. त्यामुळे मातीच्या पाणी धरुन ठेवण्याच्या क्षमतेत वाढ होईल, तसेच उत्पादकता वाढुन दुष्काळामुळे कमी झालेले उत्पादन येत्या हंगामात काही अंशी भरुन निघण्यास नक्कीच मदत होईल तसेच गाळ उपश्यामुळे धरणातील पाणी साठवण क्षमता वाढणार आहे, असा दुहेरी फायदा विचारात घेऊन या स्तुत्य उपक्रमास    शेतक-यांनी साथ द्यावी असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.
            पाचोरा महसुल उप विभागातुन आज रोजी सुमारे 10 लाख ब्रास इतका गाळ उपसा झालेला आहे. तालुक्यातील मन्याड धरणातुन आजतागायत सर्वाधीक 2 लाख ब्रास गाळ उपसा झाला असुन त्यामुळे 21 कोटी लिटर इतकी पाणी क्षमता वाढली आहे या उपक्रमासाठी लोकसहभागातुन आजतागायत रु.8 कोटीचे काम झाले आहे. तर पाचोरा तालुक्यातील हिवरा प्रकल्पातुन 1.5 लाख ब्रास गाळ उपसा झाला आहे. तसेच लोहारा लघुप्रकल्पातुन 53 हजार ब्रास गाळ उपसा झालेला आहे. त्याचप्रमाणे वलठाण धरणातुन 25 हजार ब्रास, खडकीसीम धरणातुन 10 हजार ब्रास, राजुरी धरणातुन 70 हजार ब्रास गाळ उपसा झाला आहे. पाचोरा महसुल विभागातुन बहुळा मध्यम प्रकल्प, अगनावती मध्यम प्रकल्प, गाळण लघु प्रकल्प, बदरखे, गारखेडा, सार्वेखाजोळे, बांबरुड राणीचे, वाकडी, गहुले, पिंपळगांव हरेश्वर, पिंप्री डांभुर्णी, हातगांव, पिंप्री उंबरहोळ, वाघळा, ब्राम्हणशेवगा, कुंझर, बोरखेडा, देवळी-भोरस आदि गावातील मध्यम तसेच लघु प्रकल्पातुनही गाळ उपसाच्या कामांना गती देण्यासाठी तसेच संबंधित शेतक-यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी राजुरकर यांनी शासकीय सुटीच्या दिवशीही तालुक्याचा दौरा करुन शेतक-यांना प्रोत्साहित केले व लोकांना कुठलीही अडचण येणार नाही या बद्दल आश्वासीत केले. त्याच बरोबर संपुर्ण जिल्हयामध्ये गाळ काढण्याच्या मोहिमेला व्यापक स्वरुप देण्याचे आवाहन करुन स्थानिक शेतक-यांनी देखील उपलब्ध असलेल्या धरणातुन गाळ काढुन नेण्याचे आवाहन केले. येत्या पावसाळयापर्यंत गाळ काढण्याची मोहिम सुरु राहणार असुन याचा अधिकाधिक शेतक-यांनी लाभ घ्यावा व दुष्काळावर मात करुन आपला जिल्हा भविष्यात सुजलाम सुफलाम होण्यासाठी सर्वोतोपरी सहभाग नोंदवावा असेही सांगितले.
            यावेळी सभापती विजय जाधव, पिंपळवाडचे सरपंच शिरीष जगताप, तहसिलदार दिपक गिरासे, उप अभियंता एस.पी.ठाकरे, आर.एन.पवार, तमगव्हाणचे माजी सरपंच किशोर पाटील, गावातील पोलीस पाटील लोधेंसह गावकरी मोठया संखेने उपस्थित होते.

Tuesday, 23 April 2013

वाहन नोंदणीसाठी एम एच – 19 बी-आर-मालिका सुरु होणार



              जळगांव, दि. 23 :- उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहन वाहनांसाठी नवीन नोंदणी एम एच – 19 / बी आर  0001 ते 9999 पर्यतची मालिका लवकरच सुरु करण्यांत येणार आहे.
          ज्या वाहन धारकांना परिवहन वाहनांकरीता आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल त्यांनी या कार्यालयात अर्ज दखल करावेत व विहीत शुल्काच्या रकमेचा भरणा मालिका सुरु झाल्यावर करुन आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक प्राप्त करुन घ्यावेत. तसेच अशा आकर्षक क्रमांकासाठी शुल्क भरल्यावर वाहन 30 (तीस) दिवसाचे आत नोंदणी करुन कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहील 30 दिवसांचे आत वाहन नोंदणी न केल्यास भरलेले शुल्क हस्तांतरित किंवा परतावा होणार नाही. त्या रकमेचा परत वापरही होउ शकणार नाही, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगांव श्री. पी.डी. निकम हे कळवितात.
           दि. 25 एप्रिल 2013 पासुन सकाळी 10.30 वाजेपासुन ते दि. 28 एप्रिल 2013 पर्यंत नवीन मालिकेसाठी आकर्षक नोंदणी क्रमांकाचे अर्ज स्वीकारण्यात येतील, दिनांक 29 एप्रिल 2013 रोजी अर्जाची छाननी करुन एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आले असल्यास दि 29 एप्रिल 2013 रोजी दुपारी 12.00 वा. लिलाव पुकारण्यात येईल. जो अर्जदार सैनिक कल्याणनिधीस जास्त रक्कम देईल त्यास सदर क्रमांक बहाल करण्यात येईल. सदर पावतीची रक्कम त्वरीत भरावी लागेल . मोटार वाहन मालकास मालिकेतील आकर्षक क्रमांक कार / जीप मिळण्यासाठी मागणी आल्यास त्यासाठी तो क्रमांक प्राधान्याने देण्यात येईल.
        ज्या अर्जदारास आकर्षक क्रमांक देण्यात येईल त्याने तीन दिवसात शासकीय शुल्क भरणे आवश्यक आहे अन्यथा सदर अर्ज रद्द करण्यात येईल. सर्व अर्जदारांनी दिनांक 29 एप्रिल 2013 रोजी दुपारी 12.00 वाजता या कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.                          

Monday, 22 April 2013

म्हसावद रेल्वे उडडाणपुलाचे काम वेळेत पूर्ण करावे - पालकमंत्री गुलाबराव देवकर

      जळगांव, दिनांक 22:- म्हसावद व परिसरातील ग्रामस्थांची बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेली रेल्वे उडडाणपुलाची मागणी आज पूर्ण होत असून या रेल्वे उडडाणपुलाचे काम चांगले व दर्जेदार झाले  पाहीजे. तसेच संबंधीत मक्तेदारांने हे काम आठरा महिन्याच्या कालावधीत पूर्ण करण्याची सूचना पालकमंत्री ना.गुलाबराव देवकर यांनी केली.

     म्हसावद येथे ना. देवकर यांचे हस्ते रेल्वे उडडाणपुलाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  त्याप्रसंगी ते बोलत होते.  या पुलासाठी शासनाने 10 कोटी रुपयांचा निधी दिला असून सदरचे काम अठरा महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे.  सदरचा पूल एरंडोल-नेरी- रस्त्यावर असून यामुळे या परिसरातील लोकांना फायदा होणार आहे.

     यावेळी जिल्हा सहकारी बॅकेचे संचालक वाल्मिक पाटील, गोपाळ पाटील, दिलीप धनगर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे आदिसह म्हसावदचे सरपंच, सदस्य व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.


सहकारी पीक संरक्षक संस्थांनी मानसिकता बदलणे आवश्यक -- पालकमंत्री गुलाबराव देवकर




         जळगाव, दिनांक 22:-  जळगांव जिल्हा सहकारी पीक संरक्षक सोसायटयांचे फेडरेशन अंतर्गत जिल्हयात सुमारे पाऊणे तीनशे प्राथमिक पीक संरक्षक संस्था कार्यरत आहेत.  आजच्या स्पर्धेच्या युगात संस्था जीवंत राहाव्यात म्हणून त्यांनी मानसिकता बदलणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी केले.
  
      जळगांव जिल्हा सहकारी पीक संरक्षक सोसायटयांचे फेडरेशनचा सुवर्ण महोत्सव समारंभाचे उदघाटन प्रसंगी ना. देवकर बोलत होते.  यावेळी राज्य मार्केटींग फेडरेशनचे अध्यक्ष रविंद्र पाटील, मनसे जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे, जिल्हा सहकारी बॅकेचे संचालक वाल्मिक पाटील, फेडरेशनचे चेअरमन वसंतराव पंडीतराव कोल्हे, जिल्हा सहकारी बोर्डाचे चेअरमन बापूराव हिंमतराव देशमुख, दिपीप बंडगर, उपसभापती विजय नारखेडे आदि मान्यवरांसह सोसायटयांचे पदाधिकारी उपस्थित होते.

     श्री. देवकर म्हणाले, स्पर्धेच्या युगात पिक संरक्षक सोसायटयांचनी फेडरेशनच्या माध्यमातून कृषि विषयक इतर कार्ये सुरु करुन आर्थिक उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे.  या सोसायटयामार्फत खते व बियाणे, कृषि औषधी आदि कार्ये करावीत. पीक कर्ज वाटपात सहकारी पीक सरंक्षक संस्थांचे ना हरकत प्रमाणपत्रा घेणे याबाबत राज्य शासन धोरणात्मक निर्णय होईल. परंतु कोंडवाडे, पीक पहाणी व नुकसानीचे पंचनामे या कामात सोसायटयांनी कशा प्रकारे सहभागी करुन घेता येईल याकरिता प्रयत्न केला जाईल असे ना. देवकर यांनी सांगितले.

     प्रारंभी ना. देवकर  यांचे हस्ते दीपप्रज्वलन करुन जिल्हा सहकारी पीक संरक्षक सोसायटयांचे फेडरेशनच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. फेडरेशनचे संचालक नानासाहेब शामराव पाटील यांनी प्रास्तावीकात फेडरेशन समोरील आडचणी व समस्या मांडून फेडरेशनच्या 50 वर्षाच्या कार्याचा लेखाजोखा मांडला.

     जिल्हयातील सहकारी पीक संरक्षक सोसायटयांना संरक्षण मिळणे आवश्यक असून संस्थांनी ही वसुली करुन संस्था टिकवून ठेवल्या पाहिजेत, असे मार्केटींग  फेडरेशनचे अध्यक्ष रविंद्र पाटील यांनी सांगितले.  यावेळी जिल्हा सहकारी बोर्डाचे चेअरमन बापूराव हिंमतराव देशमुख यांचे ही मार्गदर्शनपर भाषण झाले.

     यावेळी ना. देवकर व मान्यवरांच्या हस्ते जळगांव जिल्हा सहकारी पीक संरक्षक सोसायटयांचे फेडरेशनच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त स्मरणिकेचे प्रकाशन संपन्न झाले. 

    कार्यक्रमाचे प्रास्तावीक व आभार नानासाहेब पाटील यांनी केले.

Saturday, 20 April 2013

राज्यात उत्पादित होणाऱ्या शंभर टक्के कापसावर प्रक्रिया केली जाईल-- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

 


            जळगांव,दिनांक 20 -  राज्यातील एकूण कापूस उत्पादनाच्या 75 टक्के कापूस बाहेरील राज्यात जात असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना न मिळता मध्यस्थ व्यापाऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे राज्य शासन वस्त्रोद्योग धोरणाच्या माध्यमातून राज्यात उत्पादित होणाऱ्या शंभर टक्के कापसावर येथेच प्रक्रिया  करणार असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा मोठया प्रमाणावर मिळेल,  असे  प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

        जळगांव येथे आमदार मनीषदादा जैन फाऊंडेशनमार्फत आयोजित महाराष्ट्र कापूस परिषदेच्या उदघाटन प्रसंगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.  याप्रसंगी कृषि व पणन मंत्री श्री.राधाकृष्ण विखे-पाटील, वस्त्रोद्योग मंत्री मोहमद आरिफ (नसीम) खान, माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार माणिकराव ठाकरे, आ.मनीष जैन, आ.शिरीष चौधरी, माजी खासदार उल्हास पाटील, महापौर किशोर पाटील, संजय गरुड, रमेश जैन, डॉ.सी.डी.माई आदि व्यासपीठावर उपस्थित होते.

        मुख्यमंत्री श्री.चव्हाण म्हणाले, राज्यात कापूस उत्पादनासाठी 95 टक्के बी.टी. बियाणाचा वापर होत असून कापसाचे नवीन वाण विकसीत करणाऱ्या बियाणे कंपन्यांचे संघटन करुन त्यांना शासनाकडून मदत दिली जाईल.  तसेच केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील 2 हजार 100 कृषि सर्कल मध्ये स्वयंचलित हवामान मापक यंत्र लावण्यात येणार आहेत.  त्यामुळे उपग्रहाच्या माध्यमातून उष्णतामान, हवा, आद्रता, पाऊस आदि निकषांची माहिती तात्काळ शेतकऱ्यांना दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

      राज्यातील सुमारे 82 टक्के  शेतकऱ्यांसाठी  कोरडवाहू शेती अभियान राबविले जाणार आहे. त्यात शेतकऱ्यांना कृषिमधील आधुनिक तंत्रज्ञान, हवामान, पाण्याचा शास्त्रीय वापर आदिबाबत माहिती दिली जाणार असल्याचे श्री.चव्हाण यांनी सांगितले.  तसेच कृषि विभागामार्फत टेलीफोनचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषि मधील शास्त्रोक्त ज्ञान, प्रगत तंत्रज्ञान, बाजारपेठांची माहिती आदि दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले तसेच ठिबक सिंचनाच्या ग्लोबल टेंडरमुळे ठिबकच्या किंमती 30 टक्के कमी झाल्याची माहिती त्यांनी दिली.

     राज्यात जळगांव जिल्हा कापूस उत्पादनात आघाडीवर असून येथे टेक्सटाईल पार्क निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याकरिता उद्योजकांनी पुढे येण्याचे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले. राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणांतून उद्योजकांना सोयी-सुविधा देण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी  जळगांव जिल्हयात कापूस संशोधन केंद्र सुरु करण्याची घोषणा केली. तसेच टेक्सटाईल पार्क निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले.                                                                    
      विदर्भातील आठ जिल्हयासाठी विदर्भ इंटेन्सिव पॅकेज अंतर्गत मा.पंतप्रधान यांचेकडून पुढील 5 वर्षासाठी साडेतीन हजार कोटीचा निधी मिळालेला आहे. त्याच अनुषंगाने खान्देश इंटेन्सिव पॅकेजची मागणी पंतप्रधान यांचेकडे करणार असल्याची माहिती  श्री.चव्हाण यांनी दिली.  राज्य शासन टंचाई परिस्थितीचा सामना करत असून जळगांव जिल्हयातील सात तालुक्यात टंचाई परिस्थिती आहे अशा ठिकाणी मागेल तेथे टॅंकर व गुरांसाठी चारा छावणी सुरु केली जाईल, असे त्यांनी सांगितले. टंचाईच्या कामाबाबत लोकांच्या काही तक्रारी असतील तर त्या त्यांनी त्वरीत कराव्यात असे त्यांनी सांगितले.

     सन 2011-17 च्या वस्त्रोद्योग धोरणात जळगांव जिल्हयाचा समावेश केला असून त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल असे वस्त्रोद्योग मंत्री नसीम खान यांनी सांगितले. तर कापूस फेडरेशन व कापूस एकाधिकार योजना बंद पडल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन व्यवस्था निर्माण झाली पाहिजे असे आमदार माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.

      कापसाच्या बी.टी. वाणात काही गैरप्रकार झाले, परंतु शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कोणत्याही बियाणे कंपनीवर शासन कारवाई करेल असे कृषि मंत्री विखे-पाटील यांनी सांगितले.  तसेच राज्यातील कापूस उत्पादकांनी रंगीत कापसाचे उत्पादन घेण्याचे त्यांनी आवाहन केले. कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाणे उपलब्ध केली जात आहेत. त्याकरिता शेतकऱ्यांनी गावातील कृषि सहाय्यकांकडे बियाणांची नोंदणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. येथील शेतकरी हा चालती बोलती प्रयोगशाळा असल्याने अशा प्रगत शेतकऱ्यांचे मार्गदर्शन विद्यापीठातील प्राध्यपकांना मिळावे याकरिता कृषि विद्यापीठांना सूचना दिल्याचे श्री. विखे-पाटील यांनी सांगितले यावेळी माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार , आ. शिरीष चौधरी यांचे ही भाषणे झाली.

      आमदार मनीष जैन यांनी आपल्या प्रास्ताविकात महाराष्ट्र कापूस परिषदेच्या आयोजनाचा उददेश सांगितला. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी महाराष्ट्र कापूस परिषदेच्या आयोजनाचे कौतुक केले. या परिषदेस जळगांव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, जालना आदि जिल्हयातील कापूस उत्पादक शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

      प्रारंभी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन महाराष्ट्र कापूस परिषदेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी कापूस उत्पादक प्रगतशील शेतकरी श्री.अशोक ओंकार पाटील व जीभाऊ धनसिंग पाटील यांचा मा.मुख्यमंत्री यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. या परिषदेत शेतकऱ्यांना शास्त्रज्ञ डॉ.सी.डी.माळी, डॉ.व्ही.एन.वाघमारे, एस.बी.नंदेश्वर, जे.एच.मेश्राम, एस.एम.रोकडे आदिचे मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.सुरवाडे यांनी केले तर आभार उदय पाटील यांनी मानले.
 




पाणी टंचाईला सामोरे जाण्यासाठी मागेल त्या गावाला टॅकर - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण



      जळगाव, दिनांक 20:- राज्यात उदभवलेल्या  पाणी  टंचाईला सामोरे जाण्यासाठी  मागेल त्या गावाला टॅकरव्दारे पाणी दिले जाईल, कोणीही पाण्यावाचून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे  जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जळगांव जिल्हा टंचाई परिस्थितीच्या आढावा बैठकीत बोलतांना दिली.
      मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्यात दोन तीन वर्षापासून कमी पाऊस पडला आहे. त्यास कदाचित हवामानातील बदल कारणीभूत असून त्यामुळे राज्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती उदभवली आहे. राज्यातील दुष्काळ कायमस्वरुपी दूर करण्यासाठी दिर्घकालिन उपाय योजण्यासाठी काळजीपूर्वक व काटेकोरपणे नियोजन करण्यात येत आहे.  तसेच पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्थाही करण्यात येत आहे. ज्या गावांना टॅकरने पाणीपुरवठा करण्यात येतो त्या गावांना सिमेंट बंधारे बांधणे, शेततळी करणे आणि बंधाऱ्यातील गाळ उपसा करणे या कामांना प्राधान्य देण्यात येऊन तलावांमधील गाळ शेतीसाठी तसेच विटभटटयांसाठीही वापरण्यात यावा असे सांगून त्यांनी पाणी टंचाई दूर करण्यासाठी खाजगी संस्थांनी पुढे यावे असे  आवाहनही  यावेळी केले.
     प्रारंभी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी जिल्हयातील टंचाई परिस्थिती निवारण्यासाठी करण्यात येत असलेल्या विविध उपाय योजनांचा आढावा सादर केला.   पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी जिल्हयातील टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाय योजनांसाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीची मागणी करुन खांन्देशासाठी विदर्भाच्या धर्तीवर खान्देश विकास कार्यक्रम आखावा अशी सूचना केली. तसेच  कापूस, केळी यांच्या नुकसान भरपाईसाठी अनुदानाची रक्कम त्वरीत मिळावी अशीही  विनंती केली.
     या आढावा बैठकीस वस्त्रोद्योग मंत्री नसीम खान, आ. शिरीष चौधरी, आ. मनिष जैन,जळगांव महानगरपालिकेचे महापौर किशोर पाटील, स्थायी समिती अध्यक्ष रमेश जैन, जळगांव जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शितल उगले , जिल्हा पोलिस अधिक्षक एस जयकुमार तसेच जिल्हयातील विविध पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

* * * * * * * *

Friday, 19 April 2013

टंचाई निवारणाच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई - पालकमंत्री

जळगाव : टंचाईची भीषणता कमी करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. सर्व विभागांनी टंचाई निवारणाच्या कामांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. या कामांमध्ये कोणी हलगर्जीपणा करत असेल  तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी सूचित केले.

पद्मालय शासकीय विश्रामगृह येथे आज सकाळी आयोजित पाणी व चारा टंचाई आढावा बैठकीत श्री. देवकर अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, तापी  सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. डी. पाटील, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकूर, प्रांताधिकारी रविंद्र राजपूत, राहुल मुंडके, गणेश मिसाळ, तुकाराम हुलवडळे, पशुसंवर्धन उपायुक्त प्रकाश फालक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी किसन मुळे, महापालिका पाणी  पुरवठा विभागाचे अभियंता श्री. जाधव आदींसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

श्री. देवकर म्हणाले, वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा थकबाकी राहिल्याने खंडित करु नये. सदरचे वीज बिल भरण्यासाठी गावांना मुदत द्यावी. त्यानंतरही संबंधित गाव वीज बिल भरत नसेल तर जिल्हा प्रशासनाशी चर्चा करावी. परंतु, कोणत्याही परिस्थितीत वीज पुरवठा खंडित करु नये. वीज वितरण कंपनीच्या कारभाराबद्दल जनतेच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. त्यामुळे सदर विभागाने टंचाईच्या परिस्थितीची जाणीव ठेवून काम करावे, अशी सूचनाही श्री. देवकर यांनी केली. टंचाईच्या कामांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याने या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यावर त्वरित कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात महात्मा फुले जल व भूमी अभियानांतून तलावातील गाळ काढण्याची कामे अत्यंत मंद गतीने सुरु आहेत. ती मोठ्या प्रमाणावर हाती घेणे आवश्यक असल्याचे श्री. देवकर यांनी सांगितले. जून अखेरपर्यंत जिल्ह्यातील तलावामधील जास्तीत जास्त गाळ काढून शेतकऱ्यांच्या शेतावर टाकण्याच्या कामात प्रशासनाने अधिक गतिमानता आणणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील चारा उपलब्धतेची माहिती घेऊन आवश्यक त्या ठिकाणी चारा छावणी सुरु कराव्यात. तसेच  सर्व तालुकानिहाय चारा परिस्थितीची माहिती घ्यावी, अशी श्री. देवकर यांनी सूचना केली. तसेच  टंचाईची भीषणता पाहता ज्या ट्रान्सफॉर्मरवरुन पाणी पुरवठा योजनांना वीज पुरवठा केला जात असेल आणि ते जर नादुरुस्त असतील तर ते 24 तासांच्या आत वीज कंपनीने दुरुस्त करुन देणे गरजेचे असल्याचे त्यांनी  सांगितले.

रोहयो अंतर्गत शेत रस्ते, शिव रस्ते, नाला खोलीकरण आदी कामांसाठी गावे स्वत:हून पुढे येत असतील तर त्यांना त्वरित कामे द्या. तसेच सर्व प्रांताधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर बैठका घेऊन सदरची कामे मार्गी लावण्याची सूचना देवकर यांनी केली. यावेळी जिल्ह्यातील रोहयो कामांचा आढावाही घेण्यात आला.

प्रारंभी जिल्हाधिकारी राजूरकर यांनी प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यात जिल्ह्यात 104 टँकर, 257 विहीर अधिग्रहण, 640 बोअरवेल्सना मंजुरी, 549 बोअरवेल पूर्ण करुन 198 पंप कार्यान्वित झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तात्पुरती पाणी पुरवठा योजनांच्या प्रस्तावांना त्वरित मंजुरी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले

Wednesday, 17 April 2013

जळगांव येथे पोलीस भरतीचे आयोजन



       जळगांव, दि. 17 :- जळगांव येथे पोलिस भरती आयोजित  करण्यात आली असून जिल्हयातील माजी सैनिक / विर पत्नी यांनी पोलीस भरतीचे अर्ज करावेत सदर भरती करीता अर्ज हे ऑनलाईन पध्दतीने भरावयाचे असल्याने त्याची प्रक्रीया दि. 15 एप्रिल 2013 पासून सुरु झाली आहे. याबाबतची जाहिरात मा पोलीस अधिक्षक जळगांव यांनी दि. 11 एप्रिल 2013 रोजी दैनिक पुण्यनगरी आणि तरुण भारत या वर्तमान पत्रामध्ये प्रसिध्द केली आहे. तरी पात्र उमेदवारांनी जाहिरातीत नमुद केले प्रमाणे कार्यवाही करुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा असे आवाहन माजी कॅप्टन मोहन कुलकर्णी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी जळगांव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय जळगांव यांचा दुरध्वनी क्रमांक 0257 – 2241414 वर संपर्क करावा.

महार रेजिमेंटमध्ये सैन्य भरती


       जळगांव, दि. 17 :- सागर (म.प्र) येथील महार रेजिमेंट सेंटर मध्ये युनिट हेडक्वार्टर कोटा सैन्य भरती शहिदांची विधवा, माजी सैनिक विधवा व माजी सैनिक यांच्या पाल्यांकरीता सोल्जर ट्रेडमॅन या पदांची दिनांक 1 मे 2013 ते 04 मे 2013 रोजी सैन्य भरती आयोजित करण्यात आलेली आहे. तरी माजी सैनिक व विधवांच्या पाल्यांनी याचा लाभ घ्यावा , असे आवाहन कॅप्टन मोहन कुलकर्णी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी जळगांव यांनी केले आहे.