Sunday, 26 January 2014

वाचन संस्कृती वृध्दिंगत करण्यात ग्रंथोत्सवाची भुमीका महत्वाची:पालकमंत्री संजय सावकारे


वाचन संस्कृती वृध्दिंगत करण्यात ग्रंथोत्सवाची भुमीका महत्वाची
                                                    :पालकमंत्री संजय सावकारे


         जळगाव, दिनांक 26 -  आधुनिक माध्यमांमुळे वाचन संस्कृती कमी होत आहे, ही गोष्ट खरी आहे. नवीन माध्यमांमुळे वाचनासाठी आवश्यक असणारी एकाग्रता कमी होत आहे, त्यामुळे वाचनाची सवय वाढविणे व वाचन संस्कृती वृध्दिंगत करणे महत्वाचे आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे प्रत्येक जिल्हयात राबविण्यात येत असलेल्या ग्रंथोत्सवांची भुमिका महत्वाची ठरते, असे प्रतिपादन राज्याचे कृषि, पशुसंवर्धन, दुग्धविकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय आणि भटक्या व विमुक्त जातींचे कल्याण राज्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना.संजय सावकारे यांनी केले.
              जळगाव जिल्हा ग्रंथोत्सव 2013-14 चे पालकमंत्री ना.सावकारे यांच्या हस्ते आज थाटात उदघाटन झाले. लेवा बोर्डींग सभागृहात आयोजित या ग्रंथप्रदर्शन उदघाटन सोहळयाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर हे होते. या प्रसंगी बोलतांना सावकारे म्हणाले की, ग्रंथोत्सवाच्या निमीत्ताने अनेक दुर्मीळ ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध झालेले आहेत, त्यांचा वाचकांनी अधिकाधिक लाभ घ्यावा. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासन विविध उपक्रम राबवित असते. मराठी ही ज्ञान भाषा झाली पाहिजे, तिचा अभिमान आपण बाळगला पाहिजे त्याचबरोबर ज्ञान मिळविण्यासाठी इतर भाषाही अवगत केल्या पाहिजेत तरच आपण जागतिकीकरणाच्या स्पर्धेत टिकू. ग्रंथोत्सवात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी राजूरकर यांनी जिल्हयातील व राज्यातील ग्रंथालयांच्या उपलब्धतेविषयी माहिती सांगून ग्रंथ प्रसारासाठी व वाचन संस्कृती वाढविण्यासाठी ग्रंथोत्सवांचे महत्व आपल्या भाषणातून अधोरेखीत केले.
                या सोहळयाला ग्रंथोत्सव समितीचे सदस्य डॉ.किसन पाटील, चंद्रशेखर ठाकूर, विजय पाठक, रंगराव पाटील, शशिकांत हिंगोणेकर, बेंडाळे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. राणे, नाशिक विभागाचे माहिती अधिकारी रविंद्र ठाकूर आदि मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी फित कापून ग्रंथोत्सव दालनाचे उदघाटन पालकमंत्र्यांनी केले त्यानंतर ग्रंथ स्टॉल्सची पाहणी करुन स्वत: ग्रंथ खरेदी केली. उदघाटन सोहळा प्रसंगी शाहीर शिवाजीराव पाटील व सहका-यांनी देशभक्तीपर तसेच ग्रंथांची महती सांगणारे पोवाडे सादर केले. प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाने यांनी केले तसेच समिती सदस्य डॉ.किसन पाटील यांनी ग्रंथवाचणाचे महत्व विशद केले तर सुत्रसंचालन मनोज गोवींदवार यांनी केले. कार्यक्रमला विविध प्रकाशन संस्थेचे प्रतिनिधी, ग्रंथ प्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.


* * * * * * * *

No comments:

Post a Comment