रस्ता सुरक्षा ही निरंतर बाब : पालकमंत्री संजय सावकारे
जळगाव, दि. 3 :- रस्ता सुरक्षा ही निरंतर
चालणारी बाब असून केवळ पंधरवडा किंवा सप्ताह पाळून लोकांचे प्रबोधन होणार नाही,
असे प्रतिपादन राज्याचे कृषी राज्यमंत्री तथा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री श्री. संजय
सावकारे यांनी आज जळगाव येथे केले. जळगाव जिल्हा पोलीस दल व उप प्रादेशिक परिवहन
विभाग, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित रस्ता सुरक्षा अभियानाचे उदघाटनानंतर
आयोजित समारंभात ते मार्गदर्शन करत होते.
श्री. सावकारे पुढे म्हणाले, शासन सातत्याने
नियम व कायदे तयार करत असतात वाहतुकीचे नियम लोकांचा जीव सुरक्षित रहावा, वेळेत
सुरक्षित इच्छित ठिकाणी नागरिकांना पोहचता यावे यासाठी नियम आणि कायदे असतात. नियम
सर्वांनी पाळले पाहिजे असे सांगून श्री. सावकारे म्हणाले केवळ वसूलीचे उदिष्ट
वाहतूक शाखेचे असता कामा नये, लोकांचे प्रबोधन करुन वाहतूकीला शिस्त लावावी.
सुरक्षित वाहतूक लोकांची सुरक्षा यासाठी महिन्यातून एक किंवा दोन दिवस
चित्रप्रदर्शन, चलचित्रप्रदर्शन प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अथवा मोठया गावात आयोजित करावे .
या कार्यक्रमास जळगाव शहर महानगर पालिकेच्या महापौर सौ. राखीताई सोनवणे,
प्र. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती एन. अंबिका, पोलीस
उप अधिक्षक वाय. डी. पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
समारंभात मार्गदर्शन करताना प्र. जिल्हा
पोलीस अधीक्षक श्रीमती एन अंबिका
म्हणाल्या भारतात चार मिनीटात एक मृत्यू अपघाताने होतो यात रस्त्यावर मदयपान करुन
वाहन चालविणे, रस्ता सुरक्षेचे नियम न पाळणे, सुरक्षा नियम पाळणे ही सर्वांची
जबाबदारी असून नागरीकांनी ती स्वीकारली पाहीजे. अपघाताच्या प्रमाणात भारतामध्ये महाराष्ट्र
पहिल्या पाचामध्ये असल्याचे त्यांनी खेदाने नमूद केले.
प्रास्ताविकात उप प्रादेशिक परिवहन
अधिकारी श्री. सुभाष वारे यांनी भारतामध्ये साडेनऊ कोटी वाहने असून दरवर्षी पाच
लाख रस्ते अपघात होतात. त्यात एक लाख पंचवीस हजार लोकांना अपंगत्व येते तर बारा
हजार लोकांचा मृत्यू होतो. यामुळे पाच हजार कोटी रुपयांचे नुकसान होते. असे सांगून
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जिल्हयात सातत्याने नागरिकांचे प्रबोधन केले जाते.
जिल्हयातील अपघाताचे प्रमाण कमी झाले असून जिल्हा शून्य अपघात प्रवण करण्याचा
निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे
पोलीस निरीक्षक आर. एम. भोसले यांनी प्रमुख अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत
केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते, चित्र
प्रदर्शन, चलचित्र प्रदर्शन उदघाटन, रस्ता सुरक्षा मार्गदर्शन पुस्तिकेचे व
घोषवाक्य स्टिकरचे प्रकाशन करण्यात आले.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment