Sunday, 26 January 2014

जळगाव जिल्ह्यात 28 लाख जणांना अन्नसुरक्षेचा लाभ:पालकमंत्री संजय सावकारे


जळगाव जिल्ह्यात 28 लाख जणांना अन्नसुरक्षेचा लाभ
                                                      :पालकमंत्री संजय सावकारे

जळगाव, दि.26- सतत प्रगल्भ होत जाणा-या लोकशाहीमुळे आपले राष्ट्र सातत्याने प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. या वाटचालीत अनेक क्रांतीकारी निर्णय झाले आहेत. देशात कुणीही उपाशी राहू नये यासाठी अन्न सुरक्षा कायदा आणला गेला आहे. हा कायदा महाराष्ट्रात 1 फेब्रुवारीपासून  अंमलात येणार आहे, आपल्या जळगाव जिल्ह्यातही 28 लाख 12 हजार लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय, व्यसनमुक्ती कार्य आणि भटक्या-विमुक्त जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांनी आज येथे केले.
देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या 64 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात ते बोलत होते. या सोहळ्याला  राज्याचे विरोधी पक्षनेता एकनाथराव खडसे, आ. मनिष जैन, जि. प. अध्यक्ष  दिलीप खोडपे, महापौर  राखीताई सोनवणे, जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी शितल उगले, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. जयकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, मनपा आयुक्त संजय कापडणीस, होमगार्ड जिल्हा समादेशक डॉ. भालोदे , विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, प्रतिष्ठित नागरिक आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा पोलीस कवायत मैदानावर मोठ्या थाटात पार पडला. त्यावेळी जनतेला शुभेच्छा देतांना पालकमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, देशाने अन्नधान्य उत्पादनात मोठी क्रांती केली आहे. ऎकेकाळी आपणास अन्नधान्य आयात करावे लागत होते आता मात्र अन्नधान्याची आपली गरज भागवून आपण इतर देशांना अन्नधान्य निर्यात करु शकतो. अन्न सुरक्षा कायद्यामुळे देशातील ग्रामीण भागातील 76.32 व शहरी भागातील 45.34 टक्के लोकांना सवलतीच्या दरात धान्य मिळणार आहे. राजीव गांधी जिवनदायी आरोग्य योजना ही जळगाव जिल्ह्यात 25 नोव्हेंबर 2013 पासून लागू झाली आहे. जळगाव जिल्हा या योजनेच्या अंमलबजावणीत अव्वल आहे. तसेच महाराष्ट्र राज्य सावकारी  नियमन अध्यादेश 2014 मुळे जिल्हा उपनिबंधकांना दिवाणी न्यायालयाचे अधिकार प्राप्त झाले असून त्यामुळे सावकारीमुळे होणारी शेतक-यांची पिळवणूक प्रभावीपणे थांबविता येईल, असेही त्यांनी सांगितले. 
प्रारंभी सकाळी 9.15 वा. पालकमंत्री श्री. सावकारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीताने राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर शानदार संचलन व बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली.  पालकमंत्र्यांनी  परेडचे निरिक्षण केले. परेड कमांडर बसवराज तेली (भापोसे) यांच्या नेतृत्वाखाली  23 दलांनी  व विभागाच्या चित्ररथांनी आपले संचलन केले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले.
जिल्ह्यातील विविध विद्यालयांच्या कलापथकांनी हे कार्यक्रम सादर केले. या प्रसंगी राष्ट्रपती सन्मान पदक प्राप्त पोलीस गृह उपअधीक्षक वाय.डी.पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक मुश्ताक अहमद शेख इसा  यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच बारी समाज माध्यमिक विद्यालय, शिरसोली, ता. जळगाव, डॉ. राम मनोहर लोहिया माध्यमिक विद्यालय, बांबरुड राणीचे ता. पाचोरा, खुबचंद सागरमल माध्यमिक विद्यालय, शिवाजीनगर जळगाव, काशिनाथ पलोड पब्लिक स्कुल जळगाव , बहिणाबाई माध्यमिक विद्यालय , जळगाव, श्रीमती क.द. नाईक माध्यमिक विद्यालय, पाळधी, ता. जामनेर  या शाळांना पंचतारांकित हरित शाळा पारितोषिक , जिजामाता माध्यमिक विद्यालय, जळगाव या शाळेस उत्कृष्ट बी संकलन करणारी शाळा पारितोषिक देण्यात आले. तसेच कांचन योगेश चौधरी ( एकलव्य क्रीडा पुरस्कार), विष्णू रामदार भंगाळे (क्रीडा संघटक), उल्हास ठाकरे (ॲथेलेटिक्स) गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, नागेश अर्जून खरारे (बॉक्सिंग), विशाल बेलदार व तृप्ती तायडे (तायक्वोंदो) या खेळाडूंचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमांचे सूत्र संचलन जेष्ठ पत्रकार अनिल पाटील, डॉ. जी. ए. उसमानी यांनी केले, या सोहळयास शहरातील नागरीक , विद्यार्थी, पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

                                          * * * * * * * * 

No comments:

Post a Comment