विद्यार्थीदशेतच व्हावा ग्रंथसंस्कार
ग्रंथोत्सवातील परिसंवादात वक्त्यांचा सूर
जळगाव, दि.28- बुद्धीप्रामाण्यवादाचा अवलंब करुन आपला समाज
हा ज्ञानाधिष्ठित समाजाकडे वाटचाल करीत आहे. ही बुद्धीप्रामाण्यवादाची जडणघडण ही
बालवयातच होणे आवश्यक असते, त्यासाठी विद्यार्थीदशेतच मुलांवर ग्रंथसंस्कार होऊन,
त्याना वाचनाची सवय लावणे आवश्यक आहे, असे मत ग्रंथोत्सवात आयोजित “ज्ञानाधिष्ठित
समाजनिर्मितीत ग्रंथांची भूमिका”,
या विषयावरील परिसंवादात बोलतांना मान्यवर वक्त्यांनी व्यक्त केले.
राज्य शासनाच्या
मराठी भाषा विभागाअंतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत
ग्रंथोत्सव-2013- 14 रविवार दि.26 जानेवारी ते मंगळवार दि.28 जानेवारी 2013 या कालावधीत
सरस्वती सभागृह (लेवा बोर्डीग हॉल ) जळगाव येथे संपन्न होत आहे. या सोहळ्याच्या तिस-या दिवसाच्या प्रथम सत्रात “ज्ञानाधिष्ठित समाजनिर्मितीत ग्रंथांची भूमिका”, या विषयावरील परिसंवादात पार पडला. अध्यक्षस्थानी बेंडाळे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एस.
राणे हे होते. या परिसंवादात दै.लोकमतचे संपादक सुधीर महाजन, कवयित्री माया धुप्पड, डॉ.सुधीर भटकर, प्रा. शरदचंद्र छापेकर या मान्यवर
वक्त्यांनी आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले.
परिसंवादाला प्रारंभ करतांना प्रा. शरद छापेकर यांनी सांगितले की, मानवाला आलेल्या
अनुभवांची सुसंघटीत पुनर्रचना म्हणजे ज्ञान होय, अशी ज्ञानाची व्याख्या करता येईल.
आज माहितीचा प्रचंड मोठा विस्फोट झालेला आहे. पण माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. ज्या द्वारे
मानवतावादाचा विकास होतो ते ज्ञान. अशाप्रकारच्या ज्ञानाने समाज समृध्द करण्यासाठी
ग्रंथांशिवाय पर्याय नाही. समाजात ज्ञानाची वाढ़ होतांना ती संतुलित असली पाहिजे , त्यासाठीही
ग्रंथ हे मार्गदर्शक ठरतात, असे प्रतिपादन त्यांनी केले.
विविध काव्य पंक्ती आणि सुभाषितांच्या
आधारे आपले विचार मांडतांना माया धुप्पड म्हणाल्या की, ज्ञान हे नेहमी जिवनाभिमुख असावे. आणि असं ज्ञान
हे ग्रंथच देऊ शकतात. ग्रंथाद्वारे विवेकवादाची जोपासना होते. त्यासाठी लहानपणीच वाचनाचा
संस्कार व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या
वृत्तपत्र विद्या आणि जनसंवाद विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सुधीर भटकर यांनी ग्रंथनिर्मितीत
मुद्रण तंत्राचा इतिहास सांगून मानवाचे पशुत्व दूर करण्यात ग्रंथांचे मोलाचे योगदान
आहे असे मत मांडले. तसेच अन्न वस्त्र निवारा
याप्रमाणे ग्रंथ ही सुद्धा माणसाची एक गरज व्हावी, असे प्रतिपादन केले.
आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनात लोकमतचे
संपादक सुधीर महाजन म्हणाले की, उत्तर पेशवाईतील जो ज्ञानाधिष्ठित समाज होता तो विशिष्ट
चौकटीच्या बाहेर विचार करीत नव्हता. मात्र ग्रंथ मुद्रण आणि प्रसाराला इंग्रजांनी चालना
दिल्यानंतर हेच ग्रंथ हातात घेऊन महात्मा फुल्यांनी क्रांती केली आणि हीच क्रांती पुढच्या
ज्ञानाधिष्ठित समाजरचनेची पाया भरणी करणारी ठरली. 1990 नंतर आलेल्या संगणक क्रांतीने
पुस्तकांची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढविली. त्यातून आजचा समाज घडतो आहे. ग्रंथांच्या
प्रभावामुळे समाज बदलतो. आजही समाज ज्ञानेश्वरी , तुकारामाची गाथा, भागवत यांची पारायणे
करतो, हे ग्रंथ डोक्यावर धरतो कारण त्यांचं संदर्भमूल्य आजही टवटवीत आहे, असे त्यांनी
सांगितले.
आपल्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य
डॉ. राणे म्हणाले की, ग्रंथाचे महत्व ज्ञानाधिष्ठित समाजरचना जी सध्याच्या जागतिकीकरणाच्या
युगात होत आहे. त्यासाठी ग्रंथांचे महत्त्व अबाधित असून त्यासाठी ग्रंथवाचनाची चळवळ
उभी राहिली पाहीजे. ग्रंथोत्सवासारखे उपक्रम त्यात आपले योगदान देत आहेत.
परिसंवादाच्या प्रारंभी मान्यवर
वक्त्यांचे स्वागत देवेंद्र भूजबळ, उपसंचालक (माहिती), नाशिक विभाग, नाशिक यांनी केले.
श्री. भुजबळ यांचे स्वागत जिल्हा माहिती अधिकार मिलिंद दुसाने यांनी केले. सूत्रसंचालन
मनोज गोविंदवार यांनी तर आभारप्रदर्शन मिलिंद दुसाने यांनी केले. या ग्रंथोत्सवास वाचकांचा
उत्तम प्रतिसाद मिळत असून यानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांनाही जळगाव शहरातील रसिकांची
चांगली गर्दी लाभत आहे.
* * * * * * * * *
No comments:
Post a Comment