Thursday, 9 January 2014

आधुनिकतेची कास आणि पूरक व्यवसायाची जोड देऊन शेतक-यांनी समृद्ध व्हावे ! पालकमंत्री संजय सावकारे



आधुनिकतेची कास आणि पूरक व्यवसायाची
 जोड देऊन शेतक-यांनी समृद्ध व्हावे !
: पालकमंत्री संजय सावकारे
  
चाळीसगाव, जि. जळगाव, दिनांक 9 :- पारंपारिक पध्द्तीने शेती व्यवसाय करतांना शेतक-यांनी आधुनिकतेची कास धरावी तसेच पशु पालनासारखे पुरक व्यवसाय करुन समृध्द् व्हावे, असे आवाहन कृषि राज्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना.संजय सावकारे यांनी आज येथे केले.
 लोकनेते कै.अनिलदादा देशमुख यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिनांक 9 ते 12 जानेवारी,2014 दरम्यान कृषि उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव येथे या कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन कृषि राज्यमंत्री सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी राज्याचे सहकार व पणन राज्यमंत्री सुरेश धस, पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष ना.रामराव वडकुते, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी हे उपस्थित होते.
            यावेळी बोलतांना पालकमंत्री सावकारे म्हणाले की, देशात अन्न धान्याचे विक्रमी उत्पन्न झाले याचे कारण शासन शेतक-याच्या पाठिशी उभे आहे. जलसंधारणाच्या कामाला गती देण्यात आली असून राज्यभरात दिनांक 14 जानेवारी रोजी एकाच वेळी जलसंधारणाच्या कामांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. पाण्याची बचत ही काळाची गरज असून पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहिम लोकसहभागातून राबविण्याची खरी गरज आहे. जिल्हयातील नदी जोड प्रकल्पाचे अपुर्ण राहिलेले काम पुर्ण करण्यासाठी नियोजन विभागातून तरतूद उपलब्ध करुन देण्यात आली असून लवकरच  हा प्रकल्पही पुर्णत्वास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
            ना.सावकारे यांच्या हस्ते बळीराजाच्या प्रतिमा पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कृषि प्रदर्शनाचे उद्घघाटक राज्याचे सहकार व पणन राज्यमंत्री ना.सुरेश धस यांनी कै.अनिलदादा देशमुख यांच्या स्मृती दिनानिमीत्त त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, तालुक्यातील बेलगंगा साखर कारखाना कार्यान्वित करण्यासाठी देखील शासन स्तरावर योग्य प्रयत्न करीत आहोत. डबघाईस आलेल्या पतसंस्थांना जिवदान देण्यासाठी शासनाने 6.50 कोटीची तरतूद केली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष ना.रामराव वडकुते यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना सांगितले की, धनगर समाजाच्या उन्नतीसाठी शासन स्तरावरुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळ कार्यान्वित आहे. उत्तर महाराष्ट्रात एकमेव असे महामंडळ चाळीसगांव तालुक्याला लाभले आहे, याचा शेतक-यांनी लाभ घ्यावा.
            विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी, कृषि हा देशाचा आर्थिक कणा असल्याचे ओळखून आ.देशमुख यांनी लोकनेते कै.अनिल देशमुख यांच्या पावलावर पाऊल टाकून कृषि प्रदर्शनाचा पायंडा पाडून मोठी जबाबदारी पार पाडल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
            या कृषि प्रदर्शनात नामांकीत कृषि कंपनीची बियाणे, खते, ओषधी,आधुनिक यंत्र सामग्री इ.वस्तुंचे दालन उभारण्यात आले आहे. आधुनिक ठिबक सिंचन तंत्रज्ञान, पशू व दुग्ध व्यवसाय संदर्भ, गृहउपयोगी व बचत गटांच्या वस्तुंचे प्रदर्शन, कृषि विषयक पुस्तके व सी.डी.चे प्रदर्शन, पशु प्रदर्शन व पशु मेळावा, प्रगतीशील शेतक-यांचा सन्मान सोहळा, आदर्शगाव संकल्पना अशी प्रमुख वैशिष्टे या भव्य कृषि प्रदर्शनाची आहेत.
            या कार्यक्रमासाठी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती रोहिदास लाला पाटील, नगराध्यक्षा अनिता चौधरी, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप देशमुख, जि.प. चे राजेंद्र राठोड, पं.स. सभापती विजय जाधव, शशीकांत साळुंखे, भारती पाटील, रामचंद्र जाधव, कृषि उत्पन्न बाजार समितीची माजी सभापती उ.रा.पवार, माजी नगराध्यक्ष मधु चौधरी यांच्यासह कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ, जि.प. व पं.स. चे सदस्य, नगरसेवक  व शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय विद्यालयातील व्याख्यान सोहळयाचे उद्घाटन
            युवकांसाठी प्रा.यजुवेंद्र महाजन व समिर दरेकर यांच्या व्याख्यान सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन पालकमंत्री ना.सावकारे यांच्या हस्ते राष्ट्रीय विद्यालय चाळीसगांव येथे पार पडले.
            लोकनेते कै.अनिलदादा देशमुख यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधत शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये दृष्टि व्यवसाय प्रशिक्षण निवासी अंध कार्यशाळा, शहरातील एम.आय.डी.सी. मध्ये पहिलाच उद्योग व्यवसायास सुरुवात करणारे नॅशनल बायोकेमिकल्सचे संचालक निलेश कोतकर यांच्या उद्योगाचा शुभारंभ, तसेच हिरापूर रोड परिसरातील नागरिक व ग्रामीण रुग्णालय मेहुणबारे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबीर भरविण्यात आले होते.
शासकीय गोदामाचे ना.संजय सावकारे यांच्या हस्ते भुमिपूजन
            महाराष्ट्र शासन व नाबार्ड यांचे निधीतून डेराबर्डी, चाळीसगांव येथे शासकीय धान्य गोदाम उभारणी साठी भूमिपुजन राज्याचे कृषि राज्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना.संजय सावकारे यांच्या हस्ते आज करण्यात आले. प्रसंगी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, उप विभागीय अधिकारी मनोज घोडे पाटील, तहसिलदार बाबासाहेब गाढवे आदि मान्यवर उपस्थित होते.

* * * * * * * *
टिप : सदर वृत्त व छायाचित्र हे  खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 * * * * * * * * 

No comments:

Post a Comment