उत्पादनावर
भर न देता गुणवत्तापूर्ण उत्पादन महत्वाचे !
कृषि
प्रदर्शनातील मार्गदर्शक डॉ.चंद्रशेखर पुजारी
चाळीसगाव, जि.
जळगाव, दिनांक
11 :- केवळ
उत्पादनावर भर न देता गुणवत्तापूर्ण उत्पादन महत्वाचे असल्याचे कृषि महाविद्यालय,
धुळे येथील सहयोगी प्राध्यापक डॉ.चंद्रशेखर पुजारी यांनी चाळीसगाव येथे आयोजित केलेल्या
कृषि प्रदर्शनात शेतक-यांना मार्गदर्शन करतांना सांगितले. कै.अनिलदादा देशमुख
यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कृषि
प्रदर्शनात त्यांना लिंबू व मोसंबी लागवड या विषयी शेतक-यांना मार्गदर्शन
करण्यासाठी आ.राजीव देशमुख यांनी आमंत्रीत केले होते. यावेळी आमदार राजीव देशमुख,
जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप देशमुख बाजार समिती सभापती रोहिदास पाटील, महानंदा चे
संचालक प्रमोद पाटील, जालम पाटील, शाम देशमुख, प्रदिप निकम, प्रदिप अहिरराव, मधुकर
चौधरी, दिलीप पाटील, यांच्यासह आदि मान्यवर व शेतकरी मोठया संख्येने उपस्थि होते.
लिंबूच्या
लागवडीमुळे शेतक-यांना खेळते भांडवल उपलब्ध होते तर मोसंबीचे भरघोस उत्पन्न हे
वर्षाकाठी शेतक-यांना मिळत असते. लिंबू व मोसंबी च्या लागवडीसाठी शेतक-यांना
त्यांच्या कलमांची जाण, बहार व्यवस्थापन, वाफे तयार करण्याची पध्दत, बहाराचे
प्रकार, आच्छादनाचा उपयोग, जमिनीतील सुक्ष्म जिवांचा उपयोग, रोग व किड
नियंत्रणासाठी करावयाचे नियोजन या सारख्या असंख्य विषयावर त्यांनी शेतक-यांना
मार्गदर्शन केले. झाड सशक्त असेल तर रोग व किडीला बळी पडणार नाही. म्हणून रासायनिक
व जैवीक खतांचा वापर तसेच सेंद्रीय शेती पध्दत वापरात घ्यावी असे आवाहनही त्यांनी
उपस्थित शेतक-यांना केले.
फळ
बागेकरिता दोन प्रकारची बहार असून आंबे बहार व मृग बहार या विषयी माहिती देतांना
प्रामुख्यांने आंबे बहार घेणा-या शेतक-यांनी बागेला अच्छादन केल्यास जमिनीतील
ओलावा टिकून जमिनीतील सुक्ष्म जिवांची उत्पत्ती वाढण्यास मदत होत असते, मोसंबीची
लागवड करतांना प्रामुख्याने कलमांचा वापर केला पहिजे, पिकांना अन्न द्राव्य व किटक
नाशकांची फवारणी ही प्रामुख्याने पिकाची 25 टक्के पानगळ झाल्यानंतर करावी, या
पिकांवरील खै-या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी पावसाळयाच्या सुरवातीला किटक
नाशकांची 3 ते 4 फवारण्या हया 15
दिवसांच्या अतंराने कराव्या यामुळे बुरशीवर देखील नियंत्रण मिळविता येते, मानवी
शरीराप्रमाणेच झाडांची काळजी घेतल्यास व वेळेचे सुयोग्य नियोजन केल्यास गुणवत्तापूर्ण
उत्पादन घेऊन शेतक-याच्या कष्टाला चांगले फळ मिळेल. असे त्यांनी कृषि प्रदर्शनात
उपस्थित शेतक-यांना सांगितले.
पिक-पाणी-हवा यांचा समतोल विक्रमी उत्पादनासाठी पोषक :
कृषि तज्ञ बाळकृष्ण जडे
कृषि प्रदर्शनात शेतक-यांनी पाणी व्यवस्थापनाचे
मार्गदर्शन करण्यासाठी जैन एरिगेशनचे वरिष्ठ कृषि तज्ञ श्री.बाळकृष्ण जडे यांना
आ.देशमुख यांनी आमंत्रीत केले होते. त्यांनी शेतक-यांना मार्गदर्शन करतांना
सांगितले की, पिकांना पाणी देतांना जमिनीमध्ये हवेचे संतुलन ठेवूनच पाणी द्यावे,
पिक पाणी व हवा यांचा समतोल हा विक्रमी उत्पादनासाठी पोषक असल्याचे त्यांनी यावेळी
सांगितले. पारंपारिक पध्दतीने सेंद्रीय खते, रासायनिक खते, किटक नाशके, अन्नद्राव्ये
यांचा उपयोग केल्यास त्यांची कार्यक्षमता ही पिकांना केवळ 30 ते 40 टक्के होऊन
मोठया प्रमाणात शेतक-यांचे नुकसान होत असते. त्यामुळे पाणी व पोषणाकडे शेतक-यांनी
अधिक लक्ष देण्याची गरज असून पाणी वापरावर प्रबोधनाची गरज असल्याचेही त्यांनी
सांगितले. पाणी देण्याच्या तीन पध्दती असून पाट पाणी पध्दत, तुषार सिंचन व ठिबक
सिंचन पैकी ठिबक सिंचनाचा शोध हा इस्त्राईल मधील शास्त्रज्ञ सिमचा ब्लास यांनी
लावला असून ठिबक सिंचनाव्दारे पिकांना पाणी व खताचा वापर केल्यास जे मोठया
प्रमाणावर शेतक-याचे नुकसान होत असते ते टाळता येऊ शकते.
शेतक-याने
तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यापुर्वी तीन गोष्टीची काळजी घ्यावयास सांगितली असून
वापरणार असलेले तंत्रज्ञान हे शेतक-याला परवडणारे, दिर्घकाळ टिकणारे व वापरावयास
सोपे अशा तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, पाण्याची गुणवत्ता, स्त्रोत पाहून सिंचन
पध्दतीची निवड करावी, पाण्यात विरघळणा-या खताचा वापर ठिबक सिंचनाव्दारे केल्यास
कार्यक्षमता व उत्पादनावर परिणाम दिसून येईल, पिकांच्या सर्वांगिण वाढीसाठी 17
अन्न द्रव्यांची आवश्यकता असून या 17 अन्न द्रव्यांची सविस्तर माहितीही त्यांनी
उपस्थित शेतक-यांना दिली. पारंपारिक पध्दतीने शेती करणा-या शेतक-यांचे पाणी व खते
ही 40 टक्के पिकांना तर 60 टक्के जमिनीला मिळतात परिणामी त्यांची कार्यक्षमता व
उत्पादनावर त्याचा परिणाम दिसून येत नाही. ठिबक सिंचन संचाविषयी बोलतांना दोन
नळयातील अंतर सारखे असल्यास अशा संचांचा वापर हा विविध प्रकारच्या पिकांसाठी
उपयोगी पडू शकतो. संकुरित अन्नद्राव्य ही पिकांना आवश्यक असतात. आपल्याकडे मुबलक
पाणी असल्यास कपाशीचा दुबार पीक (फरदड) घेण्याचा सल्लाही त्यांनी शेतक-यांना दिला.
खर्च वाढून उत्पन्न कमी हा नियोजनाचा अभाव :
श्री.अमृतराव देशमुख आदर्श शेतकरी
एकरी 45 क्विटंल कापूस उत्पादन घेणारे आदर्श
शेतकरी श्री.अमृतराव देशमुख, अमरावती
यांना कृषि प्रदर्शनात मार्गदर्शन
करण्यासाठी आ.देशमुख यांनी आमंत्रीत केले
होते प्रसंगी मार्गदर्शन करतांना अमृतराव देशमुख म्हणाले की, कापूस उत्पादन
घेतांना प्रामुख्याने पट्टा पध्दतीचा अवलंब करावा, पेरणीपुर्वी शेतीची मशागत पलटी
नागरटीव्दारे नागरटी करावी, प्रामुख्याने शेनखताचा वापर व लावण्याची सुयोग्य पध्दत
वापरावी परिणामी जमिनीतील जिवाणूंची वाढ होऊन नैसर्गिक खत उत्पत्ती होऊ शकते.
शेतीच्या सुपिकतेसाठी पीकाच्या भरघोस उत्पन्नासाठी गांडुळखताचा वापर करावा.
रासायनिक खताच्या तुलनेत गांडुळ खताच्या किमती कमी असल्याने शेतक-यांना
आर्थिकदृष्टया परवडणारे आहे. गांडुळ खतामुळे शेतीचा कस वाढून निर्माण होणारा
शेतमाल किटकनाशक विरहीत असल्याने मालाला बाजार भाव चांगला मिळतो. गांडुळखत भरखत व
जोरखत या दोन्ही प्रकारचे कार्य करत असते. परिणामी शेतक-याचा खर्च कमी होऊन
उत्पन्न वाढविण्यास मदत होत असल्याचे अमृतराव देशमुख यांनी सांगितले.
या
कार्यक्रमानंतर उपस्थित शेतक-यांच्या शंकाचे मार्गदर्शकांनी निराकरण केले. प्रसंगी
जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप देशमुख यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, केवळ
एक तास चर्चासत्र मार्गदर्शनासाठी पुरेसे नसुन उपस्थित मार्गदर्शकांनी
शेतक-यांसाठी पुस्तक प्रकाशनाचे नियोजन करण्याची विनंती केली.
आमदार
देशमुख यांच्या हस्ते पशु मेळाव्याचे उदघाटन
जिल्हा भरातून आदर्श पशुपालन शेतक-यांनी या
पशुमेळाव्यामध्ये आपले पशु प्रदर्शनासाठी आणले असून गाय, बैल, घोडा, म्हैस या
सारख्या पशुंच्या मेळाव्याचे उदघाटन आमदार
राजीव देशमुख यांनी आज चाळीसगाव कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये आयोजित कृषि
प्रदर्शनात केले. आयोजित केलेल्या पशु मेळाव्यामध्ये आदर्श पशुपालन करणा-या
शेतक-यांचा प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांक देऊन गौरविण्यात येणार असल्याचे या
मेळाव्याचे आयोजक संचालक दिनेश पाटील यांनी सांगितले यावेळी जिल्हा बँकेचे संचालक
प्रदीप देशमुख, शाम देशमुख, महानंदाचे संचालक प्रमोद पाटील, रामचंद्र जाधव आदि
मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. प्रदीप
* * * * * *
* *
No comments:
Post a Comment